Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुढीपाडवा : चैतन्याचा उत्सव

गुढीपाडवा : चैतन्याचा उत्सव
चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शालिवाहन शक आणि विक्रम संवत यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. भारतीय सौरपंचांगाची कालगणना या दिवसापासून सुरू होते. हा दिवस म्हणजे मराठी महिन्यातील पहिला महिना असणार्‍या चैत्र महिन्याची सुरुवात असते. चैत्र म्हणजे वसंत तुतील पालवीचं सुंदर मनोगत! या दिवसात असं एकही झाड नसतं ज्याला चैत्र शुद्ध प्रतिपदेचा खास मोहोर सुटत नाही. या दिवसात प्रत्येक झाड मोहोरलेलं असतं. सगळी झाडं अशी मोहोरलेली असली तरी चैत्र शुद्ध प्रतिपदेला कडूनिंबाचं स्थान मोलाचं असतं. कडूनिंबाच्या झाडाखाली बसून ऋषिमुनींनी तप केलं. या झाडाचा पाला पाचक असतो. या झाडाच्या नवीन पानामुळे सर्व प्रकारचे त्वचारोग नाहिसे होतात. म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला पोट नीट, व्यवस्थित राहावं यासाठी कडूनिंबाची पानं खाल्ली जातात. कडूनिंबाच्या पानामध्ये गूळ, काही प्रमाणात खोबरं टाकून त्याची गोळी केली जाते आणि ती या दिवशी खाल्ली जाते. 
 
चैत्र शुद्ध प्रतिपदा हा गुढीपाडव्याचा संकेत असतो. गुढी याचा अर्थ आनंदाचा प्रतिकात्मक भाग. याचे दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे या दिवशी येणार्‍या नव्या वर्षाचं स्वागत आनंदाने करणं आणि दुसरा भाग म्हणजेच नवं वर्ष चांगलं जावं यासाठी निसर्गाची प्रार्थना करणं. या प्रार्थनेत निसर्गाला हात जोडून विनवणी केली जाते की बा निसर्गा, आता अवकाळी पाऊस, गारपीट आणू नकोस. फळांचा राजा असलेला आंबा या दिवसात बहरतो, त्याला मोहोर फुटून झाडावर आंबे तयार होऊ लागतात. म्हणून काही प्रांतात गुढीपाडव्याच्या दिवशी देवाला आंब्याचा मोहोर वाहिला जातो. काही ठिकाणी या दिवशी देवाला आम्रफळाचा नैवेद्यही दाखवला जातो. गुढीपाडव्याचा सण आणखी एका गोष्टीसाठी महत्त्वाचा आहे. प्रभू श्रीराम रावणाचा वध करुन या दिवशी अयोध्येत परतले. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील लोकांनी आपापल्या दारासमोर गुढय़ा उभारल्या होत्या. तशा गुढय़ा उभारुन श्रीराम अयोध्येत परत आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. गुढी हे आनंदाचं प्रतीक आहे तसं ते मानवी ध्यासाच्या उंचीचंही द्योतक आहे. माणसाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे आपल्या डोक्यावर आकाशाचं छप्पर आहे म्हणून आपण मोठे आहोत. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये सूर्यपूजा केली जाते. फक्त महाराष्ट्रातच हा सण साजरा केला जातो असं नाही तर तो देशभर सर्वत्र साजरा होत असतो. गुढीपाडव्याचा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी संपूर्ण मुहूर्त मानला जातो. या दिवशी कोणत्याही कामाचा शुभारंभ केला जातो. तसा तो या दिवशी करणं पवित्र मानलं जातं.
 
भारतीय संस्कृतीत सरस्वतीपूजन आणि गुरुपूजनाने गुढीपाडवा साजरा केला जातो. भारतात गुढीपाडव्यापासून प्रभू रामचंद्राचं नवरात्र सुरू होतं. त्याचप्रमाणे देवीचं नवरात्रही या दिवसापासून बसतं. महाराष्ट्रात वनीच्या सप्तशृंगी देवीचं नवरात्र गुढीपाडव्यापासून सुरू होतं. बर्‍याच ठिकाणी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत नवरात्र साजरं करतात. या दिवसात अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते. या दिवसात नवे गहू आलेले असतात. या गव्हाच्या पोळीचा नैवेद्य देवाला दाखवल्याशिवाय त्या गव्हापासून बनवण्यात येणारे पदार्थ खाल्ले जात नाहीत. या दिवसात गहू, हरभरा, तांदूळ, ज्वारी, बाजरी अशा प्रमुख धान्यांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. तो दाखवताना देव आणि निसर्गाला प्रार्थना केली जाते की आम्हाला वर्षभर चांगलं धान्य खायला मिळू दे,  आमच्या श्वासाला नवा सूर्य प्रखर किरण देऊ दे, आमच्या अभ्यासाला तेज निर्माण होऊ दे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या नववर्षदिनी भगवतीची पूजा केली जाते. या दिवशी गुढीची आणि कुलदैवताची आवर्जून पूजा केली जाते. अशी पूजा करुन देवाला, निसर्गाला प्रार्थना केली जाते. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात, पंचांगाचं पूजन केलं जातं. पंचांगाचं वाचन या दिवसापासून सुरू केलं जातं. या दिवशी संवत्सर फल उलगडून सांगणार्‍या साहित्याचं सामूहिक वाचन केलं जातं. या प्रथेमुळे आपल्या शेतात धान्य कसं येणार आहे, आपल्याला हे वर्ष कसं जाणार आहे इत्यादीचे लोकांना अंदाज बांधता येतात.
 
