Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य

डॉ. उषा गडकरी

ND
मनुष्याला प्राप्त असलेले कृतिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य आणि आचारस्वातंत्र्य हा मनुष्याचा एक प्रकारे आत्माच होय. या स्वातंत्र्यावर आघात म्हणजे त्याच्या अस्मितेवर, अस्तित्वावरच आघात होत असले तरी असंख्य मानव प्रतिक्षण आत्मविस्तृत जीवन जगत असताना दिसतात. याचे कारण शरीर व मन यांवर होणार्‍या सतत संस्कारातून माणसाची प्रज्ञा अभिसंधित होत असल्यामुळे मुक्त स्वातंत्र्याच्या स्थितीची आणि त्याची कधी गाठभेटच होत नाही.

आपली अवस्था अशा तर्‍हेने अभिसंधित आहे याचे भानच त्याला होऊ नये इतक्या जबरदस्तपणे संस्काराचा पगडा त्याच्यावर असतो. Ignorance is bilss या उक्तीनुसार तो आपल्याच अज्ञानानंदात मश्गूल असतो. अर्थात काही नैसर्गिक नियमांच्या मर्यादेबाहेर जाणे मानवाला शक्यच नसते. परंतु या मर्यादा तोडणे म्हणजे स्वातंत्र्य कमविणे असा जरसमज करून घेतला, तर तो आत्मघातच ठरेल. त्यामुळे काही नैसर्गिक आणि काही मानवीय नियमांची अनिवार्यता आणि अबाधितता त्याला स्वीकारावीच लागते. वरील विधनातील 'च'कार हा पुष्कळांना मानवाच्या स्वातंत्र्यमार्गात मोठाच अडथळा आहे, असे वाटेल. परंतु या लोकांची स्वातंत्र्याची संकल्पनाच चुकीचा समजुतीवर आधारलेली आहे, ही गोष्ट सूक्ष्म निरीक्षणांती आणि चिंतनांती लक्षात येईल.

मानवाच्या या मूलभूत स्वातंत्र्याचे स्पष्ट आकलन काही अपवादभूत व्यक्तींना झालेले असते. याचे प्रत्यंतर त्याच्या लिखाणातून, भाषणातून आणि आचरणातून ठायीठायी प्रत्ययास येते. त्यांच्या इतक्या 'स्वतंत्र' आणि स्वनियंत्रित' व्यक्ती आपल्या पाहण्यात क्वचित येतात. ज्या भौतिक, रासयनिक, मानसिक रसायनंनी मानवाचा 'स्व' मनला आहे.

त्या रसायनामागील सर्व प्रकियांचे स्पष्ट आकलन करून घेऊन त्या प्रकियांच्या अनिवार्यतेची पूर्ण जाणीव होऊन ती जाणीव सर्वार्थाने आपल्या उभ्या व्यक्तिमत्त्वात संपृक्त करूनही तितक्याच सखोलार्थाने त्यापसून अलिप्त राहण्याची अजब मिया त्यांना साधलेली असते. याच कारणाने 'नित्य आनंदित' असणे हा त्यांचा स्वभाव बनून जातो. कारण कोणत्याही सूक्ष्म बंधनातून जी दु:खाची लकेर निर्माण होते, तिचा त्या बंधनात राहूनही त्यांना इवलासादेखील स्पर्श होत नाही.

ही अवस्था प्राप्त होण्यास केवळ बौद्धिक चातुर्य उपयोगाचे नाही. बौद्धिक चातुर्य हे दुधारी शस्त्र आहे, एका बंधनातून अलिप्त ठेवण्याचे कार्य त्याने साधले गेले तरी दुसर्‍या बंधनात पडण्याचा मार्गच जणू ते आखून देते. या बौद्धिक चातुर्याच्या पलीकडे जाऊन मानवी जीवनाचे स्वरूप आकलण्याचे उपजत शहाणपण काही व्यक्तींजवळ असते. त्यामुळेच सर्व नैसर्गिक आणि कृत्रिम बंधनांचे सापेक्ष स्थान समजून त्या स्थानांचा योग्य साधलेली असते. सापेक्ष अवस्थांमधून निर्माण होणारे सुखदु:खाचे तरंग त्यांच्याही प्रशांत जीवन जलाशयात उठतात.

परंतु अल्पजीवविताचा नै‍सर्गिक शाप त्या तरंगांना असल्यामुळे मूळ प्रवाहात कुठल्याही तर्‍हेची अस्वस्थता निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. धीरगंभीर सारगराच्या नैसर्गिक स्वभावानुसार सर्व वादळे, वावटळी आणि हलाहल पचवूनही नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त राहणार्‍या योग्याचीच मनोवृत्ती त्यांना लाभलेली असते.

मुक्ततेचे, स्वतंत्रतेच व म्हणून निखळ आनंदाचे इतके जिवंत उदाहरण दुसरे कुठलेही असू शकत नाही. त्यांना अकळलेल्या स्वातंत्र्याच्या अर्थाचा अंश जरी आपणापर्यंत पोहोचला तरी आपण नेहमीसाठी कृतार्थ होऊ, यात शंका नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi