Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमेरिकेने गाझामध्ये 'एअरड्रॉप' केलेल्या मदतीवर का टीका होतेय?

अमेरिकेने गाझामध्ये 'एअरड्रॉप' केलेल्या मदतीवर का टीका होतेय?
, शुक्रवार, 8 मार्च 2024 (16:02 IST)
अमेरिकेने प्रथमच विमानांच्या (एअरड्रॉप) सहाय्याने गाझामध्ये मदत सामग्री पाठवली आहे.
अमेरिकेच्या तीन लष्करी विमानांनी पॅराशूटच्या सहाय्याने अन्नाची 30,000 हून अधिक पाकिटं गाझामध्ये टाकली आहेत. मानवाधिकार संघटनांच्या टीकेनंतर अमेरिकेने हे पाऊल उचललंय.
 
अमेरिकेने ही मोहीम जॉर्डनच्या हवाई दलाच्या सहकार्याने पार पाडली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी गाझासाठी अनेक घोषणा केल्या होत्या. त्यातील पहिली घोषणा त्यांनी पूर्ण केली आहे. गेल्या गुरुवारी गाझामध्ये मदत सामग्रीसाठी मिळवण्यासाठी जमलेल्या गर्दीत सुमारे 112 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेने ही मदत पाठवली आहे.
 
इस्रायली लष्कराच्या म्हणण्याप्रमाणे, या घटनेत मारले गेलेले बहुतांश पॅलेस्टिनी चेंगराचेंगरीचे बळी ठरलेत. पण गाझा मधील हमास संचालित आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रुग्णालयात आणलेल्या मृतांना गोळ्या लागल्या आहेत. या घटनेची चौकशी करत असल्याचं इस्रायलचे म्हणणं आहे.
 
गाझामध्ये सहा आठवड्यांच्या युद्धविरामाची रूपरेषा तयार करण्यात आल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानंतर अमेरिकेने विमानातून मदत सामग्री सोडली.
 
किती मदत पाठवण्यात आली ?
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने एका निवेदनात म्हटलंय की, "अमेरिकेच्या यूएस सी-130 विमानांनी जॉर्डनच्या हवाई दलासोबत गाझाच्या नैऋत्य समुद्रकिनाऱ्यावर अंदाजे 38,000 खाद्यपदार्थांची पाकीटं सोडली."
 
वृत्तसंस्था एपीने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटलंय की, एका सीलबंद पाकिटात एका दिवसाच्या अन्नाएवढ्या कॅलरीज आहेत.
 
यापूर्वी ब्रिटन, फ्रान्स, इजिप्त आणि जॉर्डनसह इतर अनेक देशांनीही गाझामध्ये एअरड्रॉपच्या सहाय्याने मदत सामग्री पाठवली होती. मात्र अमेरिकेने अशी मदत करण्याची पहिलीच वेळ आहे.
 
यावेळी राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की, सागरी मार्ग पुन्हा सुरू व्हावा आणि जमिनीद्वारे मदत पुरवठा वाढविता यावा यासाठी अमेरिका आपले प्रयत्न दुप्पट करेल.
 
गाझाला पाठवली जाणारी मदत सामान्यतः इस्रायल आणि इजिप्तच्या नियंत्रणाखाली असलेल्या मार्गाने पाठवली जाते. यातील बहुतांश रस्ते युद्धकाळात बंद करण्यात आलेत. त्यामुळे ट्रकद्वारे पाठवलं जाणारं मदत साहित्य अत्यंत मर्यादित प्रमाणात पाठवलं जातं.
 
संयुक्त राष्ट्रांचं म्हणणं आहे की, गाझाच्या 23 लाख लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक उपासमारीचे बळी ठरलेत.
 
एवढी मदत पुरेशी आहे का?
बीबीसी अरेबिकने गाझामध्ये गाझा लाईफलाइन नावाची आपत्कालीन रेडिओ सेवा सुरू केली आहे. गाझा येथील रहिवासी इस्माईल मोकबेल यांनी या रेडिओ सेवेशी बोलताना सांगितलं की, विमानातून पडलेल्या पाकिटात बीन्स आणि महिलांच्या आरोग्याशी संबंधित काही महत्त्वाच्या वस्तू होत्या.
 
अबू युसूफ उत्तर गाझा येथील अल शिफा हॉस्पिटलजवळ उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की, अचानक आम्हाला मदतीचे पॅराशूट आकाशात दिसले. आम्ही होतो त्या ठिकाणापासून सुमारे 500 मीटर अंतरावर ही पाकीटं पडली. तिथे बरेच लोक उपस्थित होते. पण मदत साहित्य कमी असल्याने आम्हाला काहीही मिळालं नाही.
 
मोकबेल यांनी सांगितलं की, नागरिकांची संख्या पाहता मदत साहित्य पुरेसं नव्हतं. नागरिकांना अनेक प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे.
 
ते म्हणाले की, "हजारो लोकांनी मदत साहित्य आकाशातून पडताना पाहिलं. या भागातून मदत मिळते म्हणून शेकडोंच्या संख्येत लोक या भागात थांबलेले असतात. पण यातल्या 10-20 लोकांनाच वस्तू मिळतात. अर्धे लोक रिकाम्या हाताने परततात. दुर्दैवाने, ही एअरड्रॉप पद्धत गाझाच्या उत्तरेकडील जिल्ह्यांना मदत पोहोचवण्याचा सर्वात अयोग्य मार्ग आहे."
 
त्यांनी पुढे सांगितलं की, "गाझाला मदत पोहोचवण्यासाठी रस्ते आणि जलमार्ग आवश्यक आहेत. अशा पद्धतीने सर्व नागरिकांच्या गरजा पूर्ण होत नाहीयेत."
 
एअरड्रॉप : एक महागडी पद्धत
दुसऱ्या महायुद्धात सैन्याला मदत पोहोचवण्यासाठी ही पद्धत वापरली गेली. 1973 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी पहिल्यांदा याचा वापर केला. तेव्हापासून एअरड्रॉप ही मदतीसाठी एक उपयुक्त पद्धत बनली आहे.
 
वर्ल्ड फूड प्रोग्राम (डब्लूएफपी) च्या 2021 च्या अहवालात एअरड्रॉप हा शेवटचा उपाय म्हटलंय. जेव्हा सर्व प्रभावी पर्याय अयशस्वी होतात तेव्हा ही पद्धत अमलात आणली जाते. या पद्धतीचा शेवटचा वापर दक्षिण सुदानमध्ये करण्यात आला होता.
 
नॉर्वेजियन रिफ्युजी कौन्सिलचे प्रमुख जॅन एगेलँड नुकतेच तीन दिवसांच्या गाझा दौऱ्यावरून परतले आहेत. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "एअरड्रॉप महागडी पद्धत आहे. शिवाय यामुळे मदत नको त्या लोकांकडेच पोहोचते."
 
डब्लूएफपीचं म्हणणं आहे की, विमान, इंधन आणि कर्मचारी यांच्याशी संबंधित खर्चामुळे एअरड्रॉप जमिनीवरील मदतीपेक्षा सात पटीने महाग आहे.
 
ट्रकच्या ताफ्याद्वारे वितरित केल्या जाणाऱ्या मदती या मोठ्या असतात. त्या तुलनेत विमानातून वितरीत केली जाणारी मदत कमी प्रमाणात असते. याशिवाय ज्या ठिकाणी मदत वितरीत करायची आहे तिथे जमिनीवरही समन्वय ठेवणं आवश्यक आहे.
 
रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीने 2016 च्या अहवालात म्हटलं होतं की, अयोग्य किंवा असुरक्षित वस्तूंचा वापर करून लोकांना त्यांचे जीवन धोक्यात घालण्यापासून रोखण्यासाठी मदत वितरणावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे.
 
सीरियामध्ये गृहयुद्ध सुरू असताना एअरड्रॉपच्या सहाय्याने मदत पुरवली जात होती. त्याच दरम्यान हा अहवाल प्रकाशित करण्यात आला होता.
 
डब्ल्यूएफपीने म्हटलं होतं की, युद्ध क्षेत्रात 300 ते 5,600 मीटर उंचीवरून एअरड्रॉपच्या सहाय्याने मदत पुरवली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, मदत जमिनीवर पडल्यानंतरही सुरक्षित राहते याची खात्री करण्यासाठी मजबूत पॅकिंग आवश्यक आहे.
 
सोबतच ड्रॉप झोन मोठ्या आणि खुल्या भागात असावेत आणि फुटबॉल मैदानापेक्षा लहान नसावेत. त्यामुळेच गाझा किनारी भागात अनेकदा मदत साहित्य सोडलं जातं. काही स्थानिक लोक सांगतात की, काहीवेळा मदत साहित्य समुद्रात पडून इस्रायलच्या दिशेने वाहून जातं.
 
'कोणत्याही परिस्थितीत अन्न पुरवठा केला पाहिजे'
गाझा मधील रहिवासी समीर अबो सभा यांनी बीबीसी अरेबिकच्या गाझा लाइफलाइन रेडिओशी बोलताना सांगितलं की, अमेरिकेने आणखीन बरंच काही केलं पाहिजे आणि युद्धविरामासाठी इस्रायलवर दबाव आणला पाहिजे.
 
ते म्हणाले, "गाझाचा नागरिक या नात्याने त्यांच्यासाठी या मदतीचा काही उपयोग नाही. अमेरिकेने युद्धविरामासाठी इस्रायलवर दबाव आणावा आणि इस्रायलला शस्त्रे, क्षेपणास्त्रे पुरवणे बंद करावे, अशी आमची इच्छा आहे."
 
काही मानवतावादी संघटनांनीही असंच म्हटलं आहे.
 
ऑक्सफॅम इंटरनॅशनलचे स्कॉट पॉल यांनी गेल्या आठवड्यात बायडन प्रशासनाच्या पुढाकारावर टीका करत म्हटलंय की, एअरड्रॉप्स मुख्यतः वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करतील. कारण यांची धोरणंच अत्याचार आणि उपासमारीसाठी योगदान देत आहेत.
 
पॅलेस्टाईनमधील मानवतावादी संकट वाढत असताना, इतर काही लोक म्हणतात की, त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत अन्न पुरवठा केला पाहिजे.
 
वर्ल्ड सेंट्रल किचनचे शेफ आणि संस्थापक जोस अँड्रेस यांनी अमेरिकन ब्रॉडकास्टर एबीसीला सांगितलं की, "आपल्याला कोणत्याही परिस्थितीत गाझामध्ये अन्न पाठवण्याची गरज आहे. आपल्याला ते समुद्रमार्गेही नेता येऊ शकतं... यासाठी गाझासमोर बोटी उभ्या केल्या पाहिजेत."
 
जोस अँड्रेस गाझाला अन्न पुरवठा पुरवत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांना या वर्षाच्या सुरुवातीला शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केलं आहे.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाची वडिलांकडून हत्या