Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संत ज्ञानेश्वर : 'ज्या आळंदीत अनन्वित छळ झाला, तीच आळंदी माऊलींना डोक्यावर घेऊन नाचते आहे'

संत ज्ञानेश्वर : 'ज्या आळंदीत अनन्वित छळ झाला, तीच आळंदी माऊलींना डोक्यावर घेऊन नाचते आहे'
, सोमवार, 11 डिसेंबर 2023 (12:23 IST)
-सचिन परब
पंढरपुरात पौर्णिमेचा काला झाला आणि कार्तिकीची वारी संपली की महाराष्ट्रभरातल्या वारकऱ्यांना आळंदी यात्रेची ओढ लागते.
 
जितकी आस विठोबाची, तितकीच माऊलीची देखील. देवाच्या जयघोषाच्या बरोबरीनेच किंबहुना जास्तच जोरात महाराष्ट्र संतांच्या नावाचा जागर करतो. त्यामुळे हे त्याला धरूनच असतं.
 
कार्तिक वद्य अष्टमीलाच आळंदीत लगबग जाणवायला लागते. आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिराच्या मुख्य दरवाजाची पायरी ही पालखी सोहळ्याला सुसूत्र रूप देणाऱ्या हैबतबाबा आरफळकर यांचं स्मारक आहे.
 
तिच्या पूजनाने अष्टमीला या यात्रेची सुरवात होते. हळूहळू गावोगावच्या दिंड्या गोळा होऊ लागतात. ठिकठिकाणी भजन, कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण सुरू होतं. दशमीला रात्रीपर्यंत आळंदी गर्दीने फुलून गेलेली असते.
 
एकादशीला मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास पहाटपूजा होते. दुपारी माऊलींच्या पादुकांच्या पालखीची नगरप्रदक्षिणा होते. त्यात दिंड्या सामील होतात. द्वादशीला संध्याकाळी रथोत्सव होते. त्यात समाधीच्या मुखवट्याची पालखीच्या रथात पूजा बांधली जाते आणि नगरप्रदक्षिणा होते.
 
माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी त्रयोदशीला दुपारी संत नामदेवांच्या वंशज समाधी सोहळ्याचं कीर्तन करतात. त्यात नामदेवरायांनी लिहिलेल्या ज्ञानदेवांच्या समाधी वर्णनाचे अभंग सांगितले जातात.
 
दुपारी बाराला घंटानाद, पुष्पवृष्टी होते. पंढपुरातून पालखी सोहळ्याने आळंदीत आणलेल्या नामदेवरायांच्या पादुका माऊलींच्या समाधीपाशी नेल्या जातात. दोन महान मित्रांची भेट होते. नंतर गर्दी हळूहळू ओसरायला लागते. पण अमावस्येला छबिना मिरवणुकीपर्यंत हजारो वारकरी थांबलेले असतात.
 
तेव्हा सोहळा खऱ्या अर्थाने थांबतो. यंदा या आळंदीच्या यात्रेसाठी किमान तीन ते साडेतीन लाख वारकरी आळंदीत एकत्र आले आहेत, असा अंदाज पत्रकारांनी मांडला आहे.
 
संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली त्याला यंदा बरोबर 727 वर्षं झाली. इतकी वर्षं झाली तरी लाखो लोक त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून वर्षानुवर्षं गोळा होतात. ही साधीसुधी माणसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. ते घरचे वाढदिवस विसरू शकतात, पण माऊलींना दिलेली ही अपॉइंटमेंट जिवाच्या आकांताने पाळतात. आनंद आणि आपत्ती दोन्ही त्यांना अडवू शकत नाही. हे निव्वळ अद्भूत म्हणावं असंच आहे.
 
माऊलींनी फक्त आपल्याच नाही तर आपल्या पिढ्यानपिढ्यांच्या जगण्याला अर्थ दिला, अशी त्यांची भावना असते. आपल्या अस्तित्वाला माऊलींच्या विचारांमुळेच ओळख मिळाली असं त्यांना वाटतं.
 
