Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pithori Amavasya 2023 Katha पिठोरी अमावस्या कथा

pithori amavasya story in marathi
, गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (11:18 IST)
आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई ? ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असे सहा वर्षे झाले. सातव्या वर्षीही तसंच झालं, तेव्हा सासरा रागावला. ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले. तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचे कारण काय ? आलीस तशी लौकर जा. नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील !
 
तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथे आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जिवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजेसास-याचे श्राद्ध असे. माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी सहा बाळंतपणं माझी झाली. सातव्या खेपेलासुध्दा असंच झालं. तेव्हा मामंजीं माझा राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं सात वर्षे उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो ! असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथे आले. आता जगून तरी काय करायचे आहे ? असं म्हणून रडू लागली.
 
तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तू भिऊ नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढं जा. तिथ तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, साती अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहतील. कोण, कोठची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ! ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तो एक बेलाचे झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वार्‍यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे? म्हणून विचारलं.
 
त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कोठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या- देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांना तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढे तिला हे व्रत सांगितलं. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिने विचारलं, ह्याने काय होतं ? अप्सरांनी सांगितलं. हे व्रत केले म्हणजे मुलबाळं दगावत नाहीत, सुखासमाधानांत राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली.
 
ती आपल्या गावांत आली. लोकांनी हिला पाहिलं, ब्राह्मणाला जाऊन सांगितले. भटजी भटजी, तुमची सून घरीं येते आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्ध घटकेनं पाहू लागला, तो मुलबाळं दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला, मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुऊन घरांत आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुला-बाळांसहित सुखाने ती नांदू लागली. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pola festival 2023 सण साजरा करतो, बैल-पोळा, महत्व देतो बैलांना