Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सांस्कृतिक भारत : केरळ

सांस्कृतिक भारत : केरळ
, मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 (11:00 IST)
केरळ या नावाच्या स्रोताबद्दल संदिग्धता आहे. जुन्या मल्याळी भाषेतील शब्दफोडीप्रमाणे केरा (नारळाचे झाड) व आलम (परिसर) असा केरळमचा अर्थ होतो. पारंपरिक तमिळ भाषेप्रमाणे केरळची चेरा आलम अशी फोड होते. त्यावरून शब्दाचा अर्थ डोंगरापलीकडील उतरणीचा प्रदेश असा होतो. केरळच्या मूळच्या स्थानिक रहिवाशांना केरळीय अथवा मल्याळी असे म्हणतात. पुराणात केरळासंबंधी अनेक संदर्भ आहेत. एका दंतकथेनुसार केरळची नि‍र्मिती विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुरामांनी समुद्रात आपला परशू फेकून केली, असे सांगितले जाते. 
 
केरळचा प्राचीन इतिहास आख्यायिकांच्या माध्यमातून साकार होतो. सर्वात लोकप्रिय आख्यायिका म्हणजे केरळची भूमी ही समुद्राच्या तळातून वर आली, अशी आहे. केरळची संस्कृती ही भारतीय संस्कृतीच्या मूळ प्रवाहाचा अविभाज्य भाग आहे. पूर्वेला उंच पश्चिम घाट व पश्चिमेला अरबी समुद्र यांच्यामध्ये या राज्याची रूंदी 35 किमी पासून 120 किमी पर्यंत आहे. भौगोलिक रचनेनुसार हे राज्य, खोरे व टेकड्यांचा भाग, मध्य सपाट प्रदेश व किनारपट्टा असे विभागलेले आहे.
 
केरळातील अंदाजित 50 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. नगदी रकमेची पिके या राज्याचे प्रमुख वैशिष्ट्य समजले जाते. नारळ, रबर, काळी मिरी, वेलदोडे, आले, सुंठ, कोको, काजू, पोफळी (पाम), कॉफी व चहा या पिकांचे प्रमुख उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते.
 
केरळ हे विविध प्रकारच्या रंगीबेरंगी सण-उत्सवांचे माहेरघर आहे. ओणम हा केरळातील मु्ख्य सण असून धान कापणीच्या हंगामाशी या सणाचे नाते आहे. वल्लमकली किंवा होड्यांची स्पर्धा हे केरळचे वैशिष्ट्य. पुन्नमदा लोक बोट उत्सव सोडून सर्व बोट उत्सवांना धार्मिक मूळ आहे. वदक्कुमनाथ हे त्रिसूर मंदिर येथे पुरम सण एप्रिलमध्ये साजरा करतात. अतिशय भव्य प्रमाणात हत्तीची मिरवणूक व अप्रतिम फटाका शो हे या सणाचे वैशिष्ट्य.
 
केरळचे अतिशय आकर्षक असे वन्यप्राणी थेक्राडी अभयारण्य पालाकड जिल्ह्यात पेरियार नदीच्या काठावर परविकुलमला आहे. तसेच मनंथवेकी, सुलतान, बथेरी व वायनाड ही इतर अभयारण्ये होत. केरवालम हे समुद्रकिनाऱ्यावरील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. थिरूअनंतपुरमचे पद्मनाथस्वामी मंदिर हे दक्षिण भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
 
webdunia
भगवान अयप्पांचे साबरमिला मंदिर हे पथनामथिता जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. थिरूअनंतपुरम हे मंदिरे, मशिदी, चर्चेस यांचे शहर आहे. त्याच्या सभोवताली वेली लगुन, नेय्यर डॅम व पोनमुदी थंड हवेची स्थळे म्हणून ओळखली जातात. आदी शंकराचार्यांचे जन्मगाव कलाडी गुरूवायुरचे श्रीकृष्ण मंदिर, मळमपुझा पालघाट (कासारगोड) बॅकेल बीच पुक्कोड, लेक, कुरूवाद्विप, पक्षीपथलम व एडक्केल गुहा (वायनाड) ही इतर काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. तसेच मुन्नार व पीरमाडे ही दोन केरळची प्रसिद्ध डोंगरी पर्यटनकेंद्रे आहेत.
 
केरळ हे भारतातले दक्षिण राज्य आहे. केरळ म्हणजे नारळांच्या झाडांची भूमी. केरळची राज्यभाषा व लोकभाषा मल्याळम असली तरी राज्यात काही बोलीभाषा बोलल्या जातात. राज्यातील कादर लोक जी भाषा बोलतात तिला कादर या नावानेच संबोधले जाते. कोडागा लोक जी भाषा बोलतात तिलाही कोडागा या नावानेच ओळखतात. मात्र कूडीया, मालाईकुडी व मालेरू लोक जी भाषा बोलतात तिला तुलु म्हणतात. मुदुगर लोकांच्या भाषेला मुदुगा म्हणतात.
 
चोलानायक्कन्स, कुरूंबास, काटूनायकान्स, कादरस आणि कोरागासारे हे पाच प्रकारचे आदिवासी गट केरळात आढळून येतात. या व्यतिरिक्‍त केरळातल्या डोंगरकपारीत काही आदिवासींचा रहिवास आहे. आदियान, अलार, अरानदन/येरादन, चोलानायक्कन, येरावेल्लन, मलाप्पुलयन, इरूलन, कदार, कम्मरा, कनीक्कर, कट्टूनायकन, कोचू वेलन, कोंडाकपूस, कोनदारेड्डीस, कोरगा, कोरगर, कोटा, कुडीया, मेलाकुडी, कुरीचन, कुरूमान्स, कुरूंबास, कुरूंबार, महा मलासार, मलाइ आर्यन, मलाइ पंदारम, मलाइ वेदान, मलाक्कुरवन, मलायन, मन्नन, मराती, मुथन, मुदुगर, मुदुवन, मुथुवन, पलीयन, पानन, पनियन, परायन, वुल्लादन, वुरले आदी आदिवासी डोंगरदऱ्यात वास्तव्य करून राहतात. साहजिकच यांच्या भाषा प्रमाणभाषेपेक्षा वेगळ्या असतात.
 
नाग मंदिर (साप मंदिर. ‘सापांचे घर’ असा वाक्प्रचार केरळात रूढ आहे. त्रिवेंद्रम जवळच्या हरिपाद गावाजवळ मन्नारसाला हे सर्प मंदिर असून इथे सर्प पूजा केली जाते.) गुरूवायुर येथे वसलेले श्रीकृष्ण मंदिर तसेच श्रीराम मंदिर, विनायक मंदिर, शिव मंदिर, हनुमान मंदिर, अय्यप्पा मंदिर, मुरूगा मंदिर, भगवती मंदिर आदी मंदिरे केरळात पाहण्यासारखी आहेत. 
 
- डॉ.सुधीर राजाराम देवरे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘जलसा’ चित्रपटात नाशिकची शीतल अहिरराव झळकणार