Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पूर्णपुरूष श्रीकृष्ण

पूर्णपुरूष श्रीकृष्ण
अनादी काळापासून हिंदू धर्मात राम आणि कृष्णाची पूजा केली जाते आहे. त्यातही रामचरित्र हे त्याग, एकपत्नीव्रत या सारख्या गुणांनी भरले असूनही रामाला त्याच्या आयुष्यात दु:ख जास्त भोगायला लागले. पण कृष्णावताराच्या बाबतीत मात्र सगळ्या लीलांमध्ये रममाण होऊनही तो मात्र या सगळ्यांतून विरळा राहिल्याचे दिसते.

'' माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा भोगी म्हणूनी उपहासा मी योगी कर्माचा'' असं गदिमा उगाचच नाही लिहून गेले. गीतेसारखं भलमोठं तत्त्वज्ञान सांगणारा, आपल्या उपस्थितीनेही पांडवांच्या पक्षात विजय आणणारा, 16 हजार नारींचा नाथ बनून त्यांची दृष्ट नरकासुराच्या कैदेतून सुटका करणारा श्रीकृष्ण इतक्या दैवी शक्तींनी युक्त असूनही तो आपल्यातलाच एक वाटतो. म्हणूनच आपल्याला सगळ्या लीलांमध्ये, भोगामध्ये रमलेला कान्हा मात्र 'मी कर्मयोगी आहे'. असे सांगतानाही आपणाला आश्चर्य वाटत नाही. कारण तो एक पूर्णपुरुष आहे.

कृष्ण एक मोठं रसायन आहे. एकीकडे आपल्या बाललीलांनी आपण सामान्य असल्याचे दर्शवताना कंसाने पाठवलेल्या प्रत्येक शक्तिशाली व दृष्ट राक्षसांचा वध तो किती लीलया करतो. आपल्यासारखाच लहानपणी चोरून लोणी खाणारा नटखट कान्हा जेव्हा सगळ्या गोकुळवासियांच्या डोक्यावर गोवर्धनाचे छत धरतो, त्यावेळी त्याचे देवत्व असामान्यत्व समोर येते.

कृष्णाला किती उपमा, नाव किती तशी त्याची रूपेही किती? पाळण्यात पाय हलवणारा यशोदेचा 'लाल' दुडुदुडू धावणारा गोपिकांचा 'कान्हा', राधेचा 'श्याम', पेंद्या बलराम यांचा 'किश्ना' ही अन अशी कितीतरी रूपे अन नावे.

इंद्राच्या कोपापासून गावकर्‍याना वाचवणारा गिरीधर कितीतरी युक्ती प्रयुक्तींनी अज्ञानात असलेल्या त्या गोपजनांना जगण्याचं सार सोप्या भाषेतून, कृतीतून पटवून देतो. बायकांची ताक, दुध, लोणी या सारख्या साध्या ऐहिक गोष्टींवर असलेली आसक्ती सोडवण्यासाठी तो त्यांच्या घरचे लोणी, दूधदुभते चोरतो, मटकी फोडतो.

नंद राजाचा मुलगा असूनही त्याला या सगळ्या गोष्टी काय मिळत नसतील? पण आपल्याजवळच आपलं प्रिय इतरांनाही वाटावं, कोणी उचनीच असू नये सर्वांनी मिळून मिसळून राहावं हे आजच्या काळातलं 'समाजवादी' तत्वही श्रीकृष्णाने मांडलं. हे शिकवण्यासाठीच कृष्ण गोपालकाल्यापासून गवळणींच्या खोड्या करण्यापर्यंत सारी कृत्ये करत असावा.

webdunia
  WD
आपल्या घर संसारात कष्ट करणाऱ्या गोपिकांना निखळ, शाश्वत आनंदाची प्राप्ती करून देवासाठी त्यांनी आपल्या मुरलीच्या नादाचे वेड लावले. रासक्रीडेत तर प्रत्येकीला कृष्ण पूर्णवेळ आपल्याशीच खेळत होता असे वाटत असे. ही अत्यानंदाची अनुभुती मिळणार्‍या त्या किती धन्य असतील?

कृष्णाने त्यांना सगुणावर प्रेम करायला शिकवलं हे मान्य. पण जी स्त्री संसारी कामकाजातच अडकली आहे. तिला तिच्या प्रिय अशा मुलबाळ गुर वासरं यापासून बाजूला नेऊन सगुणाचे का होईना ध्यान करावयास लावणे हे सोपे काम नव्हते. तो चतुर होता चाणाक्ष होता, कर्तव्यनिष्ठ होताच अन वेळ पडल्यास वज्राहूनही कठोर होणारा होता.

webdunia
  WD
नरकासुराच्या ताब्यात असणार्‍या 16 हजार स्त्रियांशी लग्न करण्याचे धारिष्ट्य दाखवण्याचे सामर्थ्य फक्त कृष्णातच होते. कारण स्त्रीच्या अब्रूविषयी जिथे आजही 'काचेचे भांडे' वगैरे उपमांनी, तिच्या न केलेल्या चुकीमुळेही आयुष्यभर जिला दु:ख भोगावे लागते, त्यावेळी नरकासुराकडे इतके दिवस बंदिवान असणार्‍या स्त्रियांना तर त्यांच्या घरची दारे केव्हाच बंद झाली असतील? अशावेळेस त्यांच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहिला असता का? म्हणूनच त्याने इतक्या स्त्रियांशी केलेला विवाह हा त्याचा भोगीपणा नसून त्यांना दिलेली जगण्याची संधी ठरते.

'कृष्णशिष्टाई' म्हणून प्रसिद्ध असणारे कृष्णाचे सभेतील वक्तव्य मुळातूनच अभ्यासव्यासारखे आहे. त्याने सत्याचा योग्य पक्ष घेताना त्याची कारणमीमांसा करतानाच कौरवांना त्यांच्या चुका सुधारण्याची संधीही देऊ केली होती. शिशुपालाचा वध करण्याआधीही त्याचे 100 अपराध कृष्णाने पोटात घातले होते. समोर स्वत:चे आप्त दिसल्याने युद्धभूमीत अस्वस्थ झालेल्या अर्जुनाला समजावतानाच 'मी युद्धात शस्त्र धरणार नाही' हा स्वत: केलेला 'पण' ही तो मोडण्यास तयार झाला.

सांदिपनींच्या आश्रमात शिक्षण घेताना इतरांप्रमाणेच त्यांनी गुरुगृही काम केले व शेवटही एका सामान्य माणसाप्रमाणे मृत्यू पत्करून आपले अवतार कार्य संपवले. त्यामुळेच तो देव की मानव या वादात अडकण्यापेक्षा त्याने दिलेली शिकवण अंगिकारली तर आपला 'नारायण' व्हायला उशीर होणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रावण मास चतुर्थी: गणपतीच्या आशीर्वादाने नकारात्मकता दूर करा