Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रद्धा

श्रद्धा

डॉ. उषा गडकरी

NDND
गेल्या काही वर्षांपासून आपल्या समाजात श्रद्धा म्हणजे नेमके काय, या संबंधी बराच उहापोह होत आहे. प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार श्रद्धा ही एक अतिशय उच्चानुभूती असून संस्कारक्षम मनाच्या तरल, संवेदनशील, सात्त्विक आणि प्रगल्भ स्तरावर ती उत्पन्न होते आणि त्या द्वारा जीवनात जे जे मंगल, उदात्त, पवित्र आणि कल्याणकारी आहे. त्यावरील आपला विश्वास वर्धिष्णू होतो. आपलं जीवन सफल आणि समृद्ध करण्यास श्रद्धा कारणीभूत ठरते अशी धारणा आहे. 'श्रद्धावानम् लभते ज्ञानम्' हे संस्कृत वचन सर्वश्रुत आहे. आपल्या ध्येयावर, ते साध्य करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या साधनांवर आणि आपल्या प्रयत्नांवर जर आपली प्रगाढ श्रद्धा असेल तर कोणतीही गोष्ट आपणांस असाध्य नाही याची खात्री पटते, अर्थात असे सर्व प्रयत्न करूनही आपणांस आपले इप्सित साध्य झाले नाही तरी आपल्या मार्गावरील आणि प्रयत्नांवरील आपली श्रद्धा तसूभरही ढळत नाही. कारण आपले प्राप्तव्य प्राप्त करण्यासाठी इतके घटक कार्यरत असतात की त्यावर सर्वार्थाने नियंत्रण करणे केवळ अशक्य असते त्यामुळे आपल्या प्रयत्नात अजिबात कसूर न करता सतत कार्यशील राहणे हेच आपले कर्तव्य ठरते.

जीवन जगत असतांना पावलोपावली अपाणांस श्रद्धेचा हात धरूनच चालावे लागते. रोज सकाळी सूर्य उगवणार आहे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतुचक्र अनंत काळापर्यंत सुरूच राहणार आहे, शेती पिकणार आहे, आपले जीवन धनधान्याने समृद्ध होणार आहे, आपले आप्त, स्वकीय, नातेवाईक नेहमीच आपल्या सोबत राहणार आहेत. या श्रद्धेवरच आपला जीवन प्रवास सुरू असतो. निर्जिव सृष्टी आणि पशु-पक्ष्याची सजीव सृष्टी सहसा आपल्या श्रद्धेला धक्का लावीत नाहीत. परंतु आपल्या सग्या-सोयर्‍याबाबत मात्र क्वचित या श्रद्धेला तडा जाण्याचा संभव असतो. तरीही काहीतरी तसेच मोठे कारण घडल्याशिवाय आपल्या सख्या नातेवाईकांच्या वागणुकीत फरक पडणार नही ही सुद्धा आपली श्रद्धाच असते.

मनुष्यमात्रांच्या जीवनातील सर्वोच्च श्रद्धा त्या सर्वशक्तिमान तत्त्वावर असते. मग ते तत्त्व परमेश्वर असो, निसर्ग असो किंवा सर्वशक्तिमान अशी नियती असो. मनुष्याच्या जीवनात जे काही घडते ते त्या कर्तृमअकर्तृम अन्यथाकर्तृम अशा शक्तीद्वारे घडते अशी भल्याभल्यांची श्रद्धा असते. म्हणूनच कोणतीही अनपेक्षित, विपरित आणि प्रचंड आघात करणारी घटना घडली तरी 'ईश्वरेच्चा बलियसी' अशीच सर्वसामान्य माणसांची समजूत असते.

मनुष्याच्या जीवनात श्रद्धेचे बळ हे फार मोलाचे बळ असते. शिक्षकाची, डॉक्टरची, वकिलाची, राजकारणी व्यक्तीची, शास्त्रज्ञांची किंवा अन्य कोणत्याही क्षेत्राम काम करणार्‍या व्यक्तीची ती करीत असलेल्या कामावर जर संपूर्ण श्रद्धा असेल तरच ते काम ती जीव ओतून करू शकते. श्रद्धेने केलेल्या कामातून ते संपूर्ण समर्पण भावनेनं केले असल्यामुळे बहुतेक वेळा यशच हाती येते. क्वचित अपयशही आले तरी मार्ग खडतर असल्यामुळे आपण आपल्या मार्गावरून अजिबात ढळता कामा नय हे बळही श्रद्धाच त्या व्यक्तिच्या ठिकाणी निर्माण करते.

श्रद्धेच्याच जोडीला अंधश्रद्धा हा शब्दही वेळोवेळी आपल्या कानावर पडतो. श्रद्धेचे डोळस श्रद्धा आणि अंधश्रद्धा असे दोन भाग आहेत की काय अशी शंका आपल्या मनात निर्माण होऊ शकते. अंधश्रद्धा म्हणजे अजिबात चिकित्सा न करता स्वीकारलेले भाबडे मत आणि डोळस श्रद्धा म्हणजे पूर्णपणे चिकित्सा करून बुद्धीच्या कसोटीवर पारखून घेतलेले मत असा भेदही आपल्या मनात डोकवून जातो. तत्त्वज्ञानात श्रद्धा आणि अंधश्रद्धा या संकल्पनांची अतिशय सूक्ष्म चिकित्सा केली जाते. त्यांतून श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा असते असे म्हणणारा तत्त्वेत्त्यांचा एक गट आहे तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन अगदी भिन्न संकल्पना असून त्यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे असे म्हणणारा दुसरा गटही तितक्यात जोरकसपणे कार्यरत आहे.

मनुष्य जीवनात आईचे जे स्थान आहे तेच नेमके श्रद्धेचे स्थान आहे असे मला वाटते. लहान मुले खेळतात, आपसांत खोड्या काढतात, भांडतात, अस्वस्थ होतात. पण शेवटी आईजवळ येऊन शांत होतात. त्याचप्रमाणे जीवनाच्या कोलाहलात श्रद्धेचा हा दोर जर घट्ट पकडून ठेवला तर कोणत्याही निर्वाणीच्या क्षणी आईप्रमाणेच तो दोर आपल्याला आधार देईल. आश्वस्त करेल याबाबत मुळीच शंका नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi