Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तर्कशास्त्र, नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र!

तर्कशास्त्र, नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र!

डॉ. उषा गडकरी

तर्कशास्त्र, नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र ! जीवनाला समृद्धता, संपपन्नता आणि संपूर्णता प्रदान करणारी ही शास्त्रे ! मानवी मनाच्या तीन घटकांशी अभिन्नतेने संलग्न होणारी ही शास्त्रे संपूर्ण मानवजातीच्या जीवनाला जणू अर्थ बहाल करतात. ज्ञानात्मक (Cognitive), कृतिविषयक (Conative) आणि भावनात्मक (Affective) या मनाच्या तीन घटकांशी अनुक्रमे तर्कशास्त्र, नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र निगडित असनू या तीनही शास्त्रांचे तीन आदर्श संपूर्ण जीवनाचे भव्य व उदात्त चित्र आपल्या समोर रेखाटतात. तर्कशास्त्राचा आदर्श सत्य, नीतिशास्त्राचा आदर्श शिव आणि सौंदर्यशास्त्राचा आदर्श सुदंरता ! सत्यम्, शिवम्, सुदंरम् ! जीवनातील सत्याचे, मांगल्याचे आणि सौंदर्याचे किती उदात्त व चपखल चित्रण याद्वारा होते!

कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात या तीन सनातन धर्मांचे आंशिक दर्शन आपणाला होत असते व म्हणूनच ती व्यक्ती आपल्याला कोणत्या ना कोणत्या दृष्‍टिकोनातून भावत असते. तुम्हीआम्ही सामान्य माणसे या तीन गुणांच्या आंशिक प्राप्तीतच समाधान मानत असतो त्यामुळे या गुणांचा एखाद्या व्यक्तिमत्वात पूर्णांशाने होणारा आविष्कार निश्चितच मनाला स्तिमित करून सोडतो. काही व्यक्तींमधील हा पूर्णाविष्कार जाणवण्यासाठी आपल्या स्वत:तही काही पात्रता यावी लागते.

सत्य तत्त्वाच्या एखाद्या कवडशाचेसुद्धा दर्शन आपल्यात खोटेपणाची, लबाडीची, ढोंगीपणाची तसेच दांभिकतेची, चीड निर्माण करते आणि ती चीड व्यक्तीच्या प्रत्येक आचारविचारातून दृग्गोचर झाल्याशिवाय राहात नाही. बहुजनहिताय, बहुजनसुखाय इतकेच नव्हे तर चराचर सृष्टीतील प्राण्यांविषयी मांगल्याची, कल्याणाची आणि करुणेची भावना त्या व्यक्तीचा प्रत्येक आचार, विचार तसेच उच्चार यांतून प्रकट होते. जीवनात जे जे चांगले, कल्याणकारक, उदात्त, भव्य आणि दिव्य ते ते सर्व सुंदर अशी अत्यंत प्रगल्भ आणि तरल सौंदर्यविषयक जाणीव त्या व्यक्तीच्या ठिकाणी सहजच प्रस्फुटित हतो जाते.

सत्यम्, शिवम्, सुंदरम् यांचा समभुज त्रिकोण असणे अत्यंत आवश्यक आहे. समभुज त्रिकोण असणे अत्यंत आवश्यक आहे. समभुज त्रिकोणात जो लांबीचा आणि अंशांचा समतोल आहे, तो या तीन गुणांच्या आंतरिक संबंधात अभिप्रेत व अपेक्षित आहे. सत्यम्, शिवम्, सुंदरम् चा पूर्णांशाने आविष्कार म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराचाचा साक्षात्कार होय. अशा या त्रयीचे जेथे कुठे वास्तव्य आहे त्या ठिकाणीच आपण म्हणू शकतो की, ''हे प्रभो! आम्हाला असत्यातून सत्याकडे ने, अंधकारातून प्रकाशाकडे ने आणि मृत्यूतून अमरत्वाकडे ने!''

परंतु मनाच्या घडणीचा असा समभुज त्रिकोण होणे फार कठीण. बहुतेक व्यक्तींच्या ठिकाणी या गुणांचा अमसतोलच आढळतो, परंतु त्यातही एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने लक्षात येते ती ही, की या तीन गुणांचा अत्यंताभाव आपल्याला कुठल्याही मानवात आढळत नाही. असा अत्यंताभाव असेल तर त्या व्यक्तीस मानव हे नामाभिधान आपण देऊच शकणार नाही. मानवाची सततची धडपड ही असते की या तीन गुणांमधील असमतोल जाऊन त्यात सुसंवाद कसा प्रस्थापित होईल. तो समतोल आणि सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी आपल्या मनाच्या घडणीचा सूक्ष्म अभ्यास करणे आवश्यक होऊन बसते. या अभ्यासातून जाणवते की, एखाद्या मनाच्या अंगणात सत्याने प्रवेश केला की पाठोपाठ शिव आणि सौंदर्य सहजच दाखल होतात. प्रश्न फक्त सत्याच्या प्रवेशासाठी मनाचे द्वार कायम सताड उघडे ठेवण्याचा आहे. हे दार उघडे ठेवण्याचे धैर्य ज्याच्या ठिकाणी आले, तो सर्व भरून पावला असे म्हणण्यास हरकत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi