Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आकाश

आकाश

डॉ. उषा गडकरी

NDND
अनिवार वेगाने धडाधड कोसळणार्‍या त्या पर्जन्यधारांकडे मी खिडकीतून टक लावून पहात होते. त्यांच्या कोसळण्याचा वेग इतका प्रचंड होता की, पाण्याचा जाड पडदा पाहणार्‍याच्या आणि बाहेरील जगामध्ये जणू उभा राहिला होता. आपल्या आतबाहेर सर्व दूर पाणीच पाणी भरून राहिल्यासारखे वाटते होते. एक अति वेगवान परंतु लयबध्द स्पंदनही त्या पडण्याला प्राप्त झाले होते. दुसर्‍या मजल्यावरच्या खिडकीतून मी बाहेर पहात असल्यामुळे वरचे आभाळ आणि खालची धरती दोन्हीही नरजेच्या टप्प्यातून सुटले होते. आणि अधांतरी, अंतराळात एका पाण्याशिवाय अन्य काहीच नाही असे जाणवत होते. क्षितिजाची रेषा पाण्याच्या रेषांमध्ये मिसळून गेली होती. सारे अस्तित्व एकरस, एकसंध होऊन स्वत:चे अस्तित्वही जलस्वरूप झाल्यागत वाटत होते. मला एकाएकी 5 वर्षापूर्वी अलाहाबादला गंगा-यमुनेच्या संगमावर दोन अति-विशाल नद्यांच्या रूंद पात्रांमधून वाहणार्‍या अथांग पाण्याची आठवण झाली. पाण्याचा विस्तार अनुभवणे हा खरोखरीच एक अद्भुत अनुभव होय. एकाच वेळेस त्यातील उद्दाम उग्रता आणि मृदू-मुलायमता जाणवत राहते. एकाच वेळी सर्वभक्षी आक्रमकता आणि त्याचवेळी जीवनदायीनी आश्वासकतेचा अनुभव येतो. एखाद्या गावाला पाहता पाहता वेढून टाकणार्‍या चपळ जलराशींची भयप्रद वेगवान हालचाल आणि दुसर्‍याच क्षणी संथ वाहणार्‍या पाण्याद्वारे आपल्या दोन्ही काठांवरील भूभाग सुजलाम-सुफलाम् करून टाकण्याचे विलक्षण सामर्थ्य असलेल्या त्या जलराशी! पाण्याचे हे दुहेरी रूप पाहून-अनुभवून मी अगदी चक्रावून, वेडावून गेले.

मग पाहता पाहता या जगड्व्याळ सृष्टीतील प्रत्येक अणुरेणूचे हे दुहेरी स्वरूप मला अंतर्बाह्य जाणवायला लागले. त्याच्या एकाचवेळी विघटनकारी आणि संघटनकारी सामर्थ्याचे दर्शन आणि संघटनकारी ासमर्थ्याचे दर्शन मला होऊ लागले. उत्पत्ती आणि लय पावणार्‍या प्रत्येक स्पंदनकारी क्षणासोबत हे दुहेरी रूपही कसे आलटून पालटून बदलत असते याचे विस्मयकारी दर्शन घडू लागले. अग्नीचे सर्वभक्षी प्रलयकारी रूप आणि त्याचबरोबर सर्व जीवजंतूंना संजीवन देणारे सौम्य रूप, दोन्हीही एकाच वेळी अग्नीच्या ठायी स्थित असतात. असंख्य प्रणीमात्रांचा प्रचंडभार वाहणारी सोशीक पृथ्वी आणि कधीतरी हे सर्व असह्य होऊन आतून स्फोट पावून भूकंप-ज्यालामुखीच्या रूपाने अनावर होणारी पृथ्वी! चक्रीवादळाच्या तुफानी वेगाने महाकाय मेरूमांदारांनाही चळचळा कापायला लावण्याचे सामर्थ्य असलेला आणि त्याचवेळी आपल्या अतिशीतल मृदू हालचालीने थकल्या-भागल्या जीवांना विंझण-वारा घालणारा, दोन्ही रूपे एका वायूचीच!

webdunia
WDWD
असेच दुहेरी रूप फुला-फळांचे आहे, किडा-मुंगीचे आहे, पशू-पक्ष्यांचे आहे. त्यांच्यातील सर्जक आणि विध्वंसक दोन्ही शक्तींचा मुक्तआविष्कार पाहून मन थक्क होते आणि विषण्णही होते. मनुष्याच्या संदर्भात मात्र या दुहेरी रूपाने कधी हाहा:कार निर्माण केला, तर कधी लावण्यमय, सोंदर्यमय चांदण्याची बरसात केली. कधी सर्व संहारक, अति-भयंकर युध्ये छेडून मानव जातीला विनाशाच्या कड्यावर आणून सोडले तर कधी असंख्य कबुतरांना अं‍तराळात सोडून जगात एका निरामय, अभय अशा शांतीमंत्राचे जागरण केले. सूडाच्या, मत्सराच्या, द्वेशांच्या ज्वाळांनी अंतर्बाह्य पेटून राख होण्याचे पत्करले तर कधी अत्यंत करूणामय, दयामय, स्नेहार्द्र, अमृतपय दृष्टिकिरणांचा वर्षाव करून जात्या जीवालाही जगण्याची उभारी दिली. परस्पर-विरोधी तत्त्वांनी भरलेल्या या विश्वातील घडामोडींना एका तटस्थतेने कमालीच्या अलिप्ततेने, साक्षीभावाने पाहण्याे काम करणारे ते विभू, सर्वव्यापी, ठाम आकाश मात्र मला या सगळ्यापेक्षा वेगळेच वाटते. प्रपंचात असूनही अत्यंत निर्लेप, अलिप्त असणार्‍या या आकाशाचे अनावर आकर्षण मला लहानपणापासून आहे.

माझ्या लहानपणी आमच्या घराच्या पडवीत जाणार्‍या चार पायर्‍यांपैकी तिसर्‍या पायरीवर बसले आणि पायाशी खाली वाकून आकाशाकडे पाहिले म्हणजे झाडांच्या फांद्यांच्या फटीतून अगदी तळहाताएवढे आकाश दिसायचे. त्या इवल्याशा तुकड्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत बसले म्हणजे ते मोठे होत होत असे की, त्याने जणू सर्व विश्व व्यापले आहे, असे वाटायचे. माझ्या मनात त्यावेळेस एक चमत्कारिक विचार यायचा. मला वाटायचे या विश्वात चंद्र, सूर्य, तारे, कृमी-किटक, झाड-पेड, मानव काहीच नसते तर अन्य काय असते? अन् मग लगेच जाणवायचे की, सर्व अणुरेणूत व्यापून उरलेले आकाश तर असतेच असते. ते कुठेच जाऊ शकत नाही. कारण कुठे जाण्या येण्यासाठी ते खंडीत कुठे आहे? ते जिथे नाही अशी कुठली जागाच नाही. बाकीच्या चार महाभुतांच्या ठायी अंतर्निहित असलेल्या सगळ्या विश्वावर मायेचं पांघरून घालून त्याला निवांत, गुडूप निद्रासुख देण्याचं महान कार्य करणार्‍या आकाशाकडे मी नेहमीच अचंबित दृष्टीने पाहत असते.

webdunia
WDWD
एकदा मात्र आकाशाचा एक अगदीच अनोखा गूढ-गंभीर अनुभव मला आला. उन्हाळ्यात गच्चीवर झोपलो असताना अचानक केव्हातरी मध्यरात्री मल जाग आली. सर्वत्र एक नीरव शांतता भरून राहीली होती. झाडांची पानेदेखील अगदी स्तब्ध होती. वर आकाशात असंख्य तारे चमचमत होते. हात डोक्याखाली घेऊन मी आकाशाकडे डोळ्याची पापणी नलावता पाहू लागली आणि एकाएकी सर्व आकाश आक्रसून त्याचा संकोच होतो आहे. सर्व विश्वालाही ते आपल्या सोबतच लपेटून त्याचाही संकोच करीत आहे. असे जाणवू लागले. शेवटी शेवटी तर हा संकोच इतका पराकोटीचा होऊ लागला की मला श्वास घेण्यासाठीही मोकळे अवकाश राहिले नाही. श्वास अगदी घुसमटू लागला. एखाद्या सर्व बाजूंनी बंद कोठडीत आपण आत आत कोंडले जात आहोत, असे वाटू लागले. या अगदी निर्वाणीच्या क्षणी कोणता तरी अनाम पक्षी पाण्यात सूर मारावा त्याप्रमाणे क्षितिजाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत उडत गेला. आणि मला एकदम मोकळे झाल्यासारखे वाटले. एखाद्या स्थितप्रज्ञ पुराणपुरूषासारखे निश्चल परंतु आश्वासक नजरेने ते आपल्याकडे पहात आहे, असे जाणवले. आकाशाच्या छताला टांगलेल्या त्या असंख्य दीपकांच्या झगमगाटाकडे पुन्हा माझे लक्ष वेधत नाही तोच तुटणार्‍या तार्‍याची एक प्रकाश-शलाका आकाशात आपले अस्तित्व उमटवून गेली. निस्तब्ध, निर्विकार, क्रियाशून्य, आकाशाच्या पोकळीत पुन: हालचाल सुरू झाली. ही हालचाल, उलाढाल जितकी खरी आहे तितकेच या सर्व गोष्टींना पोटात साठवून घेणारे आकाशही खरे आहे, नव्हे तेच एक खरे आहे!

Share this Story:

Follow Webdunia marathi