Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संपूर्ण भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी, रविवारी प्रत्येक जिल्ह्यात नोटिशीची होळी करणार --- चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

संपूर्ण भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी, रविवारी प्रत्येक जिल्ह्यात नोटिशीची होळी करणार --- चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा
, शनिवार, 12 मार्च 2022 (21:32 IST)
विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी मा. देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली याचा आपण तीव्र निषेध करतो. या प्रकरणात संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी असून उद्या रविवारी प्रत्येक जिल्ह्यात भाजपाचे कार्यकर्ते नोटिशीची होळी करून निषेध नोंदवतील, असे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांना सांगितले.
 
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, आघाडी सरकारच्या मंत्र्यांची भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर पडत आहेत. एका मागोमाग एक मंत्री तुरुंगात जात आहेत. त्यांचा पापाचा घडा भरत आहे. यामुळे आघाडीचे नेते घाबरून गेले आहेत. परिणामी त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना अडविण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. महाविकास आघाडीची वाटचाल विनाशाकडे होत आहे.
 
त्यांनी सांगितले की, मा. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्षनेत्याला माहिती मिळविण्याचा विशेषाधिकार असतो. त्यांना माहिती कोठून मिळाली असे विचारता येत नाही. तरीही या सरकारने बेकायदेशीर रितीने त्यांना नोटीस पाठवली. हे सरकार वारंवार कायदा धाब्यावर बसवून काम करत आहे. परिणामी त्यांना अनेकदा न्यायालयाकडून थपडा खाव्या लागल्या आहेत. अनिल देशमुख, सचिन वाझे, भाजपाच्या बारा आमदारांचे निलंबन अशा अनेक प्रकरणात या सरकारला न्यायालयाचे फटके बसले आहेत.
 
ते म्हणाले की, बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर त्याची तपशीलवार माहिती असलेला पेन ड्राईव्ह मा. देवेंद्र फडणवीस यांनी त्याच दिवशी केंद्रीय गृहसचिवांकडे तपासासाठी सादर केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. अशा रितीने मा. देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून हा तपास रोखता येणार नाही. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND w vs WI w:मिताली राजने आणखी एक विश्वविक्रम केला, विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकणारी खेळाडू बनली