Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुख ही डिश नाही एकट्याने शिजवायची.....

सुख ही डिश नाही  एकट्याने शिजवायची.....
, रविवार, 18 नोव्हेंबर 2018 (00:37 IST)
किती सहज म्हणतोस रे ...
म्हणे एक प्लेट सुख आण पट्कन ...
बाजारात जा आणि 
सहनशक्ती घेऊन ये बरं झटकन ...
 
भिजत घालेन काही वेळ
संयमाच्या पाण्यात.
बांधून घालेन काही काळ 
घट्ट ओठांच्या फडक्यात.
 
दुर्लक्षाच्या उबेमध्ये 
छान मोड येतील.
सुखाचे ताजे ताजे 
कोंब दिसू लागतील.
 
माया आणि आपुलकीचा
फर्मास मसाला.
कष्ट आणि मेहनतीचा 
खर्डा घालू चवीला.
 
परस्पर स्नेहाचं 
खोबरं घालू छानसं.
बंधन आणि मर्यादांचं 
मीठ घालू इवलुसं.
 
साखरपेरणी करू थोडी
गोड गोड शब्दांची.
कोथिंबीर घालू थोडी
आस्था आणि समजुतीची.
 
कटू शब्द, राग, लोभ
चुलीमध्ये घालू.
स्वार्थ आणि गैरसमज 
भाजूनच काढू.
 
तयार झाली डिश आपली
सजवायला घेऊ.
तृप्ती आणि कौतुकाची 
साय घालू मऊ.
 
बघितलंस ??
 
सुख ही डिश नाही 
एकट्याने शिजवायची.
सर्वांनीच रांधायची नि 
मिळूनच खायची. 
 
© स्वाती जोशी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाण्याचं महत्त्व पटवून देणारा एक होतं पाणी लवकरच रसिकांच्या भेटीला, पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरू....