Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकापाठोपाठ एक 7 खून, मृतदेहापाशी बिअरची बाटली ठेवणारा खुनी आणि एक गूढ

murder
, रविवार, 27 ऑगस्ट 2023 (14:16 IST)
दक्षिण मुंबईत एका पाठोपाठ एक 7 खून झाले. मृतदेहापाशी बिअरची बाटली ठेवून 'सीरिअल किलर' आपली ओळख निर्माण करतोय, असं बोललं जाऊ लागलं.
 
अखेर 'बिअर मॅन'ला मुंबई पोलिसांनी अटक केली. त्याने ते सातच नव्हे तर 45 खून केल्याचं नार्को चाचणीत कबूल केलं पण....
 
साठ आणि सत्तरच्या दशकातल्या 'ब्लॅक अँड व्हाइट' मुंबईला नवीन सहस्रकातल्या चकाचक मुंबईने कधीच मागे सारलं होतं. गँगवॉरचा जमानाही मागे सरत होता. त्याच वेळी नवीन सहस्रकाच्या पहिल्याच दशकात मुंबई पुन्हा हादरली. अगदी त्या साठच्या दशकातल्या रमण राघव नावाच्या सीरिअल किलरची आठवण व्हावी अशी दहशत दक्षिण मुंबईत पुन्हा पसरली.
 
ऑक्टोबर 2006 ते जानेवारी 2007 दरम्यान चर्चगेट ते मरीन लाइन्स भागात सात खून झाले. खून झालेल्या व्यक्ती तरुण आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा गरीब वस्तीत जगणाऱ्या होत्या आणि मृतदेहाची अवस्था त्यांच्यावर लैंगिक अत्याचारही झाले असल्याची शक्यता वर्तवणारी होती.
 
यातल्या काही घटनांमध्ये खून झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाशेजारी बिअरची रिकामी बाटली दिसली होती. याच एका कारणाने त्या वेळच्या माध्यमांनी या संशयित सीरिअल किलरला 'बिअर मॅन' असं नाव दिलं होतं.
 
एका मागोमाग एक मुंबईत भर वस्तीच्या ठिकाणी रात्री खून पडायला लागल्याने पोलीस यंत्रणेने कोम्बिंग ऑपरेशन सुरू केली, गुन्हेगाराला पकडण्यासाठी जंग जंग पछाडलं. अखेर आम्हाला संशयित सीरिअल किलर सापडल्याचं पोलिसांनी जाहीर केलं. या तथाकथित 'बिअर मॅन'ला पकडल्यानंतर त्याने अर्थातच लगेच गुन्ह्यांची कबुली दिली नाही. त्याची नार्को टेस्ट करण्यात आली. त्यात त्याने एक-दोन नव्हे तर 45 खून केले असावेत, असा पोलिसांना अंदाज आला.
 
कोर्टात केस उभी राहिली. पण एकाच खुनाचा आरोप सिद्ध होऊ शकला. त्यासाठी या बिअर मॅनला जन्मठेप सुनावण्यात आली. पण पुढे वरच्या कोर्टाने हा निकाल रद्द करून या तथाकथित बिअर मॅनला पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केलं.
 
आता मुंबईत त्या काळात झालेल्या खुन्यांमागचा खरा गुन्हेगार कोण, बिअर मॅन नेमका कोण होता, त्याचं पुढे काय झालं? या सगळ्या प्रश्नांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न....
2006 च्या ऑक्टोबर महिन्यात मरिन लाइन्स स्टेशनजवळच्या फूटओव्हर ब्रीजवर एक बेवारस मृतदेह सापडल्याची खबर पोलिसांना मिळाली. तिशीतल्या आसपासच्या त्या पुरुषाला अत्यंत निर्दयपणे भोसकलं होतं. अमानुष मारहाण झाल्याचं उघड होतं.
 
अर्धनग्न अवस्थेतला तो मृतदेह पाहता अत्यंत क्रूरपणे त्याला संपवल्याचं दिसत होतं. लैंगिक अत्याचाराची शक्यताही वर्तवण्यात येत होती. पोलिसांच्या तपासात मृत व्यक्ती टॅक्सी ड्रायव्हर असल्याचं समोर आलं.
 
पण हा एकमेव खून नव्हता. पुढच्या दीड महिन्याच्या आणखी एक मारहाण झालेला मृतदेह पुन्हा चर्चगेटच्या जवळच सापडला. मरीन लाइन्स ते चर्चगेट या दोन स्टेशन्सच्या दरम्यानच्या दक्षिण मुंबईच्या परिसरात तीन महिन्यात सात मृतदेह सापडले आणि एकाही घटनेत गुन्हेगाराचा पत्ता लागला नाही की उद्देश समजला नाही.
 
तेव्हा कुणी विकृत सीरिअल किलर मुंबईच्या रस्त्यांवर फिरत असल्याच्या वार्ता सुरू झाल्या. काही घटनांमध्ये मृतदेहाशेजारी सापडलेल्या बिअर कॅनमुळे माध्यमांनी या सीरिअल किलरला ‘बिअर मॅन’ असं नाव देऊन टाकलं.
पोलिसांनी परिसरातले सराईत गुन्हेगार, गर्दुल्ले यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केलीच होती. त्यातलाच एक होता रवींद्र कंट्रोल.
 
पस्तिशीतला हा इसम पोलीस रेकॉर्डवर सराईत गुन्हेगार होता. दशरथ माने गँगसाठी तो काम करायचा. पण नंतर त्याने गुन्हेगारी सोडून वडापावची गाडी टाकली होती आणि पोलिसांसाठी खबऱ्याचं कामही त्यानं काही दिवस केलं होतं.
 
पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला कारण त्याला गुन्ह्याच्या ठिकाणी पाहिल्याचं सांगणारा एक साक्षीदार सापडला होता. शिवाय पोलिसांना रवींद्र कंट्रोलच्या हालचाली संशायस्पद वाटल्या.
 
डोक्यावर जाळीची टोपी घातलेल्या आणि दाढी वाढवलेल्या रवींद्रने नुकतंच धर्मांतर करपून अब्दुल रहीम असं नाव घेतलं होतं.
 
पोलिसांनी त्याची आपला खाक्या दाखवत चौकशी केली तेव्हा त्यांचा संशय बळावला. आरोपीची नार्को टेस्ट घेण्याची परवानगी त्यांनी कोर्टाकडे मागितली.
 
नार्को टेस्टमध्ये दिली 45 गुन्ह्यांची कबुली
कोर्टाच्या परवानगीनंतर पोलिसांनी आरोपी रवींद्र कंट्रोलची नार्टो टेस्ट केली. पण ही चाचणी पुरावा म्हणून ग्राह्य धरणार नसल्याचं कोर्टाने बजावलं होतं. आरोपीचं ब्रेन मॅपिंगही केलं गेलं. त्या वेळी या संशयिताने ते सात खूनच नव्हे तर आणखी बरेच खून केल्याचं समोर आलं.
 
हाच तो ‘बिअर मॅन’ म्हणून त्या वेळच्या माध्यमांनी बातम्या द्यायला सुरुवातही केली. ‘बिअर मॅन’च्या एकाहून एक सुरस कथा प्रसिद्ध व्हायला लागल्या. त्याने खून का केले याच्या वेगवेगळ्या थिअरी माध्यमांतून येऊ लागल्या. तो मनोरुग्ण आहे, तो समलैंगिक आहे इथपासून त्याला समलैंगिकांविषयी प्रचंड घृणा आहे म्हणून त्याने त्यांचे खून केले इथपर्यंत अनेक गोष्टी बिअर मॅनच्या नावावर छापून आल्या. पण यातल्या कशालाही ठोस आधार नव्हता.
 
या प्रकरणाची चौकशी सुरू होती त्या वेळी विविध माध्यमातून अनेक गोष्टी पुढे येत राहिल्या.
 
हा ‘बिअर मॅन’ ज्याचा खून करतो त्याला आधी भरपूर दारू पाजत असे. म्हणूनच ती बिअरची बाटली जवळ असे.
 
त्याने 40 वर खून करून बरेच मृतदेह समुद्रात फेकून दिले. त्यांचं रक्त तो जवळच्या स्मशानातल्या एका मांत्रिकाला नेऊन देत असे अशा अनेक कपोलकल्पित किंवा ऐकीव कहाण्या त्या वेळी चर्चेत होत्या.
 
पोलिसांकडे ‘बिअर मॅन’विरुद्ध आणि तोच सीरिअल किलर आहे हे सांगणारा त्याच्या नार्को टेस्ट व्यतिरिक्त कुठलाही सबळ पुरावा नव्हता. यथावकाश कोर्टात केस उभी करण्यात आली. अर्थातच कोर्टात जेमतेम तीन खुनांची केस रवींद्रविरोधात उभी राहू शकली. सत्र न्यायालयाने त्यातल्या दोन खुनांच्या गुन्ह्यातून रवींद्रची मुक्तता केली. एका खुनाचा आरोप सिद्ध होऊ शकला. त्याबद्दल त्याला जन्मठेप सुनावण्यात आली.
 
पुन्हा ‘बिअर मॅन’ला जन्मठेप झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण सप्टेंबर 2009 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करत रवींद्र कंट्रोल उर्फ अब्दुल रहीमची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.
 
कुठे आहे ‘बिअर मॅन’?
‘बिअर मॅन’ म्हणून ओळखला जाऊ लागलेला पण एकही गुन्हा सिद्ध होऊ न शकलेला तो आरोपी नंतर मुंबईतच राहू लागला. त्याच्या निर्दोष मुक्ततेनंतर पुढे तो कसं आयुष्य जगतोय याविषयी फार माहिती समोर आली नाही. जुलै 2012 मध्ये ओपन मॅगझीनचा एक पत्रकार रवींद्र कंट्रोलला भेटायला, त्याच्याशी बोलायला गेला. त्याचं सविस्तर वृत्त या मासिकाने प्रसिद्ध केलं.
 
रवींद्र कंट्रोल उर्फ अब्दुल रहीम हा मुंबईच्या रस्त्यावरचा माणूस. धोबी तलाव परिसरात त्याचे आई-वडील अनधिकृत झोपड्यांमध्ये राहायचे आणि धोबी म्हणून काम करायचे. वडील अट्टल जुगारी. त्यांचं अनधिकृत घर कारवाईत गेलं त्यानंतर रवींद्रची रवानगी पुण्याला झाली. तिथे त्याच्या आईकडचे नातेवाईक होते. पण कुमारवयातच तो तिथून पळून पुन्हा मुंबईत आला आणि मिळेल ती कामं करत रस्त्यावर राहू लागला.
 
पुढे दशरथ राणेच्या गँगमध्ये सामील झाला. खंडणी गोळा करणे, घर खाली करून देणे असली कामं तो करीत असे. अनेक वेळा आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये तो जाऊन आला, पण ‘बिअर मॅन’ म्हणून अटक होण्यापूर्वी कुठलाही मोठा गुन्हा त्याच्या नावावर नव्हता.
 
गुंडगिरी करून उरलेला फावला वेळ तो वेश्यावस्तीत घालवत असे. तिथेच तो एका सेक्सवर्करच्या प्रेमात पडला. तिथल्या वस्तीतल्या प्रथेप्रमाणे काही हजार रुपये देऊन तिची सुटका केली आणि तिच्याबरोबर संसारही थाटला. गँगचं काम सोडून दिलं आणि चक्क वडापावची गाडी टाकली. सीरिअल किलर-बिअर मॅन म्हणून अटक झाल्यानंतर मात्र त्याचं आयुष्य पालटलं.
 
त्याने त्याची बायको आणि लहान मुलगी यांना बायकोच्या गावी मध्य प्रदेशात पाठवून दिलं. कुठलाही गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही तरी आपल्याला पोलिसांनी खूप छळल्याचं रवींद्रने ओपन मॅगझीनला सांगितलं. निर्दोष म्हणून सुटल्यानंतरही मुंबईत जगणं अवघड असल्याचं त्यानं सांगितलं.
 
ओपन मॅगझीननुसार, रवींद्र कंट्रोल अब्दुल रहीम म्हणूनच जगतो आहे. मुंबईच्या धोबी तलाव परिसरात काही मोठा गुन्हा झाला की, पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात तो पहिला येत असे. त्याने नंतर सँडविच विकायचा स्टॉल थाटला आणि आपलं स्वतःचं रेस्टॉरंट उघडायचं स्वप्न तो पाहात होता.
 
त्याच्या या स्वप्नाचं काय झालं, त्याची बायको-मुलगी परत आली का या प्रश्नांचा सुगावा लागणं आता अवघड आहे.
 
पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं - त्याने खरंच एवढे खून केले होते का? जर हा तथाकथित ‘बिअर मॅन’ सीरिअल किलर नव्हता तर मग मुंबईत झालेल्या त्या खुनांमागे कुणाचा हात होता? खरा सीरिअल किलर कोण? हे गूढ अद्याप उलगडलेलं नाही.
 






Published By- Priya Dixit
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mumbai :राज्यात डेंगी,चिकनगुनिया, मलेरियाचे आजार पसरले