Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अबू धाबी: आखातातील मुस्लीम देशांमध्ये आधी हिंदूंची मंदिरं नव्हती का?

Ram temple in Abu Dhabi
, मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 (18:04 IST)
-एहतेशाम शाहीद
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अबू धाबीत स्वामी नारायण मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. ही घटना अनेक अर्थांनी ऐतिहासिक मानली जात आहे. या घटनेचं आखाती देशांच्या संबंधाच्या दृष्टीने काय महत्त्व आहे?
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑगस्ट 2015 मध्ये, ते प्रचंड व्यस्त असतानाही अबू धाबीच्या शेख झायेद यांच्या मशिदीचा दौरा केला होता.
 
त्यासाठी एका दिवसानंतरच ते शेजारीच असलेल्या दुबईत एका सार्वजनिक सभेला संबोधित करणार होते.
 
2007 मध्ये तयार झालेली ही भव्य मशीद तोपर्यंत शहरात येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती आणि पर्यटकांनी पाहावं असं पर्यटनस्थळ म्हणून समोर आली होती.
 
मशीद परिसरात पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर सेल्फीही घेतला होता. त्यांनी त्याठिकाणी 'मोदी, मोदी'च्या घोषणा देणाऱ्या लोकांना अभिवादनही केलं होतं. तिथं एखाद्या उत्सवासारखं वातावरण होतं.
 
त्यानंतर काही वेळानंच मला भारताच्या एका टीव्ही अँकरचा फोन आला. त्यांनी मला लाइव्ह बातम्या सुरू असताना एक प्रश्न विचारला. "बुरखा परिधान केलेल्या महिला मशिदीत मोदींच्या घोषणा देत आहेत, याकडं तुम्ही कसं पाहता?" असं त्यांनी विचारलं होतं.
 
खरं म्हणजे मशिदीत असलेल्या भारतीय समुहानं घोषणा दिल्या होत्या. त्यापैकी काहींनी बुरखा परिधान केला होता. त्याची काही सेकंदाची क्लिप टीव्हीवर दाखवण्यात आली. पण उत्साहाच्या भरात करण्यात आलेल्या या रिपोर्टिंगमध्ये एक महत्त्वाची माहिती राहूनच गेली.
 
या मशिदीत प्रवेश करणाऱ्या महिलांना ड्रेस कोडनुसार कायम हिजाब परिधान करावा लागतो. मग त्या कोणत्याही धर्माच्या असल्या तरी.
 
त्यामुळं एका मशिदीत मुस्लीम महिला मोदींचा जयघोष करत आहेत, असं म्हणणं म्हणजे योग्य ठरू शकणार नाही.
 
समज आणि सत्य
गेल्या 10 वर्षांमध्ये झालेले पंतप्रधान मोदी यांचे सर्व यूएई दौरे मोठे इव्हेंट ठरले आहेत.
 
दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये 2015 मध्ये झालेला कार्यक्रम, 2018 मध्ये आयोजित वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये त्यांनी मुख्य वक्ता म्हणून भाषण करणं आणि गेल्यावर्षी आयोजित COP28 परिषदेतील त्यांच्या भाषणानं लोकांमध्ये उत्सुकता निर्माण केली.
 
पण त्यांच्या दौऱ्यांबाबत जी प्रसिद्धी केली जाते ती मात्र, नेहमी सत्य आणि समज यामधली रेषा आणखी अस्पष्ट करणारी असते.
 
या सर्व गोंधळामध्ये पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांना अनेकदा सत्य आणि समज या दोन्हीतील फरक मांडण्यात अपयश येतं.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13-14 फेब्रुवारीला यूएईच्या दौऱ्यावर आहेत. 2015 नंतरचा हा त्यांचा सातवा आणि गेल्या आठ महिन्यांतला तिसरा दौरा असेल.
 
या दौऱ्यादरम्यान यूएईची राजधानी अबू धाबीमध्ये 'अहलान मोदी' नावानं एक कार्यक्रम आयोजित केला जाईल. ही यूएईतील भारतीय समुदायाची सर्वांत मोठी शिखर परिषद असल्याचं म्हटलं जात आहे.
 
कार्यक्रमाच्या आयोजकांच्या मते, यात सहभागी होण्यासाठी 60,000 पेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, पंतप्रधान दुबईत वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करतील.
 
महत्त्वाची बाब म्हणजे, 14 फेब्रुवारीला अबू धाबीमध्ये स्वामीनारायण मंदिराचं उद्घाटन होत असतानाच त्यांचा हा दौराही होत आहे.
 
या भव्य मंदिराचं बांधकाम डिसेंबर 2019 मध्ये सुरू झालं होतं. हे मंदिर सात शिखरं आणि पाच घुमट असलेलं आहे. हे मंदिर बीएपीएस स्वामीनारायण संस्था तयार करत आहे.
 
मंदिराच्या भव्य उद्घाटनापूर्वी हा क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी 'सद्भाव उत्सव' साजरा केला जात आहे. महिनाभरापूर्वीपासूनच हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे.
 
बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे प्रमुख महंत स्वामी महाराज अबू धाबीमध्ये आहेत. ते मंदिरच्या उद्घाटन सोहळ्याचं नेतृत्व करतील.
 
अरब देशांमध्ये किती हिंदू मंदिरे आहेत?
काही पवित्र तथ्ये आणि अनेक वर्षांपासून पसरवण्यात आलेल्या काही चुकीच्या गोष्टीमुळं अफवा आणि काही खोट्या बाबींनाही प्रोत्साहन मिळालं आहे.
 
या सगळ्याची सुरुवात होते ती, अबू धाबीमध्ये तयार होणारं मंदिर अरब देशांतलं मधील पहिलं हिंदू मंदिर आहे, या अफवेमुळं किंवा अशा प्रकारच्या नरेटिव्हमुळं. पण हे सत्य नाही.
 
जगाच्या या कोपऱ्यात अनेक दशकांपासून मंदिरं आहेत. केवळ संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्येच नव्हे तर ओमान आणि बहरीनमध्येही आहेत.
 
बहरीनची राजधानी 'मनामा'मध्ये तयार करण्यात आलेलं श्रीनाथजींचं मंदिर एका शतकापेक्षाही जुनं आहे. याची निर्मिती सिंधी हिंदू समुदायानं केली होती. भारताच्या विभाजनाच्या अनेक वर्षांपूर्वी ते थट्टा इथं आले होते.
 
शेजारी असलेल्या सौदी अरेबियात राहणारे आणि काम करणारे हिंदूही सणांना किंवा मंगलक्षणी या मंदिरांमध्ये पूजा करण्यासाठी जात असतात.
 
ओमानची राजधानी मस्कतमध्ये दोन हिंदू मंदिरं आहेत. मोतीश्वर हे शंकराचं मंदिर आहे. ते ओल्ड मस्कतच्या मुत्तरा भागात आहे.
 
मोतीश्वर मंदिर आखाती भागातील सर्वात जुन्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर 125 वर्षांपेक्षाही जुनं असल्याचं सांगितलं जातं.
 
मस्कतच्या रूवीमध्ये कृष्ण-विष्णू मंदिर आहे. ते 150 वर्षं जुनं असल्याचं सांगितलं जातं. हे मंदिर ओमानच्या सुल्तानांनी ओमानमधील गुजराती समुदायासाठी मैत्रीचं प्रतीक म्हणून तयार केलं होतं.
 
दुबईतील संपन्न भारतीय समुदायात दक्षिण भारतीयांशिवाय सिंधी, मराठी, गुजराती, पंजाबी आणि सुमारे सर्व प्रमुख धर्मांची धार्मिक स्थानं अनेक दशकांपासून आहेत.
 
मंदिरांमध्येच अध्यात्मिक सोहळा, उत्सव आणि इतर कार्यक्रम आयोजित केले जातात. दुबई आणि त्याच्या आसपासच्या काही शहरांमध्ये आणि आखातातील इतर भागांमध्ये दिवाळीची रात्र भारतातील दिवाळीच्या रात्रीप्रमाणेच प्रकाशमान होत असते.
 
धर्म आणि राजकारण
सर्व आखाती देशांमध्ये आणि विशेषतः संयुक्त अरब अमिरातमध्ये भारतीयांच्या यशावरून हे स्पष्ट होतं की, जेव्हा एखादा समुदाय परिश्रम करून पुढं जातो तेव्हा त्याला हवं ते यश मिळाल्याशिवाय राहत नाही.
 
एका माजी भारतीय राजदुताच्या शब्दांत सांगायचं झाल्यास, भारतीय प्रचंड परिश्रमाद्वारे जगातील या भागामध्ये सर्वांच्या आवडीचे कर्मचारी बनले आहेत.
 
आक्रमक राष्ट्रवादाच्या नावाखाली ही सद्भावना बिघडवणं आणि त्याचा बहुसंख्याकवादाशी संबंध जोडणं यामुळं नक्कीच ही प्रतिष्ठा धुळीस मिळेल.
 
नूपुर शर्मा प्रकरण हे याचं ताजं उदाहरण आहे. सर्व भारतीयांना इथं हिंदी (भारतीयांसाठीचा अरबी शब्द) म्हणून बोलावलं जातं. त्यांना हिंदू म्हटलं जात नाही. त्यांची सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक पार्श्वभूमी काहीही असली तरी.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरंच या मंदिराच्या निर्मितीमध्ये एक प्रभावी भूमिका निभावली आहे. पण याकडं एका राजकीय नेत्याचं राजकीय किंवा धार्मिक यश म्हणून पाहणं किंवा तसं दाखवणं हे दूरदृष्टीचं ठरणार नाही.
 
याबाबत संघर्ष होणं स्पष्ट आहे. कारण सध्या भारतात धर्माशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर राजकारण सुरू होतं. त्याउलट अरब जगतात अशा गोष्टीला स्थान नाही.
 
धार्मिक भावनेशी संबंधित कोणत्याही कामाचं राजकारण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी अरब प्रदेशातील बहुतांश भागात हा मुद्दा धार्मिकच राहील.
 
जगाच्या या कोपऱ्यामध्ये धर्माचा सार्वजनिक जीवनात सहभाग तर असतो, पण शक्यतो त्याचा राजकीय चर्चेत कधीही समावेश होत नाही.
 
आखाती देशांमध्ये भारतीयांचा वाढता दबदबा
अरब प्रदेशात विशेषतः आखाती सहकार्य परिषद म्हणजे जीसीसीतील सहभागी देश बदलत आहेत. त्यांच्याबरोबर भारतीय समुदायही बदलत आहे. भारतीयांनी आणि इतर देशांच्या नागरिकांनी काम करून इथं भरपूर पैसा कमावला आहे.
 
त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे. अनेकजण तर मुलांचं भवितव्य आणखी चांगलं व्हावं म्हणून पाश्चात्य देशांमध्येही गेले आहे. पाश्चिमात्य देशांचं नागरिकत्व घेतल्यानंतर ते जास्त पैसा कमावण्यासाठी आखाती भागामध्ये परततात.
 
भारतीय जो पैसा पाठवतात त्यामुळं लाखो लोकांचं जीवनमान सुधारत आहेत. त्यामुळं केरळ, आंध्र प्रदेश, युपी आणि बिहारच्या ग्रामीण भागांमध्ये कौलाच्या घरांच्या जागी आता पक्की घरं तयार होत आहेत.
 
अनेक लहान-मोठे व्यवसाय सुरू झाले आहेत आणि त्यांची प्रगतीही झाली आहे. आखाती देशांमधून येणाऱ्या पैशामधून शेकडो-हजारो लोकांचं करिअर बनलं आहे.
 
अलीकडच्या काही वर्षांमध्ये या भागात भारतीयांचं प्रोफाईलही बदललं आहे. आता ते फक्त मोठ्या प्रकल्पांमध्ये मजुरीच करत नाहीत. तर ते डॉक्टर, इंजिनीअर आणि कॉर्पोरेट प्रमुख म्हणून सन्मानानं कामही करत आहेत.
 
आखाती देशांमध्ये शहरं विकसित होत आहेत. तेलावरील अवलंबित्व कमी करून उच्च तंत्रज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
त्यामुळं भारताच्या ऊर्जेच्या गरजा आणि भारतीय कौशल्य त्यातही विशेषतः आयटी क्षेत्रासाठी उपलब्ध असलेलं भारतीय मनुष्यबळ यामुळं हे नातं अधिक महत्त्वाचं ठरतं. धार्मिक मुद्द्यांनंतरही हे नातं अशाच प्रकारे अनेक वर्ष समृद्ध होत राहणार आहे.
 
यूएई म्हणजे सौदी अरेबिया नाही
एक आणखी बाब आहे जिच्याकडं कायम दुर्लक्ष केलं जातं आणि ती विस्मरणातही जाते. उलट हे अधिक लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
 
ती म्हणजे संयुक्त अरब अमिरात (यूएई) म्हणजे काही इस्लामच्या दोन पवित्र मशिदी असलेलं सौदी अरेबिया नाही.
 
आधुनिकीकरणाच्या अलीकडील प्रयत्नांनंतरही सौदी अरेबियाचा एक स्वतंत्र मार्ग आहे आणि ते त्याचाच वापर करतील.
 
त्याउलट यूएई खूप लहान आहे. पण एव्हिएशन हब बनणे, री एक्सपोर्टचं बिझनेस मॉडेल तयार करणं आणि जगभरातील कौशल्यवान कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्याच्या दिशेनं त्यांनी पावलं उचलली आहेत.
 
अशाप्रकारच्या महात्त्वाकांक्षा, इतरांचा स्वीकार करणं, एकमेकांच्या गरजा आणि संवेदना समजून घेणं आणि विश्वासावर अवलंबून असतात.
 
याचं एक उदाहरण अबू धाबीतील अब्राहमिक फॅमिली हाऊस आहे. त्यात एक मशीद, एक चर्च, एक सिनगॉग (ज्यूंचं प्रार्थना स्थळ) आणि एका व्यासपीठाचा समावेश आहे.
 
ज्यादिवशी मंदिर प्रकल्पाची घोषणा झाली होती, त्यादिवशी सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाली होती. दुबईतील एका प्रसिद्ध व्यक्तीनं ट्वीट केलं होतं, "संयुक्त अरब अमिरातमध्ये अनेक भारतीय ज्या समस्यांचा सामना करत आहेत, त्यावर एका मंदिरानं कसा तोडगा निघेल?" असं त्यात म्हटलं होतं.
 
यासाठी त्यांना ट्रोल करण्यात आलं. शेवटी त्यांना ट्वीट डिलीट करावं लागलं. ही विजयोत्सवाची सुरुवात होती. पण त्यामुळं याठिकाणी भारतीयांनी मिळवलेल्या यशाचं महत्त्व कमी केलं आहे. पण हा केवळ एक अपवाद होता, अशी आशा केली जाऊ शकते.
 
शेख झायेद या भव्य मशिदीच्या जवळ एक भव्य मंदिर संयुक्त अरब अमिरातच्या सर्वांना सामावून घेण्याची भावना अधिक दृढ करेल. पण त्याच्याशी कोणताही राजकीय उद्देश किंवा महत्त्वाकांक्षा संलग्न असता कामा नये.
 
एक भव्य मंदिर हे राजकीय विजयाऐवजी शांतता आणि सद्भावनेचं प्रतीक म्हणून ओळखलं जायला हवं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवारांनी दिले आव्हान, आता राष्ट्रवादीची खरी लढत सुप्रीम कोर्टात होणार !