Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘सुपरमॉम’ नको, आई हवी!

‘सुपरमॉम’ नको, आई हवी!
आई म्हणून मुलांच्या अभ्यास आणि इतर कलागुणांकडे लक्ष देणं हे स्त्रियांचं कर्तव्य आहेच पण आजची नोकरी करणारी आणि करीअरिस्टीक आई आपल्या मुलांना जमान्याच्या पुढे नेण्याच्या हट्टाने त्यांना सर्वगुणसंपन्न बनवण्याच्या मागे लागलेली दिसतेय. 
 
मुलांनी अभ्यासात, खेळात, कला-गुणात एवढंच नाही तर समाजात वावरतानाही स्मार्ट बनलंच पाहिजे हा तिचा अट्टाहास वाढलाय. आपल्यासारखं घर-संसार आणि करिअरही त्यांनी समर्थपणे पेलावं म्हणून त्यांना सगळ्या गोष्टीत परफेक्ट करण्याच्या ती मागे आहे. त्यात मुलांचं बालपण मात्र हरवून जातंय. त्यामुळे आई ही सुपरमॉम नकोच असं मुलं म्हणत असतील.
 
webdunia
अभ्यास आणि एक्स्ट्रॉ करीक्युलम अँक्टीव्हिटीमध्ये मुलांना सतत पुढे ठेवायचा अट्टाहास करताना त्यांचं बालपण आपण हिरावून घेतोय याची कल्पना आजकालच्या आयांना होत नसावी. त्यांना वाटत असतं की मुलांसाठी आपण करिअरवर पाणी सोडलं आहे म्हणजे त्यांनी अभ्यास आणि इतर क्षेत्रात चमकलंच पाहिजे, नाहीतर आपल्या नोकरी सोडून घरी बसण्याचा काय उपयोग? त्यासाठी मुलांवर कोणती ना कोणती कला शिकण्याची सक्ती होते. त्यांच्या अभ्यासावर नको इतकं लक्ष दिलं जातं. या सगळ्यात त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व फुलायचं राहूनच जातं. एखाद्या क्षेत्रात नाव कमावणारे प्रतिथयश लोक त्यांच्या लहानपणी त्यासाठी किती कष्ट घेत होते याचा एकदा विचार करायला हवा. अनेकदा त्यांना आपल्यातल्या कलागुणांचा अचानक शोध लागलेला दिसतो. बहुतेकांना आवड म्हणून त्या क्षेत्राची निवड केलेली दिसते. त्यांच्या आया त्यांच्यामागे आजच्या आयांसारखं टाईमटेबल घेऊन हिंडल्या होत्या का? मुलांना सगळ्या क्षेत्रात चमकवण्याचा अट्टाहास थांबायला हवा. 
 
आपल्या मागच्या पिढीकडे बघा. आपली आई शाळेतल्या पेरेंट मिटींगना किती आली होती? आपल्याला कोणत्या क्लासला जायचंय यासाठी तिने किती माहिती काढली होती?पण मुलं मार्गी लागली की तिच्या चेहर्‍यावर समाधानाचं हसू यायचं. पण त्यानंतरची पिढी स्वत: शिकलेली आणि नोकरी करणारी झाली. पण गेल्या सात-आठ वर्षात काळ झपाटय़ाने बदलला. लग्नाआधीपासून नोकरी आणि लग्नानंतर उशिराने मुलाचा विचार करून त्याचं बालपण अनुभवण्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडून घरी बसणारी आई दिसू लागली. इंटेलिजंट असं प्रत्येकवेळी कसं काय असणार? मोठं झाल्यावर हीच मुलं तिला तू आम्हाला मनाप्रमाणे वागूच दिलं नाहीस म्हणून एखाद्या वेगळ्याच निसरडय़ा वाटेवर निघून गेली तर? .. तर या तिच्या सगळ्या कष्टांना आणि त्यागाला काही अर्थ उरेल का? हे सगळं टाळायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळं लक्ष मुलांवरच केंद्रित करण्याऐवजी आपली अशी एक वेगळी ओळख होईल याकडेही लक्ष द्या. तरच धोक्याची वळणं टाळता येतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय आपण स्वत: नष्ट करत आहात आपले स्पर्म?