Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वैशाख

वैशाख

डॉ. उषा गडकरी

ND
मे महिन्यातीलं, वैशाखातलं, उन्ह अगदी भरात आलं होतं. सूर्यनारायणाचे बाराही डोळे जणूं अंगार ओकत होते. दूरवर लांबच लांब चढत जाणार्‍या काळ्याशार डांबरी रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. क्वचित एखादी स्कूटर वा मारोती गाडी अंगाजवळून भर्रकन वेगाने धावत होती. आधीच अनावर झालेल्या दाहकतेत अधिकच भर घालीत होती, वारा अगदी पडला होता. वार्‍याची एखादी झुळूक आली तरी ती स्वत: सोबत निखारे घेऊनच येत होती. कानाभोवतालचा पांढरा रुमाल अधिकच घट्ट आवळला जात होता.

जुन्या-पुराण्या झालेल्या चपलांच्या पट्ट्यांमध्ये पावलं नीट बसत नव्हती. उन्हाने वितळलेल्या डांबराचे चटके न बसता चालण्याची कसरत करावी लागत होती. बाहेर सर्व असं रुक्ष, शुष्क, कोरडं होतं. अंतरंगही उजाड, उदास, भयाण झालं होतं. परिस्थितीच्या रेट्यानं आतून पूर्णपणे कोलमडलं होतं. प्रिय व्यक्तीचा अकाल मृत्यू, अर्धा खेळ मांडलेल्या स्थितीत साथीदाराचं उठून जाणं, आपलं म्हणवणार्‍यांनीच अकल्पितणं तोंड फिरवरणं, पदरात उरलेल्या संसाराचं गाठोडं पेलत कितीतरी दूरवरच्या मुक्कामापर्यंत पोहोचायचं होतं, अगदी एकटं!

अगदी एकटं असणं ही तर खरं पाहता माणसाची अत्यंत स्वा‍भाविक स्थिती ! जन्माला येताना आईशी नाळेद्वारा जुळलेला संबंध तोडूनच जन्माला यावं लागतं. आयुष्यभर याच्याशी जोड, त्याच्या जोड, ग्रंथाशी जोड, संस्थेशी जोड, विचार प्रणालीशी जोड अशी ही सांधेजुळणी करत करत शेवटी मृत्यूद्वारे सर्वांना तोडून आपल्या मूळ एकल्या स्थितीत यायचं असतं. मग आताचा हा एकटा प्रवास करताना एवढं अवघडलंपण का यावं? हे एकलेपण येवढं जिव्हारी का लागावं? सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील म्हणून कुणीतरी 'त्या' सत्पुरुषाचं नाव सांगितल. पुन्हा कुठंतरी जोडलं जाण्‍याची ही केविलवाणी धडपड आहे हे माहीत असूनही पावलं आपोआप तिकडं वळली. सत्पुरुषानं अनेक तर्‍हांनी, अनेक परींनी 'अस्तित्वाचा' अर्थ सांगितला. 'एकटेपण', 'जोडलेपण', सर्व सापेक्ष कसं आहे ते सांगितलं. मूळ 'तो' एकला असून ही सर्व विश्वाशी कसा जुळला आहे आणि सबंध विश्वात असूनही पुन्हा 'एकटाच' कसा आहे हे सांगितलं.

आपण सर्व 'त्याचीच' प्रतिबिंब! एका अर्थानं पूर्णपणे 'एकली'. दुसर्‍या अर्थानं पूर्णपणे 'जुळलेली'. म्हणून एकाच अंगानं विचार करणं थांबवलं पाहिजे. एकांगी विचार, दुभंगलेपण, वेगळेपण, एकटेपण देतो. समग्र विचार, जोडलेपणाची भावना निर्माण करतो. समग्रतेनं विचार केला म्हणजे सर्वच गोष्टी सर्वांशी जुळलेल्या असनूही शेवटी 'एकल्याच' आहेत हे ध्यानात येईल. 'एकाकी' असण्यात दुख आहे 'केवल' पणात निवांतपणा आहे, शांतता आहे, तृप्ती आहे, पूर्णता आहे.

वैशाखाच्य जळजळीत उन्हानं निर्माण केलेल्या रखरखीतपणात सत्पुरुषाचे शब्द शहाळ्याच्या थंडगार पाण्यासारखे मनाची तलखी शमविणारे ठरले. जीवनांच दुरंगी, दुपदरी रूप जीवनाला खराखुरा आशय प्रदान करतं हे नवं भान जागृत झालं. घटनांकडे एकाच अंगानं पाहण्यातून दु:ख निर्माण होत आणि दु:खाच्या नाण्याची दुसरी बाजू अगदीजवळ असूनही विनाकारण दूर गेल्यासारखी वाटते. मावळत्या सूर्य किरणांची तिरीप अडविण्यासाठी धरलेला आडवा हात नकळतच डोळ्यांना शांतवून गेला.

सभोवतलाच्या उष्ण वातावरणात सुद्धा आतून निवांतपणा देणार्‍या त्या वैशाखाप्रती मनात फक्त कृतज्ञताच दाटून आली. अगदी काठोकाठ!

Share this Story:

Follow Webdunia marathi