Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे'

'सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे'

डॉ. उषा गडकरी

वास्तविक पाहता दु:खाने आपल्याला बांधलेले नाही, दु:खामुळे आपणच आपल्याला बांधतो. दु:ख जणू एक अलंकार म्हणून आपण आपल्या अंगावर घालून घेतला आहे.      
संपूर्ण भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रारंभबिंदू कोणता, असा जर कुणी प्रश्न विचारला तर त्यावर एकमेव उत्तर म्हणजे 'दु:ख' हे होय. मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या विविध प्रकारच्या दु:खांशी त्याला सामना करावा लागतो, त्यावरून संत तुकारामांची 'सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे' ही उक्ती किती सार्थ आहे, याचेच प्रत्यंतर येते. राजपुत्र सिद्धार्थ सुखांच्या राशीवर पहुचला होता. परंतु वार्धक्य, रोग आणि मृत्यू या तीन प्रखर दु:खांचे साक्षात दर्शन होताच त्याला वैराग्य प्राप्त झाले आणि पुढे बुद्ध होऊन 'सर्वम् दुखम्' या आर्यसत्याचा त्याने उच्चार केला.

या दु:खाचे मूळ कारण शोधून त्याचे निराकरण करण्याचा त्याने अटोकाट प्रयत्न केला. सांख्य तत्त्वज्ञानाचा प्रारंभही दु:खत्रयांपासूनच होतो. आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक अशा तीन प्रकारच्या दु:खांमुळे माणसाचे जीवन किती हतबल, अगतिक झाले आहे, याचेच यथातथ्य वर्णन त्यात आहे. थोडक्यात, सर्व भारतीय तत्त्वज्ञानाची सुरुवात दु:खाच्या दर्शनामुळे झाली असली, तरी त्याचा शेवट मात्र दु:खपर्यवसायी नाही. म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञान निराशावादी आहे, असे म्हणता येत नाही.

  एखाद्याजवळ शंभर रुपये असतील तर हजार का नहीत याचे दु:ख तो करीत बसतो. म्हणजे शंभर रुपये असण्याचा आनंद तो उपभोगतच नाही व म्हणून दु:खी होतो.      
तरीही आपल्याकडे या मानवी दु:खाचे एकूण फारच अवडंबर माजविले आहे असे कधीकधी वाटते. वास्तविक पाहता दु:खाने आपल्याला बांधलेले नाही, दु:खामुळे आपणच आपल्याला बांधतो. दु:ख जणू एक अलंकार म्हणून आपण आपल्या अंगावर घालून घेतला आहे. जर सूक्ष्म निरीक्षण केले, तर दु:ख हा आपल्या जीवन जगण्याचा आधारच आहे, असे दिसून येईल. दु:ख असले म्हणजे वाटते, चला काही तरी आहे आपल्याजवळ जगण्यासारखे ! दु:खामुळे जीवनात व्यस्तता येते. दु:खामुळे आपला अहंकारही सुखावतो. आपल्या अहंकाराला जिवंत ठेवायचे असेल, तर दु:खालाही जिवंत ठेवावे लागते. सर्वसाधारण मनुष्य आपल्या अहंकाराला मूठमाती द्यावयास तयार नसतो. त्याचमुळे त्याच्या जीवनात दु:खाने कायमचे ठाण मांडले असते.

दु:ख सतत तेवत कसे ठेवावे, याची क्लृप्तीही माणूसच शोधून काढतो. जे आहे त्याकडे लक्ष देत नाही व जे नाही त्याची चिंता करती असतो. जसे एखाद्याजवळ शंभर रुपये असतील तर हजार का नहीत याचे दु:ख तो करीत बसतो. म्हणजे शंभर रुपये असण्याचा आनंद तो उपभोगतच नाही व म्हणून दु:खी होतो. आपली पत्नी, मुले-बाळे, घरदार, नोकरी यांबद्दल त्याच्या असंख्य तक्रारी असतात. कारण जी पत्नी, जे घरदार, जी नोकरी त्याच्याजवळ आहे, त्यापेक्षा शेजार्‍याची पत्नी, दुसर्‍यांची नोकरी किती चांगली, असा विचार तो करीत बसतो आणि मग खंतावतो.

As a rule, man is a fool,
Wanting hot when it is cool,
Wanting cool when it is hot,
Always wanting what is not.

मनुष्याला आनंद तेव्हाच प्राप्त होतो, जेव्हा मी कोणी 'मी' आहे हे व्यक्ती विसरून जाते. जेव्हा तुम्ही मनापासून हसता तेव्हा ते हसू जर तुमच्या रोमारोमातून आले असेल तर, तुम्ही अनुपम आनंदाचे धनी होता, कारण तुमचा 'मी' त्यात संपूर्ण विलीन झालेला असतो. 'मी'चे संपूर्ण निराकरण म्हणजेच निर्भेळ आनंदाचे अर्जन होय. हा निर्भेळ निरपेक्ष आनंद जर क्षणोक्षणी प्राप्त केला तर शाश्वत आनंदाच्या प्राप्तीसाठी या ऐहिक सुखाकडे पाठ फिरविण्याची आवश्यकता नाही. क्षणभंगुर आनंद-प्रसंगातूनच निरंतर आनंदाचे निर्झर वाहविण्याची दृष्टी ठेवली तर ऐहिक पारमार्थिक असा काही भेदच उरणार नाही व मनुष्य नित्य आनंदाचा धनी होईल.

एक मनुष्य अत्यंत निराशावस्थेत आत्महत्या करायला प्रवृत्त झाला. जेव्हा दुसर्‍या माणसाने त्यास परावृत्त करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो म्हणाला, 'मला मरू द्या. जगण्यासारखे माझ्या जीवनात काहीही नाही' दुसरी व्यक्ती म्हणाली, 'ठीक आहे, तू मरतोच आहेस तर मरण्यापूर्वी तुझे डोळे, हात, पाय काढून ठेव. माझा सम्राट मित्र त्याची लाखाने किंमत मोजायला तयार आहे.' हे समजताच त्याला आपली चूक कळून आली. 'आपल्याजवळ लाख मोलाचे डोळे, हात, पाय आहेत, बुद्धी आहे. परंतु त्याबद्दल आपल्याला कधी त्याचे कही मोल वाटलेच नाही,' हे त्याला उमगले आणि त्या प्रसंगाने त्याची जीवनदृष्टी बदलली. तो जोमाने जीवन जगू लागला. थोडक्यात, प्रश्न फक्त जीवनदृष्टी बदलण्याचा आहे, मग दु:खसागर, आनंदसागर होऊन गेलाच पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi