Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चौकस वृत्ती हवी

चौकस वृत्ती हवी
PRRuturaj
जरा चौकस वृत्तीने सभोवतालच्या सृष्टीकडे, वातावरणाकडे, आणि घटनांकडे पाहिल्यास, कणाकणात अद्‍भुतता भरलेली आढळून येते. फक्त ती अद्‍भुतता पाहण्याची दृष्टी मात्र पाहिजे. साधे बीज पेरल्यानंतर त्यातून कोंब निघून त्याचे छोटेसे रोपटे होते आणि त्या रोपट्याला पुढे कळ्या, फुले लागतात हे पाहुन तर मन आश्चर्यविभोर होते. उन्हाळ्यातील एखाद्या शांत रात्री असंख्य तारका आणि तारकापुंज निरभ्र आकाशात चमचमताना पाहून प्रचंड विस्मय वाटतो, गगनचुंबी गिरिशिखरांवरची गर्द राई पाहिल्यावर सृष्टीच्या या चमत्कृतीने चकित व्हायला होते. खळखळणार्‍या नद्यांच्या नादाने जेव्हा आसमंत भरून जातो, तेव्हा अंत नसलेल्या या नादरवाने मन चिंब भिजून जाते.

webdunia
PRPR
मुंगीपासून तर हत्तीपर्यंत विभिन्न आकारा-प्रकाराचे प्राणी पाहिले म्हणजे निसर्गाच्या विविधतेचे हे आगळे रूप पाहून मन विस्मय पावते.
पक्ष्याचे वेगवेगळे आकार, रंग आणि वर्तन पाहिले म्हणजे त्या परमश्रेष्ठ कारागिराच्या प्रतिभेची साक्ष पटल्याशिवाय राहात नाही. त्याच कारगिराच्या हातचा सर्वोच्च आविष्कार जो मानव, त्यापर्यंत येऊन ठेपलो म्हणजे मन अक्षरश: तमस्तक होऊन जाते. मानवी शरीरांतर्गत असलेली स्नायूंची आणि नसांची भोंडेळी, श्वसनसंस्था, पचनसंस्था, रुधिराभिसरणाची व्यवस्था, मेंदूतील असंख्य पेशींचे चलनवलन, त्यातून निर्माण झालेली मानवाची प्रगल्भ जाणीव, सर्वच विस्मयकारक! सृष्टीत होणारी एवढीशीही घडामोड म्हणजे एक महान आश्चर्य असते, एक महान आव्हान असते.

बाह्य सृष्टीप्रमाणेच शरीरांतर्गत घडणार्‍या असंख्य हाल-चालींचेही आश्चर्य वाटायला हवे. वारंवार प्रश्‍न पडावयास हवेत की, 'हे असे का?' हरघडी असे प्रश्न पडल्यानेच मनातले कुतूहल सदैव जागे राहते, काहीतरी शोधले पाहिजे ही निकड निर्माण होते आणि प्रगतीला वाव मिळतो. ज्यास असे प्रश्न पडत नाहीत तो एकतर अत्यंत मूढबुद्धीचा तरी असतो किंवा एकदम सर्व जाणून प्रगल्भ अवस्थेला पोहोचलेला असतो. मधली स्थि‍ती यात नाहीच.

webdunia
MH GovtMH GOVT
सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि तत्त्वज्ञ सृष्टीच्या प्रतिक्षण आव्हानात्मक वाटणार्‍या आविष्काराकडे डोळे विस्फारून पाहात असतात. म्हणूनच ते दरवेळी काहीतरी नवे शोधून काढू शकतात. शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ सृष्टीच्या रहस्याचे जास्तीतजास्त आकलन करून त्यातून मानवाच्या कल्याणाच्या गोष्टी निर्माण करतात. तर तत्त्वज्ञ या सृष्टीच्या मुळाशी असलेल्या गूढ तत्त्वांचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करतात. दोघेही एका परीने विश्वाचे कोडे उलगडण्याचाच प्रयत्न करीत असतात. दोघांचेही प्रयत्न शेवटी मानवजातीचे कल्याणच साधीत असतात. विज्ञान ‍आणि अध्यात्म यामध्ये वरवर जरी फरक दिसत असला तरी शेवटी दोघांचेही उद्दिष्ट एकच आहे. आणि ते म्हणजे मानवाचा सर्वकष विकास हे होय.

अर्थात दोघांचीही सुरुवात मात्र एकाच बिंदूपासून होते आणि ती म्हणजे कुतूहल, जिज्ञासा, उत्सुकता. विश्वातील प्रत्येक घडामोडीसंबंधी उत्सुकता. याच संदर्भात या विसाव्या शतकातील सुप्रसिद्ध पाश्चात्त्य तत्त्वज्ञ विट्‍गेन्स्टाइन यांचे खालील उद्गार किती अन्वर्थक आहेत, हे सहजच लक्षात येईल. ते म्हणतात, ''जग कसे ‍अस्तित्वात आहे, यापेक्षा केवळ ते आहे, ही गोष्टच मला विलक्षण विस्मयकारक वाटते.'' कोणत्याही संवेदनशील मनाला ही गोष्‍ट मनोमन पटेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi