Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नांदेड : मृतांचा आकडा 32 वर, या मृत्यूंना जबाबदार कोण?

nanded govt hospita
, मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (12:10 IST)
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या48 तासांत म्हणजे 1 ऑक्टोबरपासून 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
या मृत्यूंमध्ये 12 नवजात बालकांचा यात समावेश आहे.
 
12 बालकांशिवाय इतर मृत्यू हे साप चावून आणि विषबाधेमुळे झाले आहेत, असं रुग्णालयाचे अधिष्ठाता एस आर वाकोडे यांनी सांगितलं आहे.
 
वेळेवर औषधे पुरवठा झाला नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप केला जात आहे. पण वाकोडे यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
 
औषधांचा तुटवडा आहे. पण जे रुग्ण अत्यावस्थेत आहेत. त्यांच्यासाठी औषधे बऱ्यापैकी उपलब्ध असल्याचं वाकोडेंनी सांगितलं.
 
हाफकीन संस्थेनं औषध खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचं सांगितलं जातंय.
 
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय तृतीय स्तरावरील रुग्णालय आहे. त्याठिकाणी जवळपास 70-80 किमी परीघातील रुग्ण येत असतात.
 
इतकं मोठं रुग्णालय या भागात कुठंही नसल्याने अत्यावस्थेतील रुग्ण इथे येतात.
 
गेल्या 24 तासांत मृत्यू झालेले सर्व रुग्ण अत्यावस्थेत आले होते, असा रुग्णालयाचा दावा आहे.
 
याशिवाय या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने काही प्रमाणात अडचण निर्माण झालीय, असंही वाकोडे यांनी सांगितलं.
 
मधल्या काळात हाफकिन संस्थेकडून औषध खरेदी झाली नाही. त्यामुळे काही प्रमाणात औषधांचा तुटवडा आहे. त्यासोबत रुग्णसंख्या जास्त प्रमाणात वाढल्याने बजेट कमी पडत आहे, असं रुग्णालयाने सांगितलं.
 
विरोधकांकडून चौकशीची मागणी
नांदेडच्या घटनेनंतर विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
 
"या प्रत्येक मृत्यूची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. एका दिवसात एवढे मृत्यू होत असतील तर त्याचे गांभीर्य मुख्यमंत्री आणि यंत्रणेनं लक्षात घेऊन तात्काळ चौकशीचे आदेश देणे अपेक्षित आहे," असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
 
ठाण्याच्या घटनेच्या वेळी दाखविलेला बेदरकारपणा आणि बेफिकीरी यावेळी देखील दिसतेय. लपवाछपवी सुरु असून एकमेकांच्या चुकांवर पांघरूण घालण्याचे उद्योग सुरू आहेत. रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना वेळेवर औषधे मिळाली नसल्याचा आरोप होत आहे. याचा अर्थ, महाराष्ट्रातील जनतेचे जीव एवढे स्वस्त झाले आहेत का? असा सवालही त्यांनी केला.
 
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनीही या घटनेबाबद दु:ख व्यक्त करत, घटनेच्या चौकशीची मागणी केली.
 
'सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी आहे'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, "नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या 24 तासात 24 मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे 'औषध पुरवून वापरा' असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत."
 
तसंच, राज ठाकरे पुढे म्हणाले की, "तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय?"
 
"दुर्दैव असं की, सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे, अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं,"
 
रुग्णालयाकडून स्पष्टीकरण
दरम्यान, या घटनेवर नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.
 
रुग्णालयाच्या पत्रकानुसार, '30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील बहुतांश रुग्ण हे अत्यंत गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयातून दाखल झाले होते.'
 
'रुग्णालयात अत्यावश्यक औषधांसाठीचा साठा उपलब्ध आहे. जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक वर्षासाठी 12 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. आणखी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसात अंतिम अवस्थेतील रुग्ण जिल्ह्यातून आणि बाहेरून जास्त प्रमाणात आले आहेत. त्यामुळे मृत्यूचं प्रमाण जास्त आहे असं रुग्णालयाचं म्हणणं आहे.'
 
'या संपूर्ण परिस्थितीवर डॉक्टर व स्टाफ लक्ष ठेवून आहेत आणि दाखल झालेल्या रुग्णांवर औषधोपचार केले जात आहेत,' असंही रुग्णालयाने पत्रकाद्वारे सांगितलं आहे.
 
रुग्णालयात डॉक्टर कमी, मशीन्स बंद - चव्हाण
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी या रुग्णालयाला भेट दिली. त्यांनीही रुग्णांना तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे.
 
चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना रुग्णालयाची सद्यस्थिती सांगितली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार -
 
या रुग्णालयात आणखी 70 लोकांची प्रकृती गंभीर आहे.
रुग्णालयातील नर्स स्टाफची बदली झालीय. त्यांच्या जागा भरल्या नाहीत
डॉक्टर्सही कमी आहेत.
रुग्णालयातील मशीन बंद पडल्या आहेत.
रुग्णालयाला पुरेसं बजेट मिळालं नाही.
रुग्णालयात क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्ण आहेत. ( क्षमता 500 रुग्णांची, भरती 1200 रुग्णांची)
या घटनेची चौकशी करू - मुश्रीफ
नांदेडच्या डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याबद्दल राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, "खासगी रुग्णालयातील बील भरता येत नसल्यानं रुग्ण दुरून या रुग्णालयात येतात. मी तातडीनं हॉस्पिटलला भेट देणार आहे. मला सांगण्यात आलं आहे की औषध किंवा डॉक्टरांची कमतरता नाही. पण तरीही, अशी घटना घडली आहे. मी घटनेचा आढावा घेईन आणि यामागील कारणाचा शोध घेईन. या घटनेच्या चौकशीसाठी आम्ही एक समिती स्थापन केली आहे.
 
दीड महिन्यांपूर्वी ठाण्यात एका रात्रीत 18 मृत्यूचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर नांदेडमध्ये ही घटना घडली आहे.
 
ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांना तपसण्यासाठी डॉक्टर वेळेवर येत नसून रुग्णांना औषधं दिली जात नसल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Khandwa News: बाईकवरून नेला लेकाचा मृतदेह