Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या मंदिरात भाऊबहीण एकत्र दर्शनाला जाऊ शकत नाहीत, कारण

या मंदिरात भाऊबहीण एकत्र दर्शनाला जाऊ शकत नाहीत, कारण
, गुरूवार, 8 फेब्रुवारी 2024 (12:11 IST)
लाखोजू श्रीनिवास- आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर असं एक मंदिर आहे, तिथं भाऊबहीण एकत्र दर्शनाला जाऊ शकत नाहीत. हे आहे प्राचीन राधा वेणूगोपाल स्वामी मंदिर. आंध्र-ओडिशा सीमेवर श्रीकाकुलम जिल्ह्याच्या मेलियापुट्टीमध्ये हे मंदिर आहे. राधा वेणूगोपाल स्वामी मंदिराला आंध्रचं खजुराहो मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. मंदिराची निर्मिती आणि मूर्तीकला यामध्ये सौंदर्यशास्त्रातील अनेक खास वैशिष्ट्ये आहेत.
 
त्यामुळंच या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. या भागातील अनेक नवविवाहित जोडपी त्यांच्या पहिल्या रात्रीपूर्वी आधी या मंदिराला भेट देऊन पूजा करतात. जवळपास 200 वर्षांपासून याठिकाणी ही प्रथा सुरू आहे. या मंदिराच्या निर्मितीमागंही रंजक इतिहास आहे.
 
कलिंगा स्थापत्य शैलीतील मंदिर
राधा वेणूगोपाल स्वामी मंदिर मेलियापुट्टीच्या मुख्य मार्गावर स्थित आहे. रस्त्यावरुन पाहिलं असता दोन्ही कमानींमधून हे मंदिर अत्यंत सुंदर दिसतं. त्या कमानींमधून पुढं विशाल प्रांगणात प्रवेश करताना मंदिराच्या गर्भगृहापर्यंत जाणाऱ्या दगडी पायऱ्यांपासून सुरू झालेला परिसर अत्यंत सुंदर मूर्तींनी भरलेला आहे.
 
मंदिराच्या चारही बाजूला असलेल्या भींतींवर विविध दगडांमध्ये कोरलेल्या मूर्ती पाहायला मिळतात. तर मंदिराच्या छतावर कोरलेल्या फुलांच्या आकृती सारख्याच वाटतात. पण जवळून पाहिल्यानंतर त्यातही पूर्णपणे वेगळेपणा जाणवतो. बीबीसीची टीम याठिकाणी पोहोचली तेव्हा इथं कोणीही भाविक नव्हते. मंदिरात येणारे भाविक शक्यतो दर्शनानंतर मंदिराच्या भींतींवरील मूर्ती पाहू लागतात. काही लोक मंदिरातील पुजाऱ्यांना मूर्ती आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबाबत विचारतात. मंदिराचे मुख्य पुजारी गोपीनाथ यांनी याबाबत बीबीसीला माहिती दिली. मंदिराची रचना कलिंगा स्थापत्य शैलीतील असून मंदिराची निर्मिती 1840 मध्ये झाली असल्याचं ते म्हणाले.
 
महाराणी उत्तरा यांनी बांधलं होतं मंदिर
मंदिराच्या इतिहासाबाबत मुख्य पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1840 च्या दशकात मेलियापुट्टी परिसर पारलामिकीडीचे महाराज वीरवीरेंद्र प्रताप रुद्र गजपती नारायण देव यांच्या प्रशासनाच्या अधिपत्याखाली होता.
पुजारी गोपीनाथ म्हणाले की, "महाराणी विष्णूप्रिया यांनी महाराजांना मूर्तीकलेचा प्रसार होऊन याचं सौंदर्य वाढावं म्हणून एक मंदिर बांधण्याची विनंती केली. त्यांच्या इच्छेनुसार त्याठिकाणी मंदिर बांधण्यात आलं.
 
"मंदिराच्या निर्मितीसाठी महाराजांनी पुरी, ओडिशा मधून शिल्पकारांना बोलावलं. मंदिरात येणाऱ्या लोकांना 64 कलांची माहिती व्हावी म्हणून मंदिरात मूर्ती तयार करण्यास त्यांना सांगण्यात आलं." त्यामुळं शिल्पकारांनी 64 कलांची माहिती देण्यासाठी कोरीव काम करून मूर्ती याठिकाणी आणल्या. त्यानंतर मंदिराच्या चारही भिंतीवर त्या मूर्ती ठेवण्यात आल्या आणि नंतर मंदिराचं बांधकाम सुरू झालं, असं गोपीनाथ रथ म्हणाले.
 
या मंदिरात भगवान श्रीकृष्णाला राधा वेणूगोपाल स्वामींच्या रुपात पुजलं जातं. "मंदिराच्या पायऱ्यांपासून ते शिखरापर्यंत प्रत्येक भाग काहीतरी महत्त्वाची माहिती देतो. मंदिराच्या चारही भींतींवर एक फूट लांब आणि एक फूट रुंद अशा 64 कलांशी संबंधित मूर्ती लावलेल्या आहेत. दर्शनाला येणारे भाविक मंदिराच्या चारही बाजूला असलेल्या या मूर्ती पाहण्यात खूप वेळ घालवतात, असं गोपीनाथ म्हणाले.
 
पहिल्या रात्रीपूर्वी पूजा करतात नवविवाहित दाम्पत्य
गोपीनाथ म्हणाले की, मंदिरात येणाऱ्यांना वैदिक शास्त्र आणि 64 कलांचा सार समजावून सांगितला जायला हवा. या मूर्तींमध्ये प्रेमाशी संबंधित मूर्तींचाही समावेश आहे. इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (INTAC)चे प्रवक्ते वाविलपल्ली जगन्नाथ नायडू म्हणाले की, "त्यावेळी सेक्सबाबत फार जागरुकता नव्हती. सार्वजनिकरित्या यावर चर्चा केली जात नव्हती.
 
