Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माहेरी आलेल्या लेकीच्या आईचे मनोगत......

माहेरी आलेल्या लेकीच्या आईचे मनोगत......
लेक आली माहेराला
सूनबाई नीट वागा...
दोन दिवसांची पाहुणी
राग राग करू नका

आली थकून भागून
नको सांगू काही काम...
माहेराच्या सावलीत
तिला करू दे आराम

फार मनाची हळवी
बोलू नको शब्द उणा...
राख तिचा मान-पान
लाव तुझा मोठेपणा

लेक आली माहेराला
कर काही गोड-धोड...
जिरे-साळीच्या भाताला
तूप वाढ लोणकढं

कर खमंग काहीसं
दुपारच्या फराळाला...
फार आवड फुलांची
धाड निरोप माळ्याला

आणि लिंबाच्या झाडाला
देई झोपाळा टांगून...
तिचे बालपण तिला
पुन्हा येऊ दे मिळून

लेक चालली सासरी
जीव माझा हुरहुर...
मुरडीचा कानवला
गव्हल्याची कर खीर

ओटी भर, हाती देई
खण जरीच्या काठाचा...
दही घाल हातावर
टांगा थांबला केव्हाचा

थकला गं माझा जीव
हात-पाय उचलेना...
तूच आता तिची 'आई'
जप माझी भोळी मैना

-अज्ञात

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हे 5 पावलं 7 दिवसात कमी करतील पोटाची चरबी