Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महामेट्रोच्या स्टॉलला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

महामेट्रोच्या स्टॉलला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
पिंपरी , मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017 (09:17 IST)
भविष्याच्या दृष्टीने वाहतूक सेवेचे अद्ययावतीकरण, रहदारीच्या समस्या सोडविणे आणि पर्यावरण सुरक्षेत होणारी प्रगती यांसारख्या अनेकविध पैलूंचे प्रदर्शन 10 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स व एक्‍स्पोमध्ये पाहायला मिळत आहे. नुकतीच हैद्राबाद शहरात या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. सदर प्रदर्शनामध्ये महामेट्रोच्या स्टॉलचे कौतुक झाले असून या स्टॉलला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.
 
शहरी भागातील मेट्रो प्रकल्पांबरोबरच त्यांच्याशी निगडीत इतर अनेक गोष्टींबद्दल माहिती देणा-या 10 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरेन्स व एक्‍स्पो आणि 17 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्सचे उद्‌घाटन यावेळी उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये महामेट्रोचा स्टॉल या प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र ठरला. भारत सरकारच्या गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सचिव दुर्गा शंकर मिश्रा, तेलंगणा सरकारचे मुख्य सचिव एस. पी. सिंग, सीओडीएटीयुचे अध्यक्ष डॉमनिक बुसेरू, फ्रांसचे भारतातील राजदूत एम. अलेक्‍झांडर जिग्लर, केंद्र सरकारच्या गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे मंत्री हरदीपसिंग पुरी, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आदी यावेळी उपस्थित होते.
 
महामेट्रोतर्फे उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये मो बाईक, इलेक्‍ट्रिक वाहने यांबरोबर मेट्रो प्रकल्पादरम्यान पुरविण्यात येणा-या फीडर सर्व्हिसेस यांसारख्या प्रवासी सेवांची माहिती पुरविण्यात आली आहे. याशिवाय मेट्रो स्टेशन्स, नागरिकांशी साधण्यात येणारा संवाद, सोशल मिडीयाद्वारे होत असलेली जनजागृती, हरित उपकक्रम यांसारख्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवीन विकासाचे वैशिष्ट्‌य, नवीन कल्पनांचा प्रसार करणे, शहरी वाहतूक क्षेत्राच्या व्याप्तीचा शोध घेऊन नवनवीन पर्याय आणि त्याची कार्यप्रणाली सादर करणे आणि यातून परावर्तित होणाऱ्या सर्वोत्तम वाहतूक पर्यायाची अंमलबजावणी करणे असा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हेलिकॉप्टर अपघातात सौदीच्या राजपुत्राचा मृत्यू