त्यामुळं मंदिरांच्या भिंतींवर शिल्प तयार करण्यात आली. जे लोक मंदिरात येतील त्यांना मूर्तींच्या माध्यमातून त्या तयार करणाऱ्यांचा नेमका उद्देश काय होता, हे लक्षात येईल." गोपीनाथ म्हणाले की, मंदिराच्या आसपासच्या गावांतील नवविवाहित जोडपी आधी या मंदिरामध्ये येतात. "मंदिराच्या आसपासच्या जवळपास 50 गावांमधील नवविवाहित जोडपी लग्नानंतर पूजा करण्यासाठी सर्वांत आधी या मंदिरात येतात. ते मंदिराच्या चारही बाजूंचं तीन वेळा दर्शन घेतात. मंदिराच्या आसपास कामूक मूर्तीही आढळतात." गोपीनाथ म्हणाले की, जोडप्यांनी ते पाहिल्यानंतरच त्यांच्या पहिल्या रात्रीची तयारी केली जाते. गोपीनाथ यांच्या मते, "मंदिर बांधलं त्यावेळी सुरू केलेली ही परंपरा आजही कायम आहे. मुलं असलेली दाम्पत्येही मंदिरात येतात आणि दर्शन घेतात."
 
'भाऊ-बहीण एकत्र येत नाही'
गोपीनाथ असंही म्हणाले की, "एकाच कुटुंबात जन्मलेले किंवा विशेषतः भाऊ बहीण या मंदिरात येत नाहीत. मंदिरांच्या भींतींवर लैंगिक मुद्रांमधील मूर्ती आहेत. त्यामुळं मंदिरात येणाऱ्या तरुण-तरुणींना काहीसं विचित्र वाटतं. तसंच बहीण-भावांनाही मंदिरात आल्यानंतर लाज वाटते." त्यामुळं एकदा असं म्हटलं गेलं होतं की, बहीण-भावाने एकत्र मंदिरात जाऊ नये. त्यामुळ अनेक तरुण तरुणी स्वामीच्या पूजेसाठी बाहेर जातात. "मंदिरात सेक्सशी संबंधित खूप मूर्ती होत्या. त्यामुळं काही निर्बंध होते. पण सध्या असे काहीही नियम नाहीत. "काही लोक मात्र याला त्या काळातील परंपरा मानतात आणि आजही याचं पालन करतात. दरवर्षी होळीच्या उत्सवाच्या वेळी मोठ्या संख्येनं तरुण या मंदिरात येतात," असंही गोपीनाथ म्हणाले.
 
मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे मंदिर
गोपीनाथ म्हणाले की, एकेकाळी या मंदिराला आंध्र खजुराहो म्हटलं जात होतं. याठिकाणी काही डोंगर किंवा शिळा आहेत ज्यातून कृष्णाच्या जीवनातील अनेक क्षणांचं दर्शन होतं. तसंच मेलियापुट्टी राधा वेणूगोपाल स्वामी मंदिराचं नाव घेताच मूर्तीकलेचं सौंदर्य डोळ्यासमोर उभं राहतं. त्यामुळं त्याला आंध्रचे खजुराहो म्हटलं जातं. दुसरे एक पुजारी सत्यनारायण यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. "मंदिराच्या छतावर 64 दगडी फुलं आहेत. ते सर्व एकसारखेच दिसतात. पण बारकाईनं पाहिल्यास प्रत्येक फूल पूर्णपणे वेगळं असल्याचं लक्षात येतं. ते 64 कलांचे प्रतीक आहेत. या भागातील दुसऱ्या कोणत्याही मंदिरात अशा प्रकारची वास्तुकला पाहायला मिळत नाही," असंही ते म्हणाले.
 
मंदिरांची निगा राखण्याकडं दुर्लक्ष
दगडापासून तयार केलेल्या या मंदिरावर रंग-रंगोटी करण्यात आली होती. त्यामुळं त्याचं वैशिष्ट्य लक्षात येत नाही. "संपूर्ण मंदिर दगडापासून तयार करण्यात आलं आहे. पण ते अनेक रंगांनी रंगवण्यात आलं आहे," असं ते म्हणाले. योग्य प्रकारे देखभाल केली गेली नसल्यामुळं दगडांची झीज झालेली दिसत होती. त्यामुळं एका भाविकानं रंगकाम केलं, असं सत्यनारायण म्हणाले.
 
"या मंदिराच्या निर्मितीमागं तत्कालीन महाराज गजपती नारायणदेव यांचा मुख्य उद्देश जोडप्यांना वेद, कला आणि सेक्सबाबत शिक्षित करणं हा होता," असं मंदिराचे प्रवक्ते जगन्नाथ नायडू म्हणाले. "मंदिराच्या निर्मितीपासूनच शाही कुटुंबाकडून याची देखभाल केली जात होती. पण गेल्या काही काळात यासाठी निधी मिळू शकलेला नाही. त्यामुळं इतिहास आणि खास वैशिष्ट्यं असलेलं हे मंदिर दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर जात आहे," असं ते म्हणाले. "पुरातत्व विभाग किंवा अशा संघटना आणि सरकारनं या मंदिराचं संवर्धन करायला हवं. मंदिराच्या मूर्तींमधील मूर्तीकलेत लपलेलं ज्ञान आणि सौंदर्य भावी पिढीपर्यंत नेणं ही आपली जबाबदारी आहे," असंही ते म्हणाले. 

Published By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विजय सेतुपतीच्या ऑन स्क्रीन आईचे मुलाने केलेल्या मारहाणीमुळे मृत्यू