Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुत्तेमवारांसाठी 'दिल्ली बहोत दूर'

मुत्तेमवारांसाठी 'दिल्ली बहोत दूर'

वार्ता

PIBPIB
नागपूर लोकसभा निवडणूक चुरशीच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. केंद्रीय उर्जा राज्यमंत्री विलास मुत्तेमवारांसाठी पुन्हा एकदा दिल्ली गाठणे सोपे नाही.

मुत्तेमवार यांना भाजपचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांचे जबर आव्हान आहे. याशिवाय बहूजन समाज पक्षाचे माणिक वैद्यही मुत्तेमवारांना त्रासदायक ठरणार आहेत. या मतदारसंघात २७ उमेदवार असले तरी खरी लढत या तिघांतच आहे.

मुत्तेमवारांना चिमूर मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. पण पक्षश्रेष्ठींनी त्यांना नागपूरमध्ये रिंगणात उतरवले. अर्थात, मुत्तेमवार १९९९ व २००४ मध्ये येथून विजयी झाले होते. गेल्या निवडणुकीत शेतकर्‍यांच्या नाराजीचा मोठा फटका कॉंग्रेसला विदर्भात बसला होता. त्यामुळे विदर्भातील दहापैकी जेमतेम नागपूरची जागा मुत्तेमवारांना जिंकण्यात यश आले होते.

पुरोहित राम मंदिर मुद्यानंतर कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये आले होते. भाजपने त्यांना १९९१ मध्ये येथून तिकीट दिले होते. पण राजीव गांधी हत्येनंतर उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेत पुरोहित पराभूत झाले आणि दत्ता मेघे जिंकले. पण १९९६ मध्ये मात्र विजयाचा टिळा त्यांच्या भाळी लागला. पण १९९८ मध्ये त्यांना तिकिट न दिल्याने ते कॉंग्रेसमध्ये गेले. कॉंग्रेसने त्यांना १९९९ मध्ये रामटेकमधून लढवले. पण तेथूनही ते हरले.

पुढे त्यांनी विदर्भ राज्य पार्टी नावाच पक्ष स्थापन केला आणि २००४ मध्ये नागपूरची जागा लढवली. पण दुर्देव म्हणजे त्यांना अवघी २८ हजार मते मिळाली. मग पुरोहितांनी पुन्हा भाजपचा रस्ता धरला आणि आता ते पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहे.

बसपचे माणिक वैद्य अगदी आताआतापर्यंत भाजपचे जिल्हाप्रमुख होते. पण महिन्याभरापूर्वीच भाजप सोडून ते बसपमध्ये दाखल झाले आणि त्यांना तिकीट देण्यात आले. २००४ मध्ये बसपचा या मतदारसंघात काहीही प्रभाव पडलेला नव्हता. यावेळी बघूया, कोणाचा किती प्रभाव पडतोय ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi