Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रमजानच्या महिन्यात इस्रायलमध्ये कोणती शक्यता व्यक्त केली जात आहे?

रमजानच्या महिन्यात इस्रायलमध्ये कोणती शक्यता व्यक्त केली जात आहे?
, मंगळवार, 12 मार्च 2024 (17:31 IST)
इस्लामिक दिनदर्शिकेनुसार, मध्यपूर्वेत पवित्र रमजानचा महिना सुरू झाला आहे. या काळात पॅलेस्टाईनमध्ये, विशेषतः जेरुसलेममध्ये हिंसाचार वाढण्याची शक्यता आहे. नेमकी युद्धबंदी कधी होणार याबाबत स्पष्टता नाहीये. हमासने पॅलेस्टिनींना अल-अक्सा मशिदीला भेट देण्याचं आवाहन केलंय. तेच रमजानच्या काळात या भागात संघर्ष निर्माण करण्यासाठी हमास प्रयत्न करत असल्याचे आरोप इस्रायलने केले आहेत. जेरुसलेम हे इस्लामसाठी तिसरं सर्वात पवित्र स्थान आहे. सोबतच यहुदी धर्मातील लोकांसाठी देखील हे पवित्र स्थान आहे. याला 'टेंपल माउंट' नावाने सुद्धा ओळखलं जातं. इस्रायल-पॅलेस्टाईन मध्ये वादाचं हे देखील एक कारण आहे.
 
अल-अक्सा मशीद परिसर
मी या आठवड्यात जेरुसलेमचा प्रवास केला. यावेळी या परिसरात शांतता होती, कारण पॅलेस्टिनी यात्रेकरू युद्धात अडकले आहेत. आयत नावाच्या महिलेच्या चेहऱ्यावर याचं दुःख दिसत होतं. त्या सांगत होत्या की, "लोक रमजानच्या नियमित परंपरा पाळण्याच्या आणि हा आनंद साजरा करण्याच्या मनस्थितीत नाहीत. यंदा गाझामध्ये जे काही घडतंय ते पाहता यावेळचा रमजानचा सण नेहमीसारखा साजरा होणार नाही." रमजानच्या सुरुवातीपासून 40 दिवसांचा युद्धविराम लागू होण्याची अपेक्षा आहे. इस्रायलने शनिवारी सांगितलं की, डझनभर ओलिसांना मुक्त करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील यासाठी त्यांच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी अमेरिकन समकक्ष अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यानंतर, इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय की, हमास आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यांना कोणत्याही सामंजस्य करारात रस नसल्याचं दिसतंय. संयुक्त राष्ट्रांनी गाझामध्ये दुष्काळ पडण्याचा इशारा दिलाय. दरम्यान, एका योजनेच्या रुपरेषेवर चर्चा सुरू आहे. यामध्ये ऑक्टोबर 2016 च्या हल्ल्यात हमासने ज्या इस्रायली बंधकांना पकडलं होतं त्यांना पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात सोडण्यात येणार आहे. आणि सोबतच मानवतावादी मदतीतही वाढ करण्यात येणार आहे. अबू नादेर नावाच्या एका दुचाकीस्वाराने सांगितलं की, "यावेळचा रमजान खूप अवघड आहे. गाझामधील आमच्या बांधवांचा विचार करताना आम्ही आमचे रोजे कसे सोडणार समजत नाही." ते म्हणाले की, "लवकरच चांगले दिवस यावेत यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय."
 
पॅलेस्टिनी संघर्षाचे प्रतीक
अल-अक्सा मशिदीच्या प्रचंड परिसराभोवती इस्रायली पोलीस नेहमीच तैनात असतात. प्रत्येक प्रवेशद्वारावर अधिकारी हजर असतात. हे अधिकारी इथे येणाऱ्या लोकांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवतात. इस्रायलने 1967 च्या मध्यपूर्व युद्धात जॉर्डनकडून जेरुसलेम ताब्यात घेतलं. हे ठिकाण पॅलेस्टिनी संघर्षाचं प्रमुख प्रतीक बनलं आहे. 2000 मध्ये इस्रायलचे तत्कालीन विरोधी पक्षनेते एरियल शेरॉन यांनी या पवित्र ठिकाणी भेट दिली होती. त्यांनी दिलेल्या भेटीमुळे दुसऱ्या पॅलेस्टिनी उठावाला उत्तेजन मिळाल्याचं म्हटलं गेलं. पॅलेस्टिनी याला 'अल-अक्सा इंतिफादा' म्हणतात. विशेषतः रमजानच्या काळात इस्रायली सुरक्षा दल आणि पॅलेस्टिनी भाविक यांच्यात वारंवार चकमकी होत असतात. इस्रायली कट्टरपंथी या शहरातून मोर्चे काढतात आणि अत्यंत संवेदनशील धार्मिक स्थितीच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी करतात. ज्यामुळे इथे तणाव वाढतो. इथल्या नियमानुसार इस्त्रायली तिथे जाऊ शकतात, पण पूजा करू शकत नाहीत. मे 2021 मध्ये जेरुसलेममधील तणाव वाढून अल-अक्सा येथे हिंसाचाराचा भडका उडाला. यानंतर हमासने जेरुसलेमवर क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे गाझामध्ये एक छोटं युद्ध भडकलं आणि ज्यू - अरब इस्रायलमध्ये तणाव पसरला. गेल्या वर्षी रमजान आणि ज्यू लोकांचा सण एकाच वेळेस आला. यानंतर ज्यू अतिरेक्यांनी टेंपल माऊंटवर बकऱ्याचा बळी देण्याची योजना आखल्याची बातमी पसरली. बकऱ्याची कुर्बानी थांबवण्यासाठी इस्रायली पोलीस काहीतरी करतील असं मुस्लिमांना वाटलं नाही. आणि अल-अक्सामध्ये शेकडो मुस्लिम जमा झाले. त्यांच्या विरोधात स्टन ग्रेनेडचा वापर करण्यात आला. गाझा मध्ये सुरू असलेल्या घटनांचा प्रभाव पडणा यावर्षी रमजानच्या काळात कोणताही ज्यू सण नाहीये. अशा परिस्थितीत रमजानच्या काळात गाझामध्ये घडणाऱ्या घटना आणि इस्रायलच्या निर्बंधांवर सगळी भिस्त असेल. इस्रायलचे अतिउजवे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन-गवीर यांनी इस्रायली मुस्लिम नागरिकांनी अल-अक्सामध्ये जाण्यावर कठोर निर्बंध घालण्याचं आवाहन केलंय. गाझामध्ये इस्रायली लोकांना ओलीस ठेऊन आनंद साजरा करणाऱ्या हमासला रोखण्यासाठी हे केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही योजना फेटाळून लावली आहे. त्यांनी म्हटलंय की रमजानच्या पहिल्या आठवड्यात भाविकांना मशिदीत जाण्याची परवानगी दिली जाईल, कारण त्यांना यापूर्वी परवानगी देण्यात येत होती. मात्र दर आठवड्याला सुरक्षेच्या स्थितीचं मूल्यांकन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. मात्र, या मशिदीत किती लोकांना जाण्याची परवानगी दिली जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गाझा युद्धादरम्यान इस्रायलने वेस्ट बँक मधील पॅलेस्टिनींना जेरुसलेममध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली होती. साधारणपणे रमजानच्या काळात शुक्रवारच्या नमाजला उपस्थित राहण्यासाठी हजारो भाविक इस्रायली लष्करी चौक्या पार करत असतात.
 
इस्रायल उपासनेच्या स्वातंत्र्याचं रक्षण करणार का?
इस्त्रायली सरकारचे प्रवक्ते एलोन लेव्ही यांनी म्हटलंय की, उपासनेच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी काही निर्णय घेतले जातील. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "रमझानची वेळ ही अशी असते की अतिरेकी हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करतात. आम्ही हे थांबवण्यासाठी काम करतोय." ते म्हणाले, "आम्ही मागील वर्षांमध्ये ज्याप्रमाणे टेंपल माऊंटवर प्रवेश दिला होता त्याचप्रमाणे याही वर्षी देऊ आणि शांतता बिघडवणाऱ्यांवर नक्कीच कारवाई करू." सोन्याचा मुलामा चढवलेला डोम ऑफ द रॉक पाहत असताना माझी भेट इस्लामिक वक्फ कौन्सिलचे सदस्य डॉ. इमाम मुस्तफा अबू स्वे यांच्याशी झाली. ते अल-अक्सा मशीद किंवा हरम अल-शरीफचे व्यवस्थापन करतात. ते म्हणाले, "काही वर्षांपूर्वी इस्रायलने वेस्ट बँकमधून येणाऱ्या प्रत्येकाला इथे येण्याची परवानगी दिली होती. त्या दरम्यान एकही अनुचित घटना घडलेली नाही." "लोक प्रार्थनेसाठी येतात. ते शांतता भंग करण्यासाठी येत नाहीत. जर इस्रायली पोलीस आणि सुरक्षा दलांनी त्यांना एकटं सोडलं तर सर्व काही ठीक होईल, अशी आशा आहे." मात्र यावेळी जेरुसलेममध्ये नेमकं काय घडणार हे जाणून घेण्यासाठी जग अपेक्षेपेक्षा जास्तीचे प्रयत्न करेल. 

Published By- Dhanashri Naik 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'इलेक्टोरल बाँड'ची स्टेट बँक सविस्तर माहिती देणार, कोणकोणत्या गोष्टी बाहेर येणार? वाचा