सायंकाळी गुढी उतरवताना पुन्हा देवाची आणि निसर्गाची प्रार्थना केली जाते. आमच्याकडे पाऊस नियमित येऊ दे, आम्हाला भरपूर आणि शुद्ध पाणी मिळू दे अशी प्रार्थना केली जाते. यासाठी देवादिकांची, निसर्गाची पूजा केली जाते. गुढीपाडवा हा निसर्गाचा उत्सव आहे. त्यामध्ये वसंतवैभव फुलतं. इतर 11 महिन्यांमध्ये न दिसणारं निसर्गवैभव या दिवसात असतं. तुराज वसंताचं आगमन झाल्यावर सार्‍या सृष्टीला जणू चैतन्याची पालवी फुटते. या दिवसात झाडावेलींची कोवळी पालवी बाळसं धरू लागते. ही पालवी टिकू देऊन झाडं वाढवली तर झाडं बहरुन येतात. असे वृक्ष असतील तर प्राणी टिकतात. केवळ माणूसच नाही तर वन्यप्राणीही या वृक्षांमुळेच टिकून आहेत. 
वने तेथे सुमने, 
सुमने तेथे आनंदवने
असं संत ज्ञानदेवांनी म्हटलं आहे. त्यांच्या सांगण्याचा अर्थ असा की जे लोक निसर्गाला शरण जातात त्यांना निसर्ग खुलवतो. कडूनिंब याचं उदाहरण आहे. ज्ञानेश्वरांनी पिंपळाच्या वार्‍याला सोनसळी वारा असं म्हटलं आहे. या वार्‍याला ते चैतन्याचे बाळकृष्ण असंही म्.हणतात. या सार्‍या झाडांना चैत्रात बहर येतो. गुढीपाडवा हे त्याचंच प्रतीक आहे. गुढीपाडवा हा चैतन्याचा, समृद्धीचा उत्सव आहे. या काळात आपल्या दारात गुढी उभी करुन चैत्राचं स्वागत केलं जातं. ही गुढी उभारण्याची परंपरा फार प्राचीन आहे. आपली गुढी हे अनेक गोष्टींचं द्योतक आहे. गुढीसाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बांबूची किंवा कळकाची काठी वापरली जाते. ही काठी म्हणजे एका दृष्टीने पर्यावरणाचं, वृक्षवेलींचं अस्तित्व टिकवण्याचं साधन आहे. आपण गुढी आकाशाच्या दिशेने उभारतो. आपली महत्त्वाकांक्षा आकाशाएवढी उत्तुंग आणि अथांग असावी असा संदेश जणू ही गुढी आपल्याला देत असते. ही गुढी विजयाचं, केलेल्या तपाच्या साफल्याचं प्रतीक आहे. गुढीमध्ये वापरलं जाणारं कडूनिंब, साखरेची माळ आणि रेशमी वस्त्र ही मानवाच्या तीनही गरजांची प्रतीकं आहेत. चैत्रपालवीत नटणार्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी वातावरणात, उगवत्या सूर्याच्या साक्षीने गुढी उभी करण्याची आपली परंपरा आहे. 
 
हा सण निर्मितीच्या सृजनाचा आहे. या दिवसात निसर्गामध्ये चैतन्य फुललेलं असतं. प्राणी, सृष्टी यामध्ये या दिवसात एक उत्साह सळसळत असतो. या निमित्ताने पर्यावरण संवर्धन होतं. आपल्या सणांमध्ये पत्री, पानं, फुलं यांना महत्त्व देण्यात आलं आहे. या पत्रींना किंवा वृक्षांना महत्त्व देण्यामागे त्यांचं संवर्धन करणं हा उद्देश आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सणातही या वृक्षवेलींचं संवर्धन व्हावं या दूरदृष्टीने त्यांचा समावेश करण्यात आला आहे. गुढीपाडवा हा सण एकात्मतेला, स्नेह वाढवण्याला चालना देणारा आहे. या सणाच्या निमित्ताने सर्व भेदभाव विसरुन एक झालं पाहिजे. या सणाच्या निमित्ताने चांगल्या गोष्टी करण्यासाठी संकल्प केले जातात. पण, ते केले तरी त्यांची अंमलबजावणी करण्यावर भर द्यायला हवा.  
 
यशवंत पाठक  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अशी उभारावी गुढी..