Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्त्री- पुरुष समानतेचा घट बसवू का?

स्त्री- पुरुष समानतेचा घट बसवू का?
, बुधवार, 17 ऑक्टोबर 2018 (11:25 IST)
गाय श्रेष्ठ आणि बाई शूद्र? वंशाला दिवा देणारी बाई अपवित्र? घर चालवणारी बाई दासी? मुलांचे पालनपोषण करणारी बाई परावलंबी? हे प्रश्र्न संपलेत का? केरळमधील सबरीमला मंदिरात स्त्रियांना प्रवेश द्यावा असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. शनिशिंगणापूरचे दर्शन खुले झाले. तो ह्या स्त्रियांनी लढून मिळवला. खरं तर परेश्र्वराचे कोर्ट काय सांगते? सगळे जीव समान आहेत. मला प्रिय आहेत. हे अध्यात्माचे तत्त्व आहे. तरी असा भेदभाव का केला जातो? अशा देवाकडे बाईने पाठ फिरवणे योग्य असं मला वाटते. भेदभाव का सहन करायचा. काळ सोकावतो! यामागे केवळ सत्ताकारण आहे. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अशा गोष्टींचा वापर करून घेतला जातो. माझे असे निरीक्षण आहे, (कदाचित फार खरं असेल असं नाही) एक विठ्ठल मंदिरात विठ्ठलाच्यामूर्तीपर्यंत फक्त भक्ताला जाऊ देतात. नाहीतर मोठी मोठी जी देवस्थाने आहेत तिथे मूर्तीपर्यंत तरी कुणाला प्रवेश नसतो. मूर्तीला, पायाला स्पर्श करता येत नाही. असं बर्‍याच ठिकाणी असते. कोल्हापुरातील ज्योतिबाच्या मंदिरात पुरुषांना शर्ट काढून, काही पैसे घेऊन गाभार्‍यात प्रवेश देतात. त्यामुळे समंजस पुरुष गाभार्‍यात जातही नाहीत. काय फरक पडतो बाहेरून दर्शन घेतले तर? देव तर सगळीकडे असतो ना? वारकरी वारी झाल्यावर कळसाचे दर्शन घेऊन समाधानी असतात. मूर्तीला भेटण्याची त्यांना गरजही वाटत नाही. देव दगडाच्या मूर्तीत नाही तर बाहेर चैतन्यमय सृष्टीत भरला आहे याची त्यांना जाणीव आहे, ज्ञान आहे. 
 
साबरीमलाच्या मंदिरात बाईची मासिकपाळी सुरू होण्याच्या वयात प्रवेश बंद. तो मासिक पाळी जाईपर्यंत बंदच. पाळी गेल्यावरच तो सुरू होईल. तोपर्यंत ती जिवंत राहिली तर... काही ठिकाणी तर स्त्रीजन्मच  विटाळ मानला जाऊन तिची सावली ही वर्ज्य मानली जाते. ब्रह्मचर्य पालन करणार्‍यांना तर तिचं दर्शनही अशुभ वाटते. किडामुंगीपासून हत्ती, घोड्यापर्यंत सगळे प्राणी त्यांच्या माया यापासून माणसाला विटाळ होत नाही. मग बाईचा का विटाळ होत असेल. असं म्हणतात की लोखंड नक्षत्र पडते तेव्हा पृथ्वी रजस्वला होते. तेव्हा मग हे लोक चंद्रावर किंवा मंगळावर आपल्या शुद्ध, पवित्र देवाला का घेऊन जात नाहीत? गाईचे आणि बाईंचे शरीर सारखे मानतात. नऊ महिन्यांचे तिचे गर्भारपण, तिच्या वेणा सगळं बाईसारखे आहे. गाईला मात्र तेहतीस कोटी देवांची निवासिनी केली आणि बाईला मात्र सतत घृणास्पद वागविले आहे. ज्या परेश्र्वराने वंश वाढावा म्हणून पाळी सुरू केली तिचाच एवढा तिरस्कार का केला असेल? विटाळ का मानला असेल? असा विरोधाभास आपल्या संस्कृती, शास्त्रात अनेक ठिकाणी दिसतो.
 
माणूस सुरुवातीला जंगलात, गुहेत राहाचा. अंगाला झाडाच्या साली गुंडाळायचा. अशावेळी मासिक पाळी सुरू झाल्यावर साहजिकच बाईला कुठे जाणे शक्य नव्हते. नंतर ती चूल-मूल यात अडकली. तिला सतत असं बंधनात अडकवत गेले. तीही मुलाच्या वात्सल्यापोटी हे सगळे स्वीकारत गेली. एक एक बंधने दागिन्याप्रमाणे भूषवित राहिली. बाईचं कह्यात असणं पुरुषांना अहंकार सुखावणारे होते. तिच्यावर एकट्याचा अधिकार असणे पुरुषार्थ वाटत असतो. अशा मानसिकतेतून बाईला घरात, उंबरठ्याच्या आत तिच्यावर वर्चस्व सिद्ध करता येते. बाईला सुरक्षितता मिळत गेल्यामुळे हळूहळू ती या गाळात फसत गेली. मग तिने स्वतःचेत मांडणे, वेगळा विचार करणे हेही नाकारले जाऊ लागले. जणू काय तिला फक्त गर्भाशय आहे, मेंदू नाहीच अशी वागणूक मिळू लागली. किंवा स्त्री म्हणजे फक्त मेंदू नसलेले शरीर. शास्त्रात तसे नियम तयार होऊ लागले. 
 
स्त्री, शूद्रांना मनुस्मृतीमध्ये अनेक बंधने लादली. ती आता वाचतानाही हास्यास्पद वाटते. ही बंधने, हे नियम करताना काय विचार केला असेल या लोकांनी? आपल्या समोर जितीजागती बाई, आपल्याच मुलाबाळांची आई, आपलीच जन्म दिलेली आई, एकमेकांच्या घासातला घास एकमेकांना भरवणारी बहीण, आपल्याच रक्तमांसाची लेक ... तिला एवढी बंधने का घालावी वाटली असतील पुरुषाला? या मानसिकतेचा शोध घेणं तसं फारच अवघड आहे. 
 
आताही ही मानसिकता तेवढीच तीव्र आहे, अनेक ठिकाणी. 2018 सालीही...! हे अत्यंत चुकीचे आहे. आता अशा चुका कोणी का सहन कराव्या? अशा मानसिकतेचे लोक विज्ञानाचा मुक्त वापर करतात. पण विचारांनी मुक्त का होत नाहीत? मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून अजूनही स्त्रियांना कोर्टात जावे का लागते? मंदिराचे प्रशासन कुठल्या काळात जगतेय? त्यांना भारतीय कायदे लागू होत नाहीत का? कायद्याविरुद्ध वागणे गुन्हा आहे हे या लोकांना कळत नाही का? याला देशद्रोह म्हणतात. आपल्या देशात राहून घटनेविरुद्ध वागायचे. हे सर्वधर्मसमभाव असणार्‍या भारतात कसे काय चालते? 

सावित्री जगदाळे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिक्कीम जगातील पहिले Organic State