Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हाताची घडी आणि तोंडावर बोट

हाताची घडी आणि तोंडावर बोट

डॉ. उषा गडकरी

NDND
लहान मुलांचा गोंगाट, गडबड आणि धडपड या चिरपरिचित आवाजावरून तेथेच कुठेतरी बालक-मंदिर असले पाहिजे, असा जो तर्क केला, तो बरोबरच निघाला. बालक-मंदिरांच्या बाई परोपरीने 'गप्प बसा' म्हणून मुलांना बिनवत होत्या, दटावत होत्या. थोडा वेळ 'गप्प बसण्याचे' सोंग मुले आ‍णीत होती. पुन्हा गोंगाटाला सुरुवात होत होती. शेवटी शिक्षिकेने एक वेगळीच घोषणा केली. ''हताची घडी आणि तोंडावर बोट'' अशा स्थितीत किमान पाच मिनिटे बसणार्‍याला पाच पाच चॉकलेट्‍स बक्षीस मिळतील. आणि याचा मात्र परिणाम चटकन दिसायला लागला. गोंगाटाचे प्रमाण एकदम कमी झाले. चापटा मारणे,‍ चिमटे घेणे, वेणीची रिबन ओढणे हे प्रकार जवळजवळ थांबलेच. सर्व वर्गात एक अस्वस्थ स्वस्थता दिसायला लागली.

स्वस्थतेची, शांततेची ती पाच मिनिटे पाच युगासारखी वाटायला लागली. ती पाच मिनिटे शांततेने पार पाडण्यासाठी जिवाचा आटापिटा करावाला लागला. प्रत्येक बालक 'इंच इंच लढवू'च्या आवेशात 'क्षण न् क्षण' लढवीत होता. तरीही कुठूनतरी फिसकन् हसण्याचा, कुठूनतरी खोकल्याच्या उबळीचा वा खाकरण्याचा आवाज येतच होता. सरते-शेवटी ती पाच मिनिटे संपली. सर्वांनी हुश्श करून सुटकेचा नि:श्वास सोडला. आता चॉकलेटसाठी एवढा गलबला सुरू झाली की त्या गलबत्यात मघाची ती शांततेची पाच मिनिट कुठल्याकुठे गडप झाली.

वरील गोष्टीचा मथितार्थ अगदी स्पष्ट आहे. नितिमत्तेचे, चांगले वागण्याचे उसने अवसान कितीही आणले तरी शेवटी ते ओढूनताणून आणलेले अवसान असते. अशा तर्‍हेचा आव हा नेहमीच फुसका बार ठरतो. नितिमत्ता ही बाहेरून प्राप्त होणारी गोष्ट नव्हे. ती आतूनच प्राप्त झाली पाहिजे. विशेषत: शिक्षेच्या भीतीने अगर बक्षिसाच्या आशेने कुणी चांगला वागत असेल तर ते खर्‍या अर्थाने चांगले वागणे नव्हेच. ते केवळ कातडी बचाऊ धोरण असते. खोटे बोलणे, चोरी करणे, याकरिता जर कडक शिक्षा होत असेल आणि या शिक्षेच्या भीतीने जर कुणी चोरी करण्यापासून परावृत्त होत असेल तर या परावृत्त होण्याला नितिमानतेचे खरे अधिष्ठान लाभणार नाही.

'चोरी करू नये' ही गोष्ट मनोमन आतून पटली पाहिजे. एखाद्या संस्‍थेला भरघोस देणगी दिल्याने जर माझे नाव होणार असेल, चार-चौघात दाता म्हणून माझा गौरव होणार असेल आणि म्हणून मी देणगी देणार असेन तर माझ्या या औदार्याला कुठल्याही रीतीने ‍नीतिमत्तेच्या आयाम प्राप्त होऊ शकणार नाही. सौजन्य, सौहार्द, औदार्य, प्रामाणिकपणा या गोष्टींचे योग्यपण अंतर्यामी पटले पाहिजे. नसानसांत, कणाकणात भिनले पाहिजे. कुठल्याही भीतिपोटी अगर अपेक्षेपोटी त्यांचा उगम व्हायला लागला तर उसनी, बेगडी नीतिमत्ता होईल.

राज्य सुरळीत चालण्यासाठी संसदेत अनेक कायदे करण्यात येतात. परंतु केवळ कायदे केल्याने माणसे नीतिमान होतातच असे नाही. उदाहरणार्थ हुंडाविरोधी कायदा कधीचाच संसदेत संमत झाला आहे. परंतु त्यामुळे हुंडा देणेघेणे बंद झाले आहे असे नाही. तसेच इतरही कायद्यांचे आहे. यासाठी मनातूनच परिवर्तन होणे आवश्यक आहे. असे झाले म्हणजे सद्‍गुण नैसर्गिक होईल. ज्याप्रमाणे निसर्गत: पाणी शीतल असते आणि अग्नी दाहक असतो, त्याप्रमाणे सद्‍गुण हा माणसाच्या सहजधर्म व्हायला हवा. अकृत्रिमपणे असे झाले म्हणजे तो अंगी बाणवण्यासाठी कसरत करावी लागणार नाही. बालक मंदिरातील ह्या लहान बालकांसारखा जिवाचा आटापिटाही करावाल लागणार नाही. असा सहजसुंदर सद्‍गुणाचा परिमला दशदिशांना पसरण्यास कितीसा वेळ लागणार?

Share this Story:

Follow Webdunia marathi