आपल्याला उमजलेल्या माऊलींच्या तत्त्वज्ञानाच्या बळावर ते आपल्या आयुष्यातल्या निर्णयांची संगती लावत असतात. आधुनिक काळातल्या सगळ्या व्यवधानांच्या गदारोळातही ते माऊली आणि सगळ्या संतांशी आतून जोडलेले असतात. जगातली अनेक समीकरणं खालीवर होताना दिसतात, पण हा बंध काही ढिला होताना दिसत नाही.
 
या वारकऱ्यांना सापडलेलं ज्ञानदेवांचं तत्त्वज्ञान त्यांना संत नामदेवांच्या गाथेत सापडतं. नामदेवरायांनी आदि, तीर्थावळी आणि समाधी या तीन विभागांमध्ये ज्ञानदेव आणि त्यांच्या भावंडांचं चरित्र लिहिलं आहे.
 
ज्ञानदेवांच्या नंतरच्या सगळ्याच चरित्रकारांनी या अभंगांमध्येच आपल्या तर्काने आणि कल्पनाशक्तीने रंग भरले आहेत. तरीही नामदेवरायांनी लिहिलेलं ज्ञानदेव चरित्र दशांगुळे उरलंच आहे.
 
`बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले`, या वारकरी मापदंडानुसार माऊलींचं तत्त्वज्ञान त्यांच्या चरित्रामध्ये शोधता येतं. या चरित्रामुळे वारकऱ्याला आपल्या जीवनात ते तत्त्वज्ञान आणण्याची प्रेरणाही मिळते.
 
त्याशिवाय माऊलींचे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी हे तीन ओवी या छंदात रचलेले ग्रंथ प्रसिद्ध आहेत. शिवाय त्यांनी लिहिलेले 900च्या आसपास रसाळ अभंग आज उपलब्ध आहेत.
 
त्यातल्या नामस्मरणाचं महत्त्व सांगणाऱ्या अभंगांचा हरिपाठ नावाचा संग्रह स्वतंत्रपणे वाचण्याचा प्रघात आहे. तो वारकऱ्यांच्या रोजच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग बनला आहे.
 
ज्ञानदेवांच्या विचारविश्वाचं प्रतिबिंध केवळ वारकरी संतसाहित्यातच पडलेलं नाही, तर ते आजतागायत सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक वाटचालीतही लख्खं दिसतं. या सगळ्याच्या केंद्रस्थानी ज्ञानेश्वरी हा थोर ग्रंथ आहे.
 
ज्ञानेश्वरी ही गीतेवरचं भाष्य आहे, हे आपल्याला माहीत आहेच. ते फक्त मराठीतलंच नाही, तर संस्कृत सोडून दुसऱ्या कुठल्याही भाषेतलं गीतेवरचं पहिलं भाष्य आहे. `त्या बड्या बंडखोरांत ज्ञानेश्वर माने पहिला`, असं कवी बी लिहितात ते त्यामुळेच.
 
तोपर्यंतचा सगळा पारंपरिक धर्मव्यवहार हा संस्कृत भाषेत होता. त्याला ज्ञानदेवांनी सुरूंग लावला. ते त्यांनी का केलं, यासाठी नामदेवरायांनी लिहिलेल्या ज्ञानदेव चरित्राकडेच जावं लागतं. त्यातल्याही ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंतांकडे.
 
त्या काळच्या पद्धतीनुसार प्रत्येक संताने आपल्या रचनांमध्ये स्वतःचं नाव म्हणजे नाममुद्रा गुंफलेली आहे. तशी ज्ञानदेवांची नाममुद्रा बापरखुमादेवीवरू अशी आहे.
 
लिंगायत परंपरेतल्या सर्व शरणांनी आपल्या रचनांमध्ये आराध्यदेवाचा शेवटी उल्लेख करण्याची पद्धत रूढ केली होती. त्याचा प्रभाव इथे दिसतो.
 
ज्ञानदेव आपलं आराध्यदैवत म्हणून `रुक्मिणीचा पती तो पिता विठ्ठल` असा उल्लेख करतात. पण हेच वर्णन त्यांच्या स्वतःच्या वडिलांसाठीही लागू होतं. ज्ञानदेवांसारख्या महान सुपुत्राने त्यांचं नाव अभिमानाने धारण करावं असंच त्यांचं कर्तृत्व होतं.
 
संसार हा हीन असून केवळ संन्यासामुळेच ब्रह्मज्ञान किंवा मोक्ष मिळू शकतो, हीच धारणा वर्णाश्रमाच्या आदर्शांमुळे आणि आद्य शंकराचार्यांच्या प्रभावामुळे रूढ होती.
 
नामदेवराय वर्णन करता त्याप्रमाणे विठ्ठलपंत `वैराग्य डोळस मूर्तिमंत` होते. त्यांचं वैराग्य डोळस होतं. कुणी काय म्हणतंय म्हणून वाहवत जाण्याऐवजी त्यांनी सत्याचा शोध चालवला होता. त्यामुळे स्वीकारलेल्या संन्यासाच्या मर्यादा लक्षात आल्यावर त्यांनी पुन्हा संसारात उडी घेतली. ते वर्णाश्रमधर्माच्या मूळ संकल्पनेला चूड लावणारं असल्यामुळे आळंदीतल्या ब्राह्मणांच्या जातपंचायतीने त्यांच्यावर बहिष्कार घातला. पण नाथ आणि वारकरी संप्रदायाचा प्रभाव असणाऱ्या बहुनजांनी त्यांना गावाबाहेर आधार दिला.
 
जातपंचायतीच्या नाकावर टिच्चून त्यांनी मुलांना वेदांपासून नाथापर्यंतचं देशभर फिरून मिळवलेलं सगळं ज्ञान दिलं. पण पिढीजात कुलकर्णीपण असलेल्या संपन्न घरात वाढलेल्या विठ्ठलपंतांना मुलांचे हाल बघवत नव्हते. थोरल्या निवृत्तीच्या मुंजीचं वय जवळ येऊ लागलं, तसं ते समाजाच्या मान्यतेसाठी जातपंचायतीला शरण गेले. जातपंचायतीने त्यांना आत्महत्येची शिक्षा सुनावली.
 
आता आईवडील नव्हते, पण त्यांनी दिलेले विचारांचे संस्कार भक्कम होते. आजच्या प्राथमिक शाळेतल्या मुलांच्या वयाची ही मुलं एकमेकांच्या साथीने उभी राहिली.
 
आईवडिलांनी प्रायश्चित्त घेतलं त्यामुळे आता आम्हाला मुंजीचा म्हणजे वेदाध्ययनाचा अधिकार द्या, अशी त्यांची मागणी होती. पण संन्याशाची मुलं ही धर्मशास्त्रानुसार चांडाळ. जातीच्या उतरंडीत अस्पृश्यांच्याही खालची. ही भावंडं नामदेवरायांना भेटायला गेली तेव्हा आपापसात कैकाडी भाषेत बोलत होती, असा उल्लेख आहे. त्यावरून त्यांचा वावर भटक्यांमध्येही झाला असल्याचा अंदाज बांधता येतो.
 
त्यामुळे लहानपणापासून गावकुसाबाहेर वाढणारे ज्ञानदेव धर्माच्या नावावर माणसांना जनावरांसारखं वागवलं जात असल्याचं बघत होतेच. त्याच धर्माच्या सर्वात मोठ्या ठेकेदारांनी म्हणजे पैठणच्या शास्त्रीपंडितांनी त्यांचं देवत्व मान्य केलं, पण साधं जानवं नाकारलं.
 
हे ज्ञानदेवांना अपेक्षित असं झालं आणि त्यांनी या पारंपरिक धर्मातला अधर्म महाराष्ट्रासमोर उघडा पाडला. त्यामुळे आता वारकरी भागवत धर्माच्या आधारे नवा महाराष्ट्रधर्म सांगण्याची वेळ आली होती. त्यातून महाराष्ट्राचा नवा धर्मग्रंथ ज्ञानेश्वरीचा जन्म झाला.
 
जय जगतचं तत्त्वज्ञान सांगणारे विनोबा भावे यांना तर कुणी मराठी संकुंचितपणाचा दोष लावू शकणार नाहीत.
 
महाराष्ट्रधर्माची वैचारिक मांडणी करताना विनोबांनी लिहिलं आहे, ‘धर्मग्रंथ या नात्याने ज्ञानेश्वरीची तुलना मी जेव्हा कुराण आणि बायबलशी करतो, तेव्हा लक्षात येते की हा एक सांगोपांग धर्म सांगणारा निर्मळ धर्मग्रंथ मराठी भाषेला मिळाला आहे. ज्या ग्रंथात जीवनाच्या सगळ्या अंगांचा परिपोष झालेला आहे, त्याला मी धर्मग्रंथ म्हणतो. मनुस्मृती सर्वांगीण नाही, पण ज्ञानेश्वरी सर्वांगीण आहे. म्हणून तो आमचा धर्मग्रंथ आहे.’
 
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या शब्दात सांगायचं तर, ‘निवृत्तिज्ञानदेवादिकांना पैठणच्या ब्रह्मवृंदाने प्रायश्चित्त देऊन उपनयनादि संस्कार करण्यास नकार दिला. म्हणजे वैदिक धर्मात घेतले नाही. हा विठ्ठलपंतांचा वंश ब्राह्मणवंश म्हणून चालूच दिला नाही. त्यामुळे परंपरागत जातिधर्माच्या आणि वर्णाश्रमधर्माच्या पोलादी चौकटीतून हा भक्ती, ज्ञान व वैराग्याचा अगाध निधी असलेला विठ्ठलपंतांचा वंश निसटला आणि सर्व मानववंशाला संकुचित, धार्मिक आणि सामाजिक अहंकाराच्या बंधनातून मुक्त करणाऱ्या परमार्थमार्गाचा संस्थापक झाला.’
 
आजही माऊलींच्या आळंदीतही आपल्याला विठ्ठलपंतांनी केलं ते चुकीचं कसं होतं आणि धर्ममार्तंडांनी सांगितलेली शिक्षा बरोबर कशी होती, हे पटवून सांगणारे महाभाग भेटतात.
 
पण त्यांच्याकडे ढुंकूनही बघण्याची गरज नाही. ज्या आळंदीने माऊलींचा अनन्वित छळ झाला, तीच आळंदी माऊलींना डोक्यावर घेऊन नाचते आहे. आज माऊली वजा केल्या तर आळंदी शून्यही उरत नाही.
 
पण माऊलींच्या आधीपासून आळंदी हे नाथपंथाचं एक तीर्थक्षेत्र होतं. नाथपंथाचा ‘दंशु’ ज्ञानदेवांच्या आधीच्या किमान चार पिढ्यांमध्ये तरी आढळतो. त्या काळात महाराष्ट्रात प्रभावी असणाऱ्या गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना आदिगुरू शंकरापासून सुरू झालेल्या नाथपरंपरेच्या बोधाचं सार सांगितलं.
 
नाथ संप्रदायाची वैचारिक मुळं व्हाया सिद्धपरंपरा बौद्ध विचारांपाशी शोधता येतात. अनेक अभ्यासकांनी तशी साधार मांडणी केली आहे. जातिभेद, कर्मकांड, विषमता, लिंगभेद यांना विरोध ही समतेची तत्त्वं या तिन्ही परंपरेत आहेत.
 
त्यात त्यांनी आपले विचार लोकभाषेत मांडले आहेत. दहाव्या अकराव्या शतकात नाथांनी मध्य आशियात स्थिरावलेल्या सुफी परंपरेचं सत्व अंगिकारून स्वतःला अपडेट केलं.
 
पण संन्यास आणि गुरुशिष्यपरंपरेच्या मर्यादा ओलांडून पुढे जाण्याची गरज गहिनीनाथांसारख्या थोर द्रष्ट्य़ाला जाणवत होती. त्यांनी निवृत्तीनाथांना केवळ गुरू शिष्य परंपरेतून गुप्तपणे केला जाणारा उपदेश सर्वांसाठी खुला करण्याचा आदेश दिला.
 
स्वतः रूढ अर्थाने शैव असूनही त्यासाठी कृष्णाच्या तत्त्वज्ञानाचा आधार घेण्याचंही सांगितलं. त्यानंतर जे घडलं त्याचं वर्णन ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीतच केलं आहे.
 
आधीच तंव तो कृपाळू । वरी गुरूआज्ञेचा बोलू ।
 
जाला जैसा वर्षाकाळू । खवळणें मेघा ।।
 
मग आर्ताचेनि वोरसें । गीतार्थग्रंथनमिसें ।
 
वर्षला शांतरसें । तो हा ग्रंथु ।।
 
गुरूची आज्ञा झाल्यावर निवृत्तीनाथांनी ढगातून वर्षाव होतो तसा गीतेचा अर्थ सांगितला. तोच हा ग्रंथ आहे. गीतेचं तत्त्वज्ञान आधीच सर्व जातींसाठी आणि स्त्रियांसाठीही मोकळं होतं.
 
फक्त भाषेचा अडसर होता. तो अडसर माऊलींनी दूर केला. तोपर्यंत लोकभाषा वेगळी होती आणि धर्मभाषा वेगळी होती. पुरोहितशाहीने धर्मभाषा संस्कृतवर आपली मक्तेदारी केली होती. त्यामुळे केवळ स्वतःचा स्वार्थच ते धर्म म्हणून सांगत होते. त्यामुळे सर्वसामान्य माणूस वैचारिक पारतंत्र्यातच होता.
 
खोट्या धर्माच्या बेड्यांत अडकला होता. अशा वेळेस त्याला त्याच्या भाषेत खरा धर्म सांगायची वेळ आली होती. गुलामाला गुलाम असल्याची जाणीव करून द्यायची वेळ आली होती. ज्ञानेश्वरीने ही क्रांती घडवली. वारकरी संप्रदायाने सर्वसामान्यांना धर्म ऐकण्याचा आणि सांगण्याचाही अधिकार दिला.
 
ज्ञानदेवांच्या आधीही महाराष्ट्रासह देशभर वेगवेगळ्या भक्तीपंथांनी लोकभाषेतून रचना केल्या होत्या. पण मुख्य प्रवाहातल्या प्रचलित धर्माला न नाकारता त्याच्या चौकटीत राहूनच त्याला आव्हान देण्याचं काम ज्ञानेश्वरीने केलं. ज्ञानदेवांनी प्रचलित धर्मप्रवाहातली गीताच उचलली होती. पण त्यावर लोकभाषेत भाष्य लिहिताना नवा अर्थ मांडला होता. त्यामुळे ज्ञानेश्वरी हाच मुख्य धर्मप्रवाह बनला. मराठी ही नवी धर्मभाषा बनली. धर्मशास्त्राला आणि कर्मकांडाला दुय्यम ठरवत धर्माच्या मुख्य प्रवाहावरच दावा ठोकणारी भक्तीधारा मग देशभर वाहू लागली. सर्व लोकभाषांमधून नव्या भक्तिरचनांची निर्मिती होऊ लागली.
 
श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता ही सर्वांसाठी असली तरी तिचा संकुचित अर्थ सांगण्याची चौकट आधीपासून स्थिरावली होती. भारतीय तत्त्वज्ञानात एखाद्याला नवा विचार मांडायचा झाला, तर तो वेदांत म्हणजे उपनिषदं, उपनिषदांमधलं सार सूत्ररूपाने सांगणारं ब्रह्मसूत्र आणि गीता या तिन्ही ग्रंथांमध्ये कसा आहे हे सिद्ध करावं लागतं त्याला प्रस्थानत्रयी असं म्हणतात.
 
पूर्वी त्यात गीतेचं स्थान दुय्यम होतं. कारण उपनिषदं हा वेदांचा भाग म्हणजे श्रुती होत्या आणि गीता महाराभारताचा भाग असल्यामुळे स्मृतीच्या दर्जाची मानली जात होती.
 
वेद देवांनी सांगितलेले अपौरुषेय म्हणजे श्रेष्ठ आणि गीता मात्र व्यासांनी रचल्यामुळे कनिष्ठ, असा व्यूह होता. त्यामुळे गीतेचा अर्थ वेदांताच्या आधारेच सांगावा लागत होता. शंकराचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, मध्याचार्य, निंबार्काचार्य यांनी याच पद्धतीने आपापलं तत्त्वज्ञान सिद्ध केलं होतं.
 
पण ज्ञानदेवांनी या प्रस्थानत्रयीतली फक्त गीताच उचलली. ते वेदांत सांगण्याच्या भानगडीतच पडले नाहीत. असं करणारे ते पहिले तत्त्ववेत्ते होते. त्याआधी संस्कृतमध्येही फक्त गीतेवरचं भाष्य लिहिलं गेलं नव्हतं. ज्ञानदेवांनी गीतेला सर्वोच्च ठरवलं. त्यासाठी नवा तर्क मांडला,
 
हा वेदार्थ सागरू । जसा निद्रिताचा घोरू ।
 
तो स्वये श्री सर्वेश्वरू । प्रत्यक्ष अनुवादला ।।
 
याचा अर्थ असा आहे की वेद हे ईश्वराचं झोपेत असतानाचं घोरणं म्हणजे निश्वास आहेत, पण गीता ही त्याने स्वतःच जागेपणी सांगितली आहे. वेद मुळातून नाकारणारे धर्म आणि संप्रदाय यापूर्वीही झाले होते.
 
पण वेदांची चौकट न नाकारता त्यातला अवकाश व्यापण्याचा तो यशस्वी प्रयत्न केला. त्यांनी धर्म, मोक्ष, पाप, पुण्य, स्वर्ग, भक्ती, ज्ञान, कर्म, योग अशा सर्व संकल्पनांचे नवे अर्थ सांगितले किंवा त्याच्या अर्थांना नवे आयाम दिले. त्यांनी त्यापुढे जात त्याच चौकटीत राहून वेदांच्या मर्यादाही सांगितल्या.
 
वेद संपन्न असे ठायी । परि कृपणू ऐसा आनु नाही।
 
का जो कानी लागला तिही । वर्णांचिया ।।
 
वेद मुळात श्रीमंत असला तरी तो कंजुष आहे कारण तो फक्त तीनच वर्णांच्या कानी लागला. असं सांगत त्यांनी शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांच्यासाठी गीता असल्याचं सांगितलं. त्यांनी मुळात वेदांताचा आधार घेऊन गीतेचा अर्थ लावण्याची गरज नाकारली होती. त्यामुळे त्यांना गीतेचा स्वतःचा अर्थ सांगता आला.
 
'वेदांचा तो अर्थ आम्हासिच ठावा', हे तुकोबाराय पुढे सांगू शकले, त्याचा पाया इथे रचला होता.
 
संत तुकोबारायांचे वंशज आणि संतसाहित्याचे महत्त्वाचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे ज्ञानदेवांच्या या कार्याला कोपर्निकसन क्रांती म्हणतात, 'पूर्वी युरोपात ग्रहमालेचा पृथ्वीकेंद्रित सिद्धांत प्रचलित होता. कोपर्निकस या खगोल शास्त्रज्ञाने तो सोडून सूर्य हाच केंद्रस्थानी असल्याचा सिद्धांत मांडला. ज्ञानेश्वरांनीही ग्रंथप्रामाण्याच्या बाबतीत अशी क्रांती केली. केंद्रस्थानी असलेल्या वेदाला स्थानभ्रष्ट करून तिथे गीतेची प्रस्थापना केली.'
 
आज आपण गीतेला हिंदू धर्माचा मुख्य ग्रंथ मानतो. कोर्टात गीतेला साक्ष ठेवून खरं बोलण्याची शपथ घेण्याची पद्धत आहे. हे ज्ञानेश्वरांनी घडवलेल्या कोपर्निकसन क्रांतीचं आज दिसणारं फलित आहे. गीतेचा अर्थ लावतानाही त्यांनी चिद्विलासवादाचा पुरस्कार केला.
 
ब्रह्म सत्य आहे, पण जग मिथ्या आणि केवळ माया असल्याचं त्यांनी नाकारलं. त्यांनी जग हे ईश्वराची लीला असल्याची मांडणी केली. महाराष्ट्रातल्या नाथविचारांत मुळं असणारा काश्मिरी शैववादाशी त्याचं नातं होतं. जगात सर्वत्र सारखंच ईश्वरतत्त्व असल्याचं सिद्ध केल्यामुळे विषमतेला थारा उरला नाही.
 
रामजनार्दनांनी लिहिलेल्या ज्ञानदेवांच्या आरतीत `प्रकटचि गुह्य बोले, विश्व ब्रह्मचि ठेले` हा उल्लेख याच संदर्भात आहे. यातून सगळे भेद गाळून वेद प्रमाण मानण्याचा हा नवा मार्ग देशातल्या धर्मचिकित्सकांना सापडला.
 
त्यामुळेच राजारामशास्त्री भागवतांसारखे महाराष्ट्राचे भाष्यकार ज्ञानदेवांच्या तत्त्वज्ञानाला महाराष्ट्राचा राष्ट्रीय धर्म मानतात, ‘आम्हा मराठ्यांस नाही श्रुतीची गरज, नाही स्मृतींची गरज, नाही भगवत्पादांच्या वेदांत भाष्याची गरज... जर एखादा धर्मसंबंधी महासिद्धांत मराठ्यांस अगदी सुलभ करून देण्याची इच्छा असली, तर जसे ख्रिस्ती लोक बैबलच्या आधारे बोलतात, त्याप्रमाणे आम्हा मराठ्यांस ज्ञानेश्वराच्या किंवा तुकारामबोवांच्या वचनांचा आधार धरून काम केले पाहिजे.’
 
ज्ञानेश्वरीतून महाराष्ट्राला स्वतःचा सूर सापडला. स्वतःचा आवाज सापडला. महाराष्ट्राला पुन्हा एकदा स्वतःची ओळख घडवून देण्याचं काम ज्ञानेश्वरीने केलं होतं. आजवर महाराष्ट्राची भाषा हीन म्हणून नाकारण्यात आली होती. त्या मराठीत ज्ञानदेवांनी `देशीकार लेणे` खोदले. `माझा मराठाचा बोलू कवतुके` सांगत स्वाभिमानाची पताका फडकवली. महाराष्ट्रात उत्तर यादवकाळात फोफावलेल्या पुरोहितशाहीने कर्मकांडांचा भडिमार केला होता. धर्माच्या नावावर उच्चनीचतेचा सुळसुळाट झाला होता. त्यातून बहुसंख्य समाज स्वतःची ओळख हरवून बसला होता. ज्ञानेश्वरीने त्या खऱ्या महाराष्ट्राला आत्मविश्वास दिला. त्यातून महाराष्ट्र नव्याने उभा राहिला.
 
संन्यासातून संसाराकडे, कर्मकांडाकडून भक्तीकडे, उच्चनीचतेकडून समतेकडे, मायावादाकडून चिद्विलासाकडे, संस्कृतकडून मराठीकडे, कलहातून सामंजस्याकडे महाराष्ट्राच्या झालेल्या प्रवासाची सुरुवात ज्ञानदेवांनी केली.
 
त्यामुळे वारकरी भागवतधर्म हा महाराष्ट्रधर्म बनला. वारी ही त्याची साधना बनली. संत नामदेव त्याचे प्रवर्तक बनले. ज्ञानेश्वरी या धर्माचा धर्मग्रंथ बनली. या धर्माचा आधार आणि प्रेरणा तीच होती. जगद्गुरू संत तुकाराम या महाराष्ट्रधर्माचा कळस ठरले. हा सगळा प्रवास पारतंत्र्याकडून स्वातंत्र्याकडे जाणारा होता.
 
छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हा अचानक पेटलेला वणवा नाही, तर त्यामागे महाराष्ट्रातल्या संतांनी घडवलेली क्रांती आहे, अशी मांडणी न्या. महादेव गोविंद रानडेंनी पहिल्यांदा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकात छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी वारकरी संतांनी केल्याचा सिद्धांत मांडला.
 
ज्ञानदेवांनी मराठी मनं स्वतंत्र करण्याची सुरवात केली होतीच. नामदेवरायांपासून तुकोबारायांपर्यंत सगळ्या संतांनी या स्वातंत्र्याची पताका उंचच उंच फडकवली. त्यातून महाराष्ट्र नावाचा फक्त भूप्रदेशच नाही तर संकल्पना उभी राहिली
 
आहे आणि स्वातंत्र्य हे त्या संकल्पनेचा मुख्य गाभा आहे. आज आळंदीत होणारा ज्ञानोबातुकोबांचा जयघोष त्या स्वातंत्र्याचाच जागर आहे.
 
(डॉ. सदानंद मोरे लिखित ‘चार भावंडे’ आणि वसंत जोशी संपादित `ज्ञानदेव चिंतन` या ग्रंथांची हा लेख लिहिताना विशेष मदत झाली.)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Various names of Shiva Shankar शिव शंकराची विविध नावे