Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

“वंदे भारत” ला प्रवासी प्रतिसाद कमी

“वंदे भारत” ला प्रवासी प्रतिसाद कमी
, बुधवार, 22 फेब्रुवारी 2023 (08:33 IST)
नाशिकरोड- मागील आठवड्यात सुरू झालेल्या सुसज्ज,आत्याधुनिक, संपूर्ण वातानुकूलित व वेगवान अशामुंबई-शिर्डी वंदे भारत या प्रवासी रेल्वेगाडीला प्रवाशांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.
 
रेल्वेचे भुसावळ विभागाचे सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अनिल बागले यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकातील कक्षात याबाबत पत्रकारांशी संवाद साधला. स्टेशन मास्तर आर. के. कुठार उपस्थित होते.
 
अनिल बागले म्हणाले की, १० फेब्रुवारीला मुंबई येथून पंतप्रधानांनी मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत या दोन ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. या घटनेला आठवडा झाल्यानंतर रेल्वेच्या अधिका-यांनी गाडीचा प्रतिसादाचा आढावा घेतला असता तो निराशाजनक आढळला. १८ फेब्रुवारीला मुंबई-शिर्डी वंदे भारत गाडीला ७६.७३ टक्के तर शिर्डी-मुंबई वंदे भारत गाडीला ७६.८६ टक्के प्रतिसाद मिळाला. त्या आधीच्या फे-यांमध्ये या पेक्षा कमी प्रवासी लाभले. हा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे शंभर टक्के नसल्याचे आढळले.
 
या गाडीत चेअर आणि एक्झिक्युटिव्ह कार अशा दोन श्रेणी आहेत. ही गाडी मुंबई-शिर्डी हे ३४३ किलोमीटर अंतर फक्त ५ तास २५ मिनीटात पार करते. इतर गाड्यांपेक्षा ती किमान एक तास आधी पोहचते. दादर, ठाणे, नाशिक येथे गाडीला थांबे आहेत. गाडीत अत्याधुनिक सेवा सुविधा आहेत. गाडीचे तिकीट दर हे सामान्यांना न परवडणारे असल्याने प्रतिसाद कमी आहे की अन्य काही कारणांमुळे गाडीला प्रतिसाद कमी आहे.
 
याबाबत रेल्वे माहिती घेत आहे. महत्वाचे जंक्शन असलेल्या मनमाडला या गाडीला थांबा नाही. तो सुरु झाल्यास खांदेश व अन्य राज्यांमधून मनमाडला येणा-या प्रवांशाची सोय होईल तसेच रेल्वेचा महसूल वाढेल अशी सूचना आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनीही तशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, थांबे वाढवले तर गाडी वेळेत पोहचणार नाही. याबाबत रेल्वे बोर्डाला पत्र पाठविण्यात आले आहे. ही गाडी पुढे औरंगाबादपर्यंत नेली तर उद्योजक, व्यावसायिकांचा प्रतिसाद वाढेल अशी सूचना आहे.
 
गाडी संध्याकाळी शिर्डीला पोहचते. त्यामुळे पहाटेच्या आरतीसाठी हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागल्याने प्रवाशांचा खर्च वाढतो. गाडीची वेळ बदलून सकाळची केली तर पंचवटी एक्सप्रेसवरील लोडही कमी होईल तसेच वंदे भारतला प्रतिसादही वाढले, अशीही सूचना आहे.
 
शिर्डीमध्ये गाडीची प्रभावी जाहिरात करावी, हॉटेल व्यावसायिकांशी टायअप करावे, गाडीच्या तिकीटाच्या पैशात जेवणाची सुविधा द्यावी आदी सूचना आहेत. गाडीचे भाडे कमी करावे या सूचनेबाबत अनिल बागले म्हणाले की, मुंबई-शिर्डी खासगी प्रवासी बसच्या भाड्यापेक्षा कमी दरात आणि सुरक्षित, आराम देणारा, वेळ वाचवणारा असा वंदे भारत ट्रेनचा प्रवास आहे.
 
प्रवासी बसचालक वेगात गाडी चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळतात. त्याचा विचार करता रेल्वे अत्यंत सुरक्षित आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमित शहा महाराष्ट्राचा नंबर वन शत्रू; ‘सामना’मधून संजय राउतांची टिका