Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोदींच्या लक्षद्वीप भेटीवर टिप्पणी, भारतातून प्रतिक्रिया, मालदीव सरकार बॅकफूटवर, काय घडलं?

मोदींच्या लक्षद्वीप भेटीवर टिप्पणी, भारतातून प्रतिक्रिया, मालदीव सरकार बॅकफूटवर, काय घडलं?
, सोमवार, 8 जानेवारी 2024 (12:12 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत मालदीव सरकारच्या मंत्री मरियम शिउना आणि इतर नेत्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांमुळे वातावरण चांगलंच तापलंय.
मोहम्मद मुइज्जू मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून सातत्याने एकमेकांवर कुरघोडीच्या प्रयत्नांमुळे दोन्ही देशांतील संबंधांना मोठा धक्का पोहचत असल्याचं सांगितलं जात आहे.
 
भारतातील अनेक सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य नागरिक याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. भारतातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #BycottMaldives हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय.
 
दरम्यान, मालदीवचं मोहम्मद मुइज्जू सरकार सारवासारव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
 
या प्रकरणी मालदीव सरकारने सर्वप्रथम एक निवेदन प्रसिद्ध करून मंत्र्याच्या विधानांपासून फारकत घेतली. त्यानंतर मालदीव सरकारच्या हवाल्यानं मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला की, टीका केलेल्या मंत्र्यांना निलंबित केलं गेलं आहे.
 
 
माजी उपसभापतींचा मंत्र्यांच्या निलंबनाला दुजोरा
प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, मालदीव सरकारने आपल्या निवेदनात म्हटलंय की, “शेजारील देश असलेल्या भारताचा अपमान करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टबाबत पराराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केलंय. सरकारी पदावर असताना ज्या लोकांनी सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्ट टाकल्या आहेत, त्यांना निलंबित करण्यात आलंय."
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मरियम शिउना यांच्या व्यतिरिक्त मालशा शरीफ आणि महझूम माजिद यांनाही निलंबित करण्यात आलंय.
 
मालदीवच्या माजी उपसभापती आणि खासदार इवा अब्दुल्लाह यांनी मंत्र्यांच्या निलंबनाला दुजोरा देत मालदीव सरकारने भारतीय जनतेची माफी मागावी, असं म्हटलंय.
 
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार त्यांनी म्हटलं की, "मालदीव सरकारने मंत्र्यांच्या वक्तव्यापासून फारकत घेणं महत्त्वाचं आहे. मला माहीत आहे की सरकारने मंत्र्यांना निलंबित केलंय. पण मला असं वाटतं की मालदीव सरकारने भारताच्या लोकांची माफी मागणंही तितकंच महत्वाचं आहे."
 
इवा यांनी म्हटलं की, “मंत्र्यांनी केलेली टिप्पणी लाजीरवाणी बाब आहे. हा वर्णद्वेष आहे आणि तो कदापि सहन केला जाऊ शकत नाही. हे भारताबाबत आणि भारतातील लोकांबाबत मालदीवच्या लोकांचं मत नाही. भारतावर आम्ही किती प्रमाणावर अवलंबून आहोत याची आम्हाला जाणीव आहे. जेव्हा आम्हाला गरज पडली तेव्हा सर्वप्रथम भारताने मदत केली आहे.”
 
इवा अब्दुल्लाह यांनी म्हटलं की, “आम्ही आर्थिक हितसंबंध, सामाजिक हितसंबंध, आरोग्य, शिक्षण, व्यवसाय, पर्यटन इत्यादींसाठी भारतावर अवलंबून आहोत. लोकांना याची जाणीव आहे आणि त्याबद्दल ते त्यांचे ऋणी आहेत. माजी मंत्री आणि विद्यमान सरकारमधील आघाडीच्या मित्रपक्षांसह सर्व राजकीय पक्षांनी या अपमानास्पद वक्तव्याबाबत निषेध नोंदवलाय.”
 
याआधी माजी राष्ट्रपती मोहम्मद नाशीद, माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह आणि माजी परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी या वक्तव्याचा निषेध केला आणि त्यांच्या देशाच्या सरकारला चांगलंच धारेवर धरलं.
 
अलीकडच्या काही महिन्यांत मालदीव आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये बदल झाल्याचं दिसून येतंय. विशेषत: नोव्हेंबर 2023 मध्ये मोहम्मद मुइज्जू राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर कटुता वाढली आहे.
 
मुइज्जू सत्तेत येण्यापूर्वी इब्राहिम मोहम्मद सोलिह हे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांच्या सरकारने 'इंडिया फर्स्ट' हे धोरण राबवलं होतं. मुइज्जू यांनी 'इंडिया आउट'चा नारा देत निवडणूक लढवली होती. विजयानंतर मुइज्जूच्या निर्णयांमुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणल्याचं दिसून येत आहे.
 
मुइज्जू भारतापेक्षा चीनच्या जवळचे मानले जातात.
 
पंतप्रधान मोदींचा लक्षद्वीप दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला लक्षद्वीपला भेट दिली. पंतप्रधान मोदींनी या दौऱ्याची छायाचित्रे त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून पोस्ट केली होती.
 
फोटो शेअर करून मोदींनी लिहिलं होतं की, ‘ज्यांना थराराची आवड आहे त्यांनी लक्षद्वीपला आवर्जून भेट द्यायला हवी.’
 
दौ-यादरम्यान त्यांनी स्नॉर्कलिंगही केलं आणि एक प्रकारे ते लक्षद्वीपच्या पर्यटनाला चालना देताना दिसले.
 
ही छायाचित्रे पाहिल्यानंतर लाखो लोकांनी अचानक गुगलवर लक्षद्वीप सर्च केलं आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की, आता लोकांनी सुट्टी साजरी करायला मालदीवऐवजी लक्षद्वीपला जायला हवं.
 
दरवर्षी भारतातील दोन लाखांहून अधिक जण मालदीवला भेट देतात.
 
मालदीवमधल्या भारतीय उच्चायुक्तांच्या माहितीनुसार, 2022 मध्ये 2 लाख 41 हजार आणि 2023 मध्ये सुमारे 2 लाख पर्यटकांनी मालदीवला भेट दिली.
 
मुइज्जू यांच्या मंत्र्याचं आक्षेपार्ह विधान
मालदीवऐवजी लक्षद्वीपला जाण्याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागल्यावर मालदीवमधूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या.
 
मालदीव सरकारमधील मंत्री मरियम शिउना यांच्याही टिप्पणीचा यात समावेश होता. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोवर आक्षेपार्ह विधानं केली होती.
 
नंतर त्यांनी स्वत:चं एक ट्वीट डिलीट केलं. मात्र, दुसऱ्या ट्विटमध्ये मरियम म्हणाल्या, 'मालदीवला भारतीय लष्कराची गरज नाही.'
 
मालदीवचं सौंदर्य दाखवणारे अनेक ट्विट मरियम सोशल मीडियावर शेअर करत असतात आणि लोकांना मालदीवमध्ये येण्याचं आवाहन करत असतात.
 
मरियमशिवाय मालदीवच्या इतर अनेक नेत्यांनीही अशा कमेंट केल्या होत्या ज्या लोकांना फारशा रुचल्या नव्हत्या.
 
अशा वक्तव्यावर भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. सर्वसामान्य लोकांव्यतिरिक्त बॉलिवूड कलाकार आणि खेळाडूंनीही प्रतिक्रिया नोंदवल्या
 
त्याचा परिणाम मालदीवमध्येही दिसून आला. मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी त्यांच्या सरकारला या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचा सल्ला दिला.
 
मोहम्मद नशीद यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, "मालदीवच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रमुख मित्र देशासाठी मालदीव सरकारच्या मंत्री मरियम अतिशय चुकीची भाषा वापरत आहेत.”
 
मुइज्जू सरकारने अशा विधानांपासून दूर राहावं. त्याचबरोबर ही सरकारची भूमिका नाही हेही स्पष्ट केलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं.
 
मालदीवचे माजी अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी अशी विधानं असंवेदनशील आणि संबंध बिघडवणारी असल्याचं म्हटलंय.
 
त्यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर लिहिलं की, “मालदीवच्या सरकारी अधिकाऱ्यांकडून सोशल मीडियावर भारताविरुद्ध वापरलेल्या द्वेषयुक्त भाषेचा मी निषेध करतो. भारत हा मालदीवचा कायम अतिशय जवळचा मित्रदेश राहिलाय आणि आपल्या दोन्ही देशांमधील वर्षानुवर्षे जुन्या मैत्रीवर नकारात्मक परिणाम करणारी अशा प्रकारची असंवेदनशील विधानं अजिबात खपवून घेतली जाता कामा नये.”
 
याशिवाय मालदीवचे माजी परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये लिहिलंय की, “विद्यामान मालदीव सरकारचे उपमंत्री आणि सत्ताधारी आघाडीच्या एका राजकीय पक्षाच्या नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेच्या विरोधात सोशल मीडियावर केलेली अपमानास्पद टिप्पणी निषेधार्ह आणि घृणास्पद आहे.
 
"सरकारने या अधिकार्‍यांवर कारवाई केली पाहिजे. सार्वजनिक पदांवर असलेल्या लोकांनी शिष्टाचाराचं पालन केलं पाहिजे. सोशल मीडियावर अनावश्यक फाटे फुटणार नाहीत याची दक्षता आणि लोकांनी देशाच्या हिताचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे."
 
“आपले संबंध परस्परविषयी आदर, इतिहास, संस्कृती आणि लोकांच्या एकमेकांवरील मजबूत विश्वासाच्या पायावर आधारित आहेत. भारत हा सर्व कसोट्यांवर खरा उतरलेला मित्र आहे,” असंही त्यांनी लिहिलं.
 
मालदीव सरकारचं स्पष्टीकरण
काही तासांनंतर मालदीव सरकारने एक निवेदन प्रसिद्ध करून स्पष्टीकरण दिलं.
 
रविवारी (7 जानेवारी) प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, “परदेशी नेते आणि उच्च पदस्थ व्यक्तींच्या विरोधात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांबद्दल मालदीव सरकारला माहिती आहे. ही मतं वैयक्तिक असून मालदीव सरकारच्या धोरणांचं प्रतिनिधित्व करत नाहीत."
 
"अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर लोकशाही आणि जबाबदारीने केला गेला पाहिजे जेणेकरून त्यामुळे द्वेष, नकारात्मकता वाढणार नाही आणि मालदीवच्या आंतरराष्ट्रीय मित्रपक्षांसोबतच्या संबंधांवर परिणाम होणार नाही," असंही मालदीव सरकारने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
 
अशी अवमानकारक टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाई करण्यास शासनाचे संबंधित विभाग मागेपुढे पाहणार नाहीत, असेही निवेदनात म्हटलं आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेलिब्रेटींचा पाठिंबा
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडियावर भारतीयांविरोधात वर्णद्वेषी टिप्पण्या करणा-या मालदीवमधील मोठ्या व्यक्तींचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.
 
अक्षय कुमारने लिहिलंय की, “ज्या देशातून सर्वाधिक संख्येने पर्यटक पाठवले जातात त्या देशाच्या विरूद्ध हे लोक असे वागत आहेत, याचं मला आश्चर्य वाटतं. आपले शेजाऱ्यांशी चांगले संबंध आहेत पण अशी द्वेषपूर्ण वक्तव्यं का म्हणून सहन करायची? मी अनेक वेळा मालदीवला गेलो आहे आणि त्यांचं कौतुक केलंय, पण आमचं प्राधान्य सर्वप्रथम आमच्या देशाला आहे. आपण आपली भारतीय बेटं एक्स्प्लोर करण्याचा आणि आपल्या देशाच्या पर्यटनाला पाठिंबा देण्याचा संकल्प करूया.”
 
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अक्षय कुमारची पोस्ट पुन्हा शेअर करत क्रिकेटर सुरेश रैनाने लिहिलंय की, मालदीवच्या लोकांच्या द्वेषपूर्ण प्रतिक्रिया पाहून त्यालाही दु:ख झालंय.
 
त्यांने लिहिलंय की, "हे पाहणे अतिशय दु:खदायक आहे, विशेषत: तेव्हा जेव्हा त्यांच्या अर्थव्यवस्थेसह अनेक प्रकारच्या संकटांना तोंड देण्यासाठी भारताचं अतिशय महत्त्वपूर्ण योगदान असतं.”
 
रैनाने म्हटलंय की, तो अनेकवेळा मालदीवला गेला आहे आणि तिथल्या सौंदर्याचं गुणगान गायलं आहे, पण आता वेळ आलेय की आपण आपल्या स्वाभिमानाला प्राधान्य द्यायला पाहिजे.
 
त्याने लोकांना भारतीय बेटं एक्स्प्लोअर करण्याचंही आवाहन केलंय.
 
अभिनेता जॉन अब्राहमने देखील मालदीवची छायाचित्रे शेअर केली आणि लिहिलं, "भारताचं आदरातिथ्य आणि 'अतिथी देवो भव:’ची भावना लक्षात घ्यायला हवी. शिवाय फिरण्यासाठी प्रचंड समुद्रसौंदर्य. लक्षद्वीप हे खरोखरंच भेट देण्यासारखं ठिकाण आहे."
 
सर्व सेलिब्रेटींकडून #exploreindianislands या हॅशटॅगचा वापरत केला जातोय.
 
सचिन तेंडुलकरनेही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग समुद्रकिनाऱ्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
 
त्याने म्हटलं आहे की, "भारताला असे सुंदर समुद्रकिनारे आणि बेटं लाभली आहेत. आमच्या अतिथी देवो भव: या विचारामध्ये अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत. कितीतरी आठवणी मूर्त होण्याची वाट पाहत आहेत.”
 
या कलाकारांशिवाय श्रद्धा कपूरसारख्या अनेक सेलिब्रिटींनीसुद्धा मालदीवबद्दल ट्विट केलंय.
 
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बिल्किस बानो सामूहिक बलात्कारातील दोषींच्या सुटकेचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द