Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपचा नवा 'गडकरी'!

भाजपचा नवा 'गडकरी'!

अभिनय कुलकर्णी

PR
PR
एरवी 'नितीन गडकरी' या नागपुरातल्या महाल भागातल्या 'गडकरी वाड्यात' रहाणार्‍या तरूणाचे करीयर काय असते? जमेल तेवढे नि जास्तीत जास्त शिक्षण घेणे आणि 'अब्रॉड' जाण्याचे प्रयत्न करणे. गेला बाजार पुणे-मुंबईत जाऊन उच्चपदस्थ नोकरी कमाविणे. अगदीच दुसरा मार्ग स्वीकारायचा, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाऊन पूर्वांचलापासून देशात कुठेही 'स्वयंसेवक' नि त्यानंतर क्रमाक्रमाने येणार्‍या जबाबदार्‍या पार पाडणे. नितिन गडकरी या तरूणाने दुसरा मार्ग निवडला, पण त्यानंतर तिसरा रस्ता स्वतः तयार केला. त्यांच्या पुढील आयुष्यातील 'मैलाचा दगड' ठरलेल्या 'रस्ते बांधणारा मंत्री' या ओळखीची सुरवात ही अशी स्वतःसाठी रस्ता बनवून झाली.

२७ मे १९५७ रोजी जन्म झालेल्या गडकरींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जवळ वाटावा हे तत्कालीन ब्राह्मणी मानसिकतेला धरूनच होते. संघाच्याच माध्यमातून गडकरींनी पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करायला सुरवात केली. १९७६ या साली त्यांचे सार्वजनिक जीवन सुरू झाले. भाजपची प्रचार पत्रके, बातम्या वृत्तपत्रांच्या कार्यालयात आणून देणारे गडकरी नागपुरातल्या अनेक ज्येष्ट पत्रकारांना आजही आठवतात. हा पोरसावदा तरूण पुढे जाऊन त्याच पक्षाचा अध्यक्ष होईल, असं साधारण तीस वर्षांपूर्वी सांगितलं असतं, तर कुणीही त्याला वेड्यात काढलं असतं. पण आज हे सत्यात उतरलं आहे.

विद्यार्थी परिषदेच्या राजकारणातच त्यांना 'पॉलीटिकल' ब्रेक मिळाला. या राजकारणात त्यांनी आधी आपला जम बसवला. त्यातून विविध पदे त्यांच्याकडे चालत येत गेली. स्वतःचं वर्तुळ तयार होत गेलं. यातूनच १९८१ मध्ये त्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षपद मिळाले.

webdunia
PR
PR
अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हा घीसापीटा वाक्प्रचार त्यांच्या बाबतीतही अक्षरशः खरा ठरला. १९८९ मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून लढवली. पण त्यात ते अपेशी ठरले. मग नागपूरचा पदवीधर मतदारसंघ त्यांनी बांधला. या माध्यमातून ते पहिल्यांदा आमदार बनले. त्यानंतर ते सातत्याने याच मतदारसंघातून निवडून येत आहेत. २००२ मध्ये तर ते बिनविरोध निवडून आले. गडकरींची मतदारसंघ बांधण्याची ताकद काय असते ते यातून कळून यावे.


एकीकडे आमदार झाल्यानंतर पक्षीय जबाबदार्‍याही त्यांच्यावर पडत गेल्या. १९९२ मध्ये ते पक्षाचे राज्य सरचिटणीस बनले. १९९२ मध्ये नागपूर महापालिकेत पक्षाला मिळालेला विजय हा त्यांच्याच राजकीय ताकदीचा भाग होता. गडकरी खर्‍या अर्थाने लोकांसमोर आले ते १९९४ मध्ये युती सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद मिळाल्यानंतर. या खात्याच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम अजोड आहे. त्यांचे विरोधकही त्यांचे याबाबतीत कौतुक करतात. गडकरींनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात मुंबईचा वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी तब्बल ५५ उड्डाणपूल बांधले. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे हे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्नही त्यांनीच साकार केले. मेळघाट आणि विदर्भातील आदिवासी भागातही त्यांनीच पक्के रस्ते बांधले. पैसा नसतानाही खासगी आणि सरकारी भागिदारीतून रस्ते सुधारण्याचा त्यांचा 'बीओटी' पॅटर्न खूप गाजला. पण त्यामुळे महाराष्ट्रात रस्ते चांगले झाले. विशेष म्हणजे पुढे युतीचे सरकार पुन्हा निवडून आले नाही, तरीही गडकरींच्या कामाचे महत्त्व एवढे की त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या कामांमुळे अनेक राज्यांनी त्यांना त्यांच्या राज्यात रस्तेविषयक कामांसाठी सल्लागार म्हणून त्यांना नेमले.

विकासात्मक दृष्टिकोन हा गडकरींचा गाभा आहे. त्यामुळेच येन केन प्रकारेण विकास झाला पाहिजे. त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. विकासाची दूरदृष्टीही त्यांच्यात आहे. म्हणूनच गेल्या वर्षी त्यांनी नागपूरच्या विकासासंदर्भात त्यांनी स्टेड़ीयममध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केले होते. तंत्रज्ञानाचीही त्यांना आवड आहे. म्हणूनच नागपूरमध्ये टेक्नॉलॉजी पार्क उभारणीसाठी ते आग्रही होते. त्यांची स्वतःची वेबसाईट आहे. शिवाय ब्लॉगच्या माध्यमातूनही ते लोकांना भेटत असतात.

१९९९ पसून ते विधान परिषदेत विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत आहेत. बिनधास्त आणि बेधडक ही त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे या वृत्तीला साजेसे आरोप करण्याची त्यांची पद्धत विधान परिषदेत चांगलीच गाजली आहे.

वैयक्तिक जीवनातही गडकरी अत्यंत यशस्वी आहेत. पर्यावरणाविषयी असेलल्या आस्थेतूनच त्यांनी व्यवसायही तसाच निवडला. पारंपरिक व गैरपारंपरिक स्त्रोतातून उर्जानिर्मितीबद्दल त्यांना जाण आहे. म्हणून बाजोडिझेलचा वापर गडकरींनी सुरू केला. बायोडिझेलचे देशातील पहिले आऊटलेटही त्यांचेच आहे. त्यांचा पूर्ती ग्रुप सातत्याने पुढे यशस्वी वाटचाल करतो आहे.

गडकरी टिपीकल मध्यमवर्गीय आहेत. पत्नी कांचन आणि मुले निखिल व सारंग आणि मुलगी केतकी असा गडकरी परिवार आहे. खाण्याचे शौकीन असलेल्या गडकरींचे खाद्यप्रेम त्यांच्या आकारावरूनही कळून येते. पण सच्च्या दिलाचा हा नेता खाण्यावर आणि लोकांवर मनापासून प्रेम करतो. त्यांना वैयक्तिक विचारलं तर 'मी महत्त्वाकांक्षी नाही. मी कधीच काही मागत नाही. काही मिळावं असं मला वाटत नाही. मराठी नाटकं पहावीत. गाणी ऐकावीत. हा माझ्या लाईफचा फंडा आहे, असं त्यांचं म्हणणं.

कॉंग्रेस असू दे वा जनसंघ-भाजप मुख्य प्रवाहातल्या या दोन राष्ट्रीय पक्षांचे अध्यक्षपद मराठी माणसाला कधीच मिळालं नव्हतं. आज नितीन गडकरींच्या रूपाने ते त्यांना मिळाले आहे. अर्थात ते निभावणे सोपे नाही, याची कल्पना त्यांनाही असेल. कारण सलग दोन निवडणुकांत विरोधी बाकांवर बसून मनोधैर्य खचलेल्या नि अंतर्गत लाथाळ्यांनी विकोपाला गेलेल्या मतभेदांना गाडून गडकरींना पक्षाला नवी उभारी द्यायची आहे. महाराष्ट्राचे 'गडकरी' आता भाजपचा ढासळलेला दिल्लीतला 'गड' राखण्यास सिद्ध झाले आहेत. आपल्या नावाला ते किती किती राखतात, ते आगामी काळात कळून येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi