Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Monsoon : दोन दिवसांत मान्सून पूर्णपणे माघारी परतणार!

mansoon
, सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (08:05 IST)
देशातील बहुतेक भागांतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. राज्यासह देशात काही भागांत तापमान वाढले आहे. महाराष्ट्रात पुणे, मुंबईत उन्हाच्या झळा बसत आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून पूर्णपणे माघारी परतेल. भारतीय हवामान विभागानुसार उत्तर-पश्चिम भागात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
 
राज्यातूनही परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान वाढले आहे. आज काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. मात्र, पावसाचे वातावरण नाही. त्यामुळे परतीचा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता कमी आहे. काही ठिकाणी साधारण पाऊस पडू शकतो. त्यामुळे परतीचा पाऊस यंदा मराठवाड्यात निराशा करू शकतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि रबी हंगामाचा प्रश्न यंदा चांगलाच भेडसावणार आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. कारण मराठवाड्यात यंदा तुरळक ठिकाणीच चांगला पाऊस झाला. बहुतांश भागात ओढे-नाले वाहिलेच नाहीत. त्यामुळे मराठवाड्यातील ब-याच भागात दुष्काळाचे सावट कायम आहे.
 
दरम्यान, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेशातील उर्वरित भागांमधून नैऋत्य मान्सूनच्या माघारीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणाच्या काही भागातही मान्सून परतणार आहे. पुढील २-३ दिवसांत महाराष्ट्र आणि मध्य अरबी समुद्राच्या भागातून नैऋत्य मोसमी वारे माघारी फिरतील. देशात गेल्या २४ तासांत मेघालयमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मेघालयमधील सोहरा येथे २८ सेमी, शेला येथे २७ सेमी, पिनूरस्ला येथे १५ सेमी, अरुणाचल प्रदेशातील पक्के येथे ८ सेमी आणि ओडिशातील तिहिडी येथे ८ सेमी पाऊस झाला.
दुसरीकडे सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. येत्या २४ तासांत पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये पूरबाधित लोकांसाठी मदत कार्य सुरू आहे. सिक्कीममधील खराब हवामानामुळे सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिक्कीमध्ये पुरामुळे सुमारे ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक बेपत्ता आहेत.
 
ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस
जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, नवी दिल्ली, गुजरात या राज्यांमधून मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून माघार घेत आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे माघार घेऊ शकतो. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साखरेच्या दरात वाढ, सणासुदीत महागाई