Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंब्रा-कळवा अपवाद वगळता शिवसेनेचे ठाणे

मुंब्रा-कळवा अपवाद वगळता शिवसेनेचे ठाणे

वेबदुनिया

ठाणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघात मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचा अपवाद वगळता शिवसेनेचा भगवा फडकल्याने 'शिवसेनेचे ठाणे' हे ब्रीद पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. मुंब्रा-कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे डॅशिंग युवानेते जितेंद्र आव्हाड यांनी सेनेच्या राजन किणे या स्थानिक उमेदवाराला चारी मुंडया चीत केले आहे. ठाणे गडावर शिवसेनेने वर्चस्व राखले असले तरी राज ठाकरे यांच्या मनसेने येथील चार विधानसभा क्षेत्रात तब्बल १ लाख ४३ हजार मतांची बेगमी केल्याने विजयासाठी सेनेला अखेरपर्यंत झुंज द्यावी लागली.

कोपरी-पाचपाखडी मतदारसंघातून मावळते आमदार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी एकतर्फी लढत जिंकून तब्बल ७३ हजार ४९९ मते मिळवून विजयाची पुनरावृत्ती केली. त्यांनी काँग्रेसच्या मनोज शिंदे यांचा ३२ हजार ७७६ मतांनी दारुण पराभव केला. ओवळा-माजीवडा आणि ठाणे मतदारसंघात मनसेने दुसर्‍या क्रमांकाची मते घेत शिवसेनेला विजयासाठी बरेच झुंजविले. ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातून विजयी उमेदवार प्रताप सरनाईक यांना ५२ हजार ३६३ तर मनसेच्या सुधाकर चव्हाण यांना ४३ हजार ३३० मते मिळाली. ओवळा-माजिवडा आणि ठाणे मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेल्याने काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे.

शिवसेनेचे ठाणे - ठाण्याची शिवसेना
ठाणे या बालेकिल्ल्यात शिवसेनेसमोर मनसेचे कडवे आव्हान असतानाही सेनेच्या राजन विचारे यांनी जेमतेम २ हजार ४४१ आघाडी घेऊन विजय संपादन केला आहे. येथून विचारे यांना ५ हजार १०, मनसेच्या राजन राजे यांना ४८ हजार ५६९ मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या सुभाष कानडे यांना ३६ हजार २८८ मतांवर समाधान मानावे लागले. याठिकाणी राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार देवराम भोईर यांनी १७ हजार २४४ मते घेत सेनेच्या उमेदवाराचा विजय सूकर केला. विशेष म्हणजे भोईर यांची निशाणी नगारा होती. याच निशाणीवर मनसेच्या राजन राजे यांनी लोकसभेच्या निवडणूकीत लाखभर मते घेण्याचा विक्रम केला होता. त्याचाच फटका मनसेला या निवडणूकीत बसल्याचे दिसत आहे.

मनसे पराभूत तरीही.... लक्षणीय मत
बाल्यावस्थेत असलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष प्रथमच विधानसभेच्या रिंगणात उतरला होता. राज ठाकरे हाच चेहरा असलेल्या उमेदवारांना येथील चार मतदारसंघात पराभव पत्करावा लागला असला तरी मनसेने लक्षणीय मते घेतली आहेत. २०१४ साली होणार्‍या आगामी विधानसभेसाठी सर्वच पक्षांना धोक्याची घंटी मनसेने यावेळी वाजविली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi