Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिलीप चित्रे, भोपाळ नि मी

- राजकुमार केसवानी

दिलीप चित्रे, भोपाळ नि मी
, शुक्रवार, 11 डिसेंबर 2009 (18:57 IST)
ND
ND
शेवटी एखादी बातमी इतकी वाईट कशी असू शकते? इतकी वाईट की तीच सांगतेय दिलीप चित्रे यांचे निधन झाले आहे...

इतक्या वाईट बातम्यांचा त्याचवेळी गळा का दाबला जात नाही?

जगातल्या चांगल्या गोष्टींना 'मृत्यू' देणार्‍या अशा सगळ्या वाईट बातम्यांना प्रसारीत व्हायची परवानगीच नको मिळायला. काही वेळापूर्वीच उदय प्रकाश यांनी (हिंदीतील प्रसिद्ध साहित्यिक) बातमी दिली, दिलीप चित्रे यांचे निधन झाले. उदय काय सांगतोय ते क्षण-दोन क्षण कळलेच नाही. कळले तेव्हा, वाटलं, की ही बातमी खोटी असल्याचं जोरजोरात ओरडून सांगू. शिव्या देऊ, काही स्वतःला, काही जगाला, काही या मृत्यूचे नियंत्रण करणार्‍या नियंत्याला.

मग काही वेळाने दिलीपभाईचा हसरा चेहरा समोर आला. तेव्हा रडू आवरले नाही. आणखी काही वेळ गेला नि त्याच्या आठवणी चित्रपटासारख्या डोळ्यासमोरून सरकू लागल्या.

दिलीप चित्रे आणि भोपाळ. भारत भवनमधील वागर्थ या कवितांविषयक विभागाचे ते संचालक होते. भोपाळमध्ये आल्या आल्या त्यांचे निरिक्षण तरी बघा काय होते! म्हणे, 'यार, हे तर नंबरी लोकांचे शहर आहे.' भोपाळमध्ये रहिवासी भागांची नावे 1250,1464,1100 क्वार्टर्स, 74 बंगले, 45 बंगले, 8 बंगले व 4 बंगले अशी आहेत. त्यांचे हे गमती गमतीत केलेले निरिक्षण पुढे त्यांच्याच बाबतीत वास्तव म्हणून उभे ठाकले. भोपाळच्या 'नंबरी' लोकांनी त्यांचे 'नंबरीपण' दाखवून दिले....

ही गोष्ट १९८१ किंवा ८२ ची असावी. इंदूरमध्ये जाणार्‍या एका बसमध्ये दिलीप आणि त्यांची पत्नी विजया बसल्या होत्या. त्यांच्या मागच्याच सीटवर मी बसलो होतो. पण त्यांना हे माहित नव्हते. इंदौरमध्ये दलित साहित्यविषयक चर्चा होती. विजयाजींनी विचारले, 'दिलीप, इंदौरमध्ये कुठे नि कसे पोहोचायचे ते माहित आहे ना?'

'राणी साहेब, चिंता करू नका. तिथे बस स्टॅंडवर आपल्यासाठी रथ आलेला असेल. तो आपल्याला घेऊन जाईल.'

दिलीपजींना घेऊन जाण्यासाठी मध्य प्रदेश साहित्य परिषदेचे अधिकारी पूर्णचंद्र रथ येणार होते. रथाला हा संदर्भ होता.

मागून मी आवाज दिला. 'दिलीप भाई, रथ मिळेल न मिळेल, तुम्ही माझ्या रिक्षातून येऊ शकता.' त्यांनी मागे वळून पाहिले, नि म्हणाले, 'नक्की. रथालाही रिक्षातच टाकून घेऊ. आणि काय?'

या आनंदी नि सदाउत्साही व्यक्तीशी मृत्यूने क्रूर खेळ खेळला. त्यांचा तरूण मुलगा आशय त्यांच्यापासून हिरावून घेतला. आशय १९८४ च्या भोपाळ विषारी वायू दुर्घटनेचा बळी ठरला. १९ वर्षे तो आजाराशी झुंजला आणि २००३ मध्ये दिलीपभाई आणि विजयाजींना एकटे सोडून गेला.

या धक्क्याने हे दाम्पत्य कोसळलेच होते. पण तरीही त्यांनी परस्परांना सावरले. परस्परांना जगण्यासाठी उत्तेजन देण्यामागचे इंगित एकच होते- आणखी चांगले जगून दाखविणे. जगातल्या प्रत्येक अशा गोष्टीशी निगडित होणे की त्यामुळे जगण्याला नवा अर्थ लाभेल. विस्तार होईल. या गोष्टीमुळे इतरांच्या जगण्यात नवे रंग भरता येईल. जगण्याचा उत्साह वाढवेल.

आजही माझ्या ई- मेल बॉक्समध्ये दिलीप भाईंनी पाठवलेली शेकडो निमंत्रण पत्रे पडली आहेत. कधी कुठल्या कार्यक्रमाची. कधी कुठल्या पुस्तकाची, किंवा कुठली कविता, लेख. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या नेटवर्किंग ग्रुप्सचे सदस्य होण्यासाठीची निमंत्रणे. काहीच नसेल तर फेसबुकमार्फत पाठवलेल्या शुभेच्छा. फुलांचा गुच्छ वा रोप.

आतापर्यंत ते कितीतरी आजारांनी ग्रस्त होते. त्यांना आतड्याचा कर्करोगही होता. मला बर्‍याच उशिरा हे कळले. कळल्यानंतर त्याच दिवशी मी त्यांना एक मेल पाठवला.

दिलीप भाई
दुःखात आहे.
नेहमीच तुमच्या आजाराची बातमी कळत असते. पण तुम्हाला आतड्याचा कर्करोग आहे, हे माहित नव्हते.
या क्षणी मी स्वतःला इतका लाचार समजतो आहे, की जणू माझे हात-पाय बांधून कुणी फेकून दिले आहे आणि मी असहायरित्या पहातो आहे. पण एकच उमेद आहे.- तुमचा चिवटपणा आणि विजीगीषी वृत्ती. तुमच्याविषयीची बातमी कळत नाही, असे होत नाही. तुमची सक्रियता ठळकपणे दिसून येते. पण त्यावेळी कधी वाटलेच नाही, की तो 'परमेश्वर' तुमच्याशी काही खेळ खेळतोय ते.

पण एक कानगोष्ट सांगतो दिलीपभाई, हा परमेश्वर आपल्या प्रियजनांशी जे खेळ खेळतो ना ते हरण्यासाठी. मोठी माणसे नाही का लहान मुलांसोबत खेळताना जिंकण्यापेक्षा हरण्यात आनंद मानतात ना तसे.

मी आत्ताही तुम्ही विजयी होताना नि परमेश्वराला आनंदी होताना पहातोय.

आमेन.

बेपर्वाई आणि निष्काळजीपणाबद्दल माफी आणि प्रार्थनेसह,

राजकुमार

दिलीप भाई मोठे होते. त्यांनी मला माफ केले. पण मी त्या परमेश्वराला कधीच माफ करणार नाही, ज्याने या दुनियेतून चांगल्या लोकांना उचलून आपल्याकडे नेले....

(राजकुमार केसवानी हे हिंदीतील प्रसिद्ध पत्रकार आहेत. त्यांच्या 'बाजे वाली गली' या ब्लॉगवरून साभार)

(अनुवाद- अभिनय)

Share this Story:

Follow Webdunia